Saturday, May 10, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

महापालिकेकडून ‘बेस्ट’ला ४५० कोटींच्या मदतीचा हातभार

महापालिकेकडून ‘बेस्ट’ला ४५० कोटींच्या मदतीचा हातभार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहर, उपनगर तसेच सभोवतालच्याही शहरातील प्रवासी वाहतुकीचा कणा मानल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती दिवसेंगणिक खालावत चालली आहे. आजही केवळ ५ रुपयांनी प्रवासी सेवेचा शुभारंभ करणाऱ्या बेस्टच्या अस्तित्वालाच घरघर लागली असून बेस्ट जगवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्तपणे पुढाकार घेण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.


बेस्ट उपक्रम बसच्या माध्यमातून मुंबईत विद्युत आणि परिवहन सेवा देत आहे. बेस्टमध्ये ४२ हजार कर्मचारी कार्यरत होते. सध्या २९ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षात खर्च आणि बाहेरून घेतलेले कर्ज यामुळे बेस्टची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. बेस्टला आपली देणी देणे अडचणीचे ठरत आहे. यासाठी पालिकेने बेस्टला ५३२१ कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य केले आहे. पालिकेने आर्थिक सहाय्य केले असले तरी बेस्टची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही.


बेस्ट उपक्रमामधून २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत ३५१६ कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडे ४५० कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य मागितले होते. त्यानुसार प्रस्तावाला प्रशासकीय अधिकारी म्हणून पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी मंजुरी दिली आहे. पालिकेच्या आर्थिक मदतीमुळे बेस्ट उपक्रमातील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना विविध देणी लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन, सन २०१९-२० पासून ते सन २०२२-२३ (२१ ऑगस्ट २०२२) पर्यंत करण्यात आलेल्या तरतूदींमधून २१४१.०५ कोटी व तरतुदींव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान, रक्कम म्हणून २० ऑगस्ट २०२२ पर्यंत ३१८०.२२ कोटी असे एकूण ५३२१.२७ कोटींचे अधिदान बेस्ट उपक्रमास करण्यात आले आहे.


बेस्ट बस सेवा भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कुठल्याही भागात जायला बेस्टची सेवा आहे. नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर अशा बाजूच्या शहरांमध्येही बेस्टची सेवा आहे. भारतातल्या काही नफ्यामध्ये असणाऱ्या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे ‘बेस्ट’ आहे.

Comments
Add Comment