Friday, May 9, 2025

कोलाज

वेळ

वेळ

प्रा. प्रतिभा सराफ


त्या दिवशी मी खूप हट्टाला पेटले. म्हटले, ‘नाही करायचा मला नाष्टा. मला साबुदाण्याची खीर खायची आहे.’
आई म्हणाली, ‘अगं आत्ता पोहे खाऊन घे... बनवते नंतर!’
‘नाही मला आत्ता म्हणजे आत्ता हवी.’
‘बेटा... ऐक...’
‘मी खाईन तर साबुदाण्याची खीर... नाहीतर मला काही नको.’
सगळे नाश्ता करत होते तेव्हा मी चिडून बेडरूममध्ये जाऊन झोपले. त्यानंतर आईने स्वयंपाक केला. ताई बोलवायला आली, तरी मी जेवायला गेले नाही. अख्खा दिवस मी झोपून होते. दुपारचे तीन वाजले होते तेव्हा आई हातामध्ये काचेची वाटी घेऊन आली. ज्याच्यात पांढरीशुभ्र साबुदाण्याची खीर होती आणि वर कातरून टाकलेला सुकामेवा.


मी बेडवर उठून बसले. तिच्या हातातून वाटी घेतली. सकाळपासून भुकेले होते. मी बकाबक खायला सुरुवात केली. मी परत स्वयंपाकघरात गेली आणि एका स्टीलच्या पातेले घेऊन आली त्यात खीर शिगोशीग भरली होती. तिने मला ती दुसऱ्यांदा वाढली. ती संपल्यावर तिसऱ्यांदाही वाढली. माझे खाऊन झाल्यावर माझ्या हातातील रिकामी वाटी घेताना म्हणाली,
‘बाळा जेव्हा तू सकाळी उठल्यावर मला सांगितलं की, मला साबुदाण्याची खीर खायची आहे, त्याक्षणी मी साबुदाणा भिजत घातला; परंतु साबुदाणा भिजायला काही काळ लागतो; त्यानंतरच त्याची खीर बनवता येते. त्यामुळे वेळ लागला.
इतके बोलून ती स्वयंपाकघरात निघून गेली. हे बोलताना तिचे डोळे भरून आले होते, हे माझ्या लक्षात आले. बेडवरून खाली उतरले आणि शांतपणे स्वयंपाकघराकडे केले. ती काचेचा बाऊल बेसिनमध्ये घासत होती. मी मागून तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली आणि मग दोघीही अखंड रडलो!


(या प्रसंगानंतर मी नेहमीच विचार करते की, एखादा माणूस आपल्याशी कसाही वागत असेल तरीही त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी काहीतरी भावना असतेच... फक्त आपण ती त्या क्षणी समजून घेत नाही इतकेच.)

Comments
Add Comment