
सीमा दाते, मुंबई
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अनेकांची स्वप्ननगरी आहे. देशभरातून आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, पोट भरण्यासाठी लोक मुंबईचा आधार घेतात आणि ही मुंबई ही सगळ्यांना आपलेसे करून टाकते. यामुळेच गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईत बाहेरच्या राज्यांतून उपजिविकेसाठी येणारे लोंढे वाढत आहे. सध्याच्या परिस्थितीत मुंबईच्या लोकसंख्येचा विचार केला, तर सुविधा आणि सेवा या कमी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेचा आताचा अर्थसंकल्प हा ४६ हजार कोटींचा आहे. यात रस्ते, पूल आणि विशेष म्हणजे आरोग्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली. पाच ते सहा हजार कोटींची तरतूद आरोग्यासाठी केली असूनही सध्याच्या परिस्थिती ही आरोग्य सेवा ही मुंबईकरांना पूरत नसल्याचीच पाहायला मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीत मुंबईमध्ये एकीकडे विकास, तर दुसरीकडे मुंबईच्या समस्या ही तेवढ्याच आहेत. परिणामी याचा सर्व त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. एकीकडे लोकल ट्रेनच्या समस्या तर दुसरीकडे रस्त्यावरची वाहतूक कोंडी. त्यातही पावसाळ्यात होणारा त्रास हा वेगळाच.
मुंबईत केवळ समस्याच आहेत, असे नाही तर मुंबई विकासाच्या ही दिशेने जाताना दिसते. रस्तेबांधणी, मोठे मोठे पूल, सुशोभीकरण या सगळ्यांची सांगड घालताना मुंबई दिसते. मात्र हे सगळे एका बाजूला होत असले तरी रोजच्या समस्या या ‘जैसे थे’च आहेत. रस्ते आणि पूल बांधणी सुरू असलेल्या भागात कित्येक वर्ष कामाला जातात आणि परिणामी अरुंद झालेल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढत जाते, एकीकडे मेट्रोचा विस्तार सुरू असला तरी मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास मुंबईकरंना सहन करावा लागतो. सध्याच्या परिस्थितीत घरातून नोकरीवर निघालेला मुंबईकर हा अडथळा शर्यत पार करून नोकरी आणि नोकरी ते घर असा पोहचतो की काय असेच वाटत असते. गेल्या कित्येक वर्षांपासून असणाऱ्या लोकलच्या गर्दीत मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय. मात्र तरी त्याला त्याच लोकलचा वापर प्रवासासाठी करावा लागत आहे. परिवहन सेवा स्वस्त असल्यामुळे लोकलने येणाऱ्या दररोजच्या प्रवाशांची संख्या ७५ लाखांच्या आसपास आहे. मात्र तरीही रोजची गर्दी आणि वाढणारी गर्दी मुंबईकरांची डोके दुःखी ठरते. वेळेवर लोकल नाही आणि त्यातही असलेली गर्दी यामुळे कित्येक वर्षांपासून मुंबईकरांची ही काही समस्या सुटत नाही. त्यांनतर मुंबईतील रस्ते, रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, सकाळी दक्षिण मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर मुंबईकरना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबईकरांच्या सेवेसाठी महापालिकेने पूल बांधले आहेत, मात्र तरीही या पुलांवरही वाहनांच्या रांगा दिसतात, तर दुसरीकडे काही पुलांची कामे सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीची समस्या सुरू असतानाच दर वर्षी मुंबईकर भोगतो ती पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या आणि त्यातून होणारे खड्डे. यातून त्याची सुटका कधी होणार, हे कोणीही सांगू शकणार नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिका कोट्यवधी रुपयांची रस्त्यांची कामे करते, खड्डे बुजवण्याची कोल्डमिक्सचा वापर करते, कोट्यवधी रुपये खर्च करून खाजगी कंत्राटदाराला खड्डे बुजवण्याचे कंत्राट दिले जाते. मात्र असे असतानाही दर वर्षी मुंबईत खड्याची समस्या ‘जैसे थे’च आहे. बरं बुजवलेले खड्डे हे काही तासातच पाऊस झाल्याने पुन्हा दिसू लागतात. त्यामुळे ही समस्या तर मुंबईकरांच्या जणू नशिबीच आहे, असे भासते. मात्र तरीही सहनशील मुंबईकर सगळे वर्षानुवर्षे निमूटपणे सहन करतोय. आता याचा उद्रेक एक दिवशी नक्की होईल हे तितकंच खरं, पण मुंबईकरांनी हा उद्रेक आपल्या मतदानात दाखवून दिला, तर बरं पडेल.
ज्या शिवसेनेला २५ वर्षांहून जास्त काळ सत्ता दिली. त्या शिवसेनेने मुंबईचे इतक्या वर्षांत काय केले, साधे रस्तेही मुंबईकरांना देऊ शकली नाही का? आज कित्येक झोपडपट्टी वसाहतींमधील भागात पाण्याची कमतरता आहे, कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यामुळे लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही आणि हे मतांसाठी लोकांना २४ तास पाणीपुरवठ्याची खोटी आश्वासने देतात. इथे सध्या मुंबईला होणारा पाणीपुरवठा दररोज ३८५० दशलक्ष लीटर पाणी पुरवले जाते. मात्र हाच पाणीपुरवठा आता मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला अपुरा पडायला लागताना दिसत आहे. या सगळ्या समस्यांमधून मुंबईकर कधी मुक्त होणार? हे तर कोणालाच माहीत नाही. कारण मुंबईच्या समस्यांचा पाढा हा न संपणारा आहे. मुंबईचा भौगोलिक विस्तार शक्य नसला तरी वाढत्या लोकसंख्येला हे शहर निमूटपणे सामावून घेत आहे. येथे श्रीमंताचीही गरज भागते आणि गरीबालाही उपजिविका भेटते. शेवटी सर्व एकच सूर आळवितात - ‘ये मुंबई हैं मेरी जान, पोटाची भूक भागविणारे हे शहर आहे आमचा अभिमान’.
समस्या आरोग्याची... निरोगी शरीर गरज मुंबईकरांची...
आता सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे आरोग्याची. ४६ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मात्र हजारो रुग्ण रोज रांगेत उभे असतात. आताच आपला नंबर येईल म्हणून शस्त्रक्रियासाठी, सोनोग्राफीसाठी, एक्स-रे साठी तारखांवर तारखा घेत असतात, सकाळच्या वेळी, तर बाह्यरुग्ण विभाग गर्दीने भरून गेलेला असतो. त्यातल्या कित्येक रुग्णांना रांगेत उशीर झाल्यामुळे पुन्हा घरी परतावं लागतं. मुंबई महापालिकेने आरोग्यासाठी ५ ते ६ हजार कोटींची तरतूद केली आहे. महापालिकेच्या रुग्णालयाचा पसारा पूर्व उपनगरात मुलुंड ते पश्चिम उपनगरात दहिसरपर्यंत पसरला आहे. त्यातच लहान-लहान प्रसूतिगृह वेगळी. एवढे सगळे असताना रुग्णांना परळच्या केईम, नायर रुग्णालयात यावे लागते. कारण काही रुग्णालयात अजूनही म्हणाव्या तशा मशीन नाहीत. काही शस्त्रक्रिया होतात काही होत नाही त्यामुळे मोठ्या मानल्या जाणाऱ्या केईम, नायर, सायन रुग्णालयात रुग्ण येतात. यामुळे या रुग्णालयाचा ताण वाढतो. परिणामी रुग्णांना व्यवस्थिती आरोग्य सेवा मिळत नाही, काही वेळा वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना खाटा मिळणेही अशक्य होते. दुसरीकडे स्वच्छतेची वानवा. त्यामुळे सध्या तरी मुंबईतील प्रश्न सुटतील, असे वाटत नाही.
जागोजागी उभारणार बाळासाहेब ठाकरे दवाखाने
बरं अगदीच मुंबईचा विकास नाहीच असेही नाही. काही मोठे प्रकल्प आहेत जे महापालिकेचे प्रस्तावित आहेत. आरोग्य विभागाबाबत देखील अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत, तर काही सुरू केले आहेत. सध्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने मुंबईचे जागोजागी सुरू होणार आहेत. यामुळे लहान-लहान आजारांसाठी रुग्णांना मोठे रुग्णालय गाठायची गरज नाही. या दवाखान्याच्या माध्यमातून लहान-सहान आजार तसेच या संसर्गजन्य आजारावर उपचार केले जाणार आहेत, आठवड्यातून एकदा तज्ज्ञ डॉक्टरची व्हिजिट असणार आहे. सुरुवातीला ५० दवाखाने सुरू होतील. यामुळे मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होणार आहे. दुसरीकडे, नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील समस्येचा आढावा घेताला होता. यावेळी रस्ते, खड्डे यांच्याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. इतकेच नाही, तर पुढील दोन ते तीन वर्षांत मुंबईकरंना खड्डेमुक्त रस्ते मिळतील, असे आश्वासनही पालिका आयुक्तांनी दिले आहे, तर मुंबईच्या सुशोभीकरणावर पालिका लक्ष घालते आहे. ‘मुंबई मेरी जान’ म्हणणाऱ्यांना मुंबई अधिक कशी आकर्षक वाटेल, यावर भर दिला जातो आहे. यासाठी रस्ते, पुलाखाली जागा, पदपथ, समुद्रकिनारे सगळ्याचेच रूप पालटणार आहे. हे सगळे प्रकल्प लवकरच सुरू होतील. मात्र तोपर्यंत मुंबईकरांना या समस्या सोसाव्याच लागतील, हे मात्र नक्की. शिवाय पुन्हा दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना ‘मुंबई स्पिरिट’च्या नावाखाली उभे राहावे लागेल.
अग्निदिव्य कामगिरीला सॅल्युट...
कुलाबा ते दहिसर, सीएसएमटी ते मानखुर्द-मुलुंडपर्यंत हे मुंबई शहर विस्तारलेले आहे. लहान-लहान राज्यांच्या तसेच जगातील काही देशांच्या तुलनेत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मोठा आहे. या शहरातील कानाकोपऱ्यांत मुंबईकरांना नागरी सुविधा पुरविणे आणि नागरी समस्या सोडविणे हे अग्निदिव्य पार पाडणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला खऱ्या अर्थाने ‘सॅल्युट’च करावा लागेल. करदात्या मुंबईकरांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देताना त्यांच्या नागरी समस्या सोडविण्यास महापालिका प्रशासन प्राधान्य देत आहे. रस्ते, शौचालये, पाणी, पथदिवे, पायवाटा, मैदाने, उद्याने यांसह नानाविध सुविधा मुंबई महापालिका प्रशासन देत आहे. मागील दोन वर्षांत कोरोना महामारीच्या काळामध्ये महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाने नक्कीच उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी केलेली आहे. मुंबई शहरातील वस्ती ही उच्चभ्रूंची तसेच गोरगरीब सर्वसामान्यांची आहे. कोरोना काळात जागतिक पातळीवर उद्रेक झालेला असताना मुंबईमधील चाळींमध्ये, झोपडपट्टी परिसरात, डोंगराळ भागात महापालिकेने कोरोना नियंत्रणात आणला आहे. महापालिका शाळांच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचे काम केले जात आहे. मुंबईतील रस्त्यावरील वाहनांच्या संख्येची जमाबेरीज केल्यास रस्त्यांची प्रशासनाला सातत्याने डागडूजी करावी लागत आहे. सार्वजनिक शौचालयांमध्ये पाण्यासह वीज उपलब्ध करून दिली जात आहे. शौचालयांच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. महापालिकेचा पसारा व विभाग आणि कार्य यांची सांगड घालणे येरागबाळ्याचे काम नाही.