
मुंबई : वातावरणातील वाढत्या बदलामुळे मुंबईत डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. डोळ्यांतून पाणी येणे, लाल होणे, डोळे चुरचुरणे, डोळ्यात खुपणे अशा प्रकारच्या तक्रारीही मुंबईकरांमध्ये वाढल्या आहेत. परिणामी, खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये डोळे आल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.
हवामानातील उष्मा वाढत असला, तरीही काही ठिकाणी मध्येच पावसाची सर येते, हे वातावरण डोळे येण्याच्या संसर्गासाठी पोषक असते. हा साथीचा आजार योग्य प्रकारे काळजी घेतली नाही, तर अधिक फैलावतो आधीच वातावरणातील बदलांमुळे हैराण असलेले मुंबईकर, आता डोळे येण्याच्या साथीने त्रस्त आहेत.
हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांनी बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांकडून मुंबईकरांना देण्यात येत आहे. तसेच, या साथीचे प्रमाण वाढत असल्याने रुग्णांनी घरी बसून आराम करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईत डोळ्यांची साथ पसरू लागली आहे. या प्रकारात डोळ्यांना सूज येते, अशीच काहीशी लक्षणे मुंबईकरांमध्ये दिसून येत आहेत. डोळ्यांवर घरगुती उपाय करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या, असे आवाहन रुग्णांना तज्ज्ञांकडून केले जात आहे.