मुंबई (प्रतिनिधी) : जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी’ या संसर्गजन्य त्वचा रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली तयार करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमान पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
‘लम्पी’ या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या गायी किंवा म्हशींच्या मालकांना प्रत्येकी दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी’ या संसर्गजन्य त्वचा आजाराचा झपाट्याने प्रादुर्भाव होत असून राज्य सरकारने याप्रकरणी परिपत्रक काढण्याशिवाय काहीच केलेले नाही, असा आरोपही शेट्टी यांनी याचिकेच्या माध्यमातून केला आहे. ही याचिका शेट्टी यांचे वकील अजिंक्य उडाणे यांनी सोमवारी संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर सादर केली.
‘लम्पी’ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राण्यांतील संसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रण कायद्यातील तरतुदींनुसार उपाययोजना करायला हव्यात. परंतु सरकारतर्फे काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याचेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.
शेतकरी सततच्या अवेळी पावसामुळे अडचणीत आहेत. त्यातच आता त्यांच्या पशुधनांना ‘लम्पी’ त्वचारोगाचा धोका आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. तसेच जनावरांचे ‘लम्पी’ या संसर्गजन्य त्वचारोगापासून संरक्षण करण्यासाठी सरकारने त्यांचे सामूहिक लसीकरण करणे आवश्यक आहे. – राजू शेट्टी, माजी खासदार