अनघा निकम-मगदूम
गेल्या काही वर्षांपासून आपल्या जीवनामध्ये सोशल मीडिया हा अविभाज्य घटक झाला आहे. प्रसारमाध्यमे पूर्वी सुद्धा होतीच, आताही आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून आलेल्या सोशल मीडिया आणि त्यातही व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांसारखी समाज माध्यम हे आपल्या जीवनाचा दृष्टिकोन, जीवनाची दिशाही बदलू शकतात, इतका त्यांचा प्रभाव आपल्यावर पडू लागला आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आता दैनंदिन गरजा आणि गोष्टी सुद्धा पूर्ण होऊ लागल्या आहेत. अगदी बँकेत न जाता सुद्धा आपण पैशाचा व्यवहार केवळ एका मोबाइलवर कमी वेळेत किंवा वेगाने करू शकतो इतकं आपण या मोबाइलच्या अधीन झालो आहोत. दुकानात न जाता घरामध्ये किराणामाल, भाजी, अगदी जेवणसुद्धा उपलब्ध होऊ शकतात.
कोरोनाचा लॉकडाऊन जेव्हा सुरू होता तेव्हा या सोशल मीडियाचा खूप मोठा उपयोग अनेकांना झाला. अगदी पूर, भूकंपसारख्या आपत्ती काळातसुद्धा सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अर्थात ही सोशल मीडियाची एक चांगली बाजू आहे. मात्र त्याची दुसरी बाजू सुद्धा तितकीच घातक आणि भयानक आहे आणि त्याचा तीव्र, वाईट परिणाम समाजावर किंवा समुदायावर तीव्र वेगाने कमी वेळेत होताना दिसतो अत्यंत वेगाने संदेशवहन होणारा या सोशल मीडियामध्ये एखादी गोष्ट, एखादा फोटो, video हा काही सेकंदात सर्वदूर पोहोचतो इतकी या सोशल मीडियाची क्षमता आणि ताकद आहे. रत्नागिरीतील एखाद्या गावातील घटना काही क्षणात अमेरिकेत पोहोचते सुद्धा. इतके या सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. मात्र त्याचाच दुरुपयोग करून समाजामध्ये विघातक गोष्टी केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यातून समाज अस्थिर करण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये ‘मुलं पळवणारी टोळी आपल्या भागात आली आहे’ अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर फिरू लागले आहेत आणि त्यातूनच जमाव प्रक्षुब्ध होऊन एखादा सामान्य त्यात नाहक बळी जात आहे. असे संदेश काही क्षणात व्हायरल होत असल्याने अवघ्या काही सेकंदात समाजावर किंवा एखाद्या विभागावर तत्काळ परिणाम होऊन त्याचे विघातक गोष्टीत रूपांतर होताना दिसत आहे.
खरं तर या फॉरवर्डेड मेसेजवर विश्वास ठेवू नका, असं अनेकदा आणि वारंवार सांगितलं जातं; परंतु समाज मन हे नेहमी नकारात्मक गोष्टीकडे सर्वाधिक लक्ष देतं. सकारात्मक मेसेज पेक्षाही नकारात्मक मेसेज वाचणाऱ्या लोकांची संख्या किंवा टक्केवारी ही सर्वाधिक आहे. एखादी गुन्हेविषयक बातमी, राजकीय बातमी किंवा मग असे त्रासदायक घटनांचे मेसेज तत्काळ फॉरवर्ड केले जातात आणि काही क्षणात त्याचा परिणाम समुदायावर होतो, ही आजच्या सोशल मीडियाची ताकद आहे आणि त्याचे परिणाम हळूहळू आता आपण बघू लागलो आहोत. केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा कोकणच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. यामुळेच मुलांबरोबरच पालकांमध्येसुद्धा भीतीच आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
आपण लहानपणी लांडग्याची गोष्ट ऐकली आहेच. आता त्या गोष्टीतला थापाड्या मुलगा व्हायरल मेसेजच्या रूपाने प्रत्यक्षात अवतारला आहे. पण, त्यातच ही लांडग्याची गोष्ट आता जवळजवळ सगळ्यांनाच माहिती असल्याने न जाणो खरंच कधी लांडगा आला तर म्हणजे खरंच अशी टोळी आली, तर किंवा असली तर अशा नकारार्थी गोष्टीवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे घटना घडू लागल्या आहेत.
‘मुलं पळवणारी टोळी सध्या सर्वत्र फिरते’ हा मेसेज कुठून तरी राज्याच्या एका कोपऱ्यातून बाहेर पडला आणि मग तो सर्वत्र व्हायरल झाला. या व्हायरल मेसेजमुळे अनेक ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडल्या. निष्पाप माणसांना मारहाण करण्यात आली त्यातून महिलाही वाचल्या नाहीत आणि त्यामुळेच त्यातच पालकांमध्ये मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. नकारार्थी वातावरण निर्माण झालं. अशी कोणतीही टोळी सध्या राज्यात नाही याबाबतची जनजागृती पोलीस विभागाकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. रत्नागिरीत सुद्धा यासाठी पोलीस विभागाने काम करायला सुरुवात केली. रत्नागिरीमध्ये सुद्धा अशा दोन-तीन घटना घडल्यामुळे आता रत्नागिरी पोलीस याबाबत जागृत झाले आहेत. मात्र जसं सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणेच अफवाचा वेग हा अशा जनजागृती कार्यक्रमांपेक्षा खूप जास्त असल्यामुळे अफवा खूप वेगानं सर्वत्र पसरत आहेत. अशा वेळेला एक पालक म्हणून आई-वडिलांनी नेहमीच जागरूक राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं. अशा वेळेला घाबरून न जाता आपल्या मुलांना अशा गोष्टीसाठी सक्षम करणं हे जास्त आवश्यक आहे. कुठे बोलावं, कुणाशी बोलायचं, अनोळखी माणसांच्या संपर्कात यायचं नाही, भूलथापांना बळी पडायचं नाही, चॉकलेटसारख्या आमिषाला बळी पडायचं नाही, असं प्रशिक्षण केवळ शाळांमधून किंवा पोलिसांनी येऊन देण्यापेक्षा आता पालकांनी स्वतः आपल्या मुलांना तसं सजग केलं, तर त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्याचवेळी पालकांनी सुद्धा अशा गोष्टींवर तत्काळ विश्वास ठेवण्यापेक्षा त्याचे खातरजमा करण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. एखाद्या गोष्टीवर या होण्यापेक्षा पोलीस विभागाकडून किंवा संबंधित शाळेकडून याची माहिती घेतली, तर अशा चुकीच्या गोष्टी समाजात घडणार नाहीत. मात्र यासाठी एक चांगला दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. अर्थात मुलं हा पालकांचा एक जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे कोणीही निष्कर्ष काढण्यापेक्षा पालक रिअॅक्ट होणे अपेक्षितच आहे. पण मात्र त्याचे परिणाम अनेकदा चांगले नसतात. त्यामुळेच आता या ‘व्हायरल मेसेजचा लांडगा’ खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाने स्वतःची जबाबदारी समजून, व्हायरल मेसेजच्या लांडग्याला घालवून देणे गरजेचे आहे.