गुरुग्राम : समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांचे निधन झाले आहे. ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मुलायम सिंह यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होता. त्यातच ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते ‘नेताजी’ या नावाने प्रसिद्ध होते.
५५ वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले. १९६७ मध्ये यूपीमधील जसवंत नगरमधून आमदार निवडून आल्यानंतर ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि सात वेळा निवडून येऊन लोकसभेचे खासदार झाले. १९९६ मध्ये त्यांना संयुक्त आघाडी सरकारमध्ये संरक्षण मंत्री होण्याची संधीही मिळाली.