Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्र

नाशिकमधील बस आगप्रकरणी आठ मृतांची ओळख पटली

नाशिकमधील बस आगप्रकरणी आठ मृतांची ओळख पटली

नाशिक (प्रतिनिधी) : बस-ट्रक अपघातात मृत झालेल्या १२ व्यक्तींपैकी ८ व्यक्तींची ओळख पटली असून, तीन मृत व्यक्तींचे शव त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली. दरम्यान या सर्व प्रकरणाची आता प्रादेशिक परिवहन विभागाने देखील गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी चिंतामणी ट्रॅव्हल्सला नोटीस पाठविण्यात येणार आहे.

काल पहाटे नाशिक शहरातील नाशिक औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरचीजवळ धुळ्याहून औरंगाबादकडे जाणारा ट्रक आणि औरंगाबादहून मुंबईकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हलची बस यांच्यात भीषण अपघात झाला. त्यामध्ये १२ व्यक्तींचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये आठ व्यक्तींची ओळख पटविण्यात प्रशासनाला यश आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली. यापैकी तीन जणांचे शव त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. चार प्रवाशांची ओळख पटत नसल्याने त्यांची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आडगाव पोलिसांनी ट्रकचालक रामजी यादव याला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता आरटीओनेदेखील पावले उचलण्यास सुरुवात केली असून, चिंतामणी ट्रॅव्हल्सला नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नोटीस पाठविण्यात येणार आहे त्यानंतर पुढील कारवाई करण्यासंदर्भात आरटीओकडून पावले उचलली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

काल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांची एक बैठकदेखील याच आठवड्यामध्ये घेण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी सुरू झाली आहे.

ओळख पटलेल्या मृतांची नावे

उद्धव पंढरी भिलंग (वय ४४, रा. तारोडी, जि. वाशिम) कल्याणी आकाश मुधोळकर (वय ३, रा. विधी, जि. बुलढाणा) शंकर मोहन कुचनकार (वय १८, रा. मारेगाव, जि. यवतमाळ) साहिल जितेंद्र चंद्रशंकर (वय १५, रा. सावली, जि. वाशिम) पार्वती नागराव मुधोळकर (वय ४५, रा. विधी, जि. बुलढाणा) वैभव वामन भिलंग (वय २३, रा. तारोडी, जि. वाशिम) ब्रह्मदत्त सोगाजी मनवर (वय ४०, रा. वसंतनगर, जि. वाशिम) अशोक सोपान बनसोड (वय ३५, रा. बेळखेडा, जि. वाशिम)

Comments
Add Comment