पोरबंदर (गुजरात) : गुजरातच्या किनाऱ्याजवळील अरबी समुद्रात सात भारतीय मच्छीमारांचे अपहरण करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी २० ते २५ पाकिस्तानी नौदलाच्या एका गटाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
ही घटना ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा ‘हरसिद्धी’ नावाच्या भारतीय बोटीवरील सात क्रू मेंबर्स जाखाऊ किनारपट्टीवरील भारतीय पाण्यात मासेमारी करत होते. ‘पीएमएसए बरकत १०६०’ नावाच्या पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीच्या बोटीवर २० ते २५ गणवेशधारी जवानांनी भारतीय बोटीवर विनाकारण गोळीबार सुरू केला. त्यांनी बोट नष्ट केली आणि बुडवली. मच्छीमारांचे अपहरण केले आणि त्यांना त्यांच्या जहाजावर नेले. मच्छीमारांना काठीने मारहाण केल्याने ते जखमी झाले. आरोपींनी मच्छीमारांचे व्हीडिओ रेकॉर्ड केले आणि धमकी दिल्यानंतर त्यांना सोडून दिले, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
पोरबंदरचे पोलीस अधीक्षक रवी मोहन सैनी यांनी सांगितले की, शुक्रवारी भारतीय तटरक्षक दलाच्या बोटीने मच्छीमारांची सुटका करून गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदरात आणण्यात आले. ते म्हणाले की, एफआयआर जखाऊ येथे दाखल करण्यात आला आणि गुजरात किनारपट्टीपासून १२ सागरी मैलांच्या पलीकडे प्रादेशिक अधिकार क्षेत्र असलेल्या पोरबंदर जिल्ह्यातील नवीबंदर या पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला. भारतीय दंड संहिता कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), ३६५ (अपहरण), ४२७ (नुकसान करणे), ३२४ (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि ५०६ (१) अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
“भारतीय बोट बुडाली आणि तिचे स्थान तपासण्यासाठी आमच्याकडे जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) नाही. एका मच्छीमाराच्या तक्रारीच्या आधारे, खून आणि अपहरण कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.” असे अधिकाऱ्याने सांगितले.