दीपक परब
महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्त्व बाजीप्रभू यांच्यावर चित्रीत करण्यात आलेला ‘हर हर महादेव’या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील दमदार गाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व रसिक प्रेक्षकांची या गाण्यांना उत्तम दाद मिळत असताना या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. दमदार कलाकार आणि जबरदस्त गाणी असलेल्या या चित्रपटाचे टीझर राज ठाकरे यांच्या ‘मनसे’च्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आले आहे. टीझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अजूनच वाढली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग होत राहिले आहेत. यंदा याआधी कधीच न झालेला असा प्रयोग ‘हर हर महादेव’ या चित्रपटाद्वारे करण्यात आला असून हा सिनेमा फक्त मराठीतच नाही, तर पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुलतानी अंधार पसरलेला असताना जिजाऊंनी स्वातंत्र्याचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या रणझुंजार कर्तृत्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्सची असून यात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सकारात्मकतेची, शौर्याची, देशप्रेमाची ज्योत पेटवणार यात काही शंकाच नाही. येत्या दिवाळीत पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा ‘हर हर महादेव’ हा पहिलाच मराठी सिनेमा ठरणार आहे. हा सिनेमा अनेक बॉलिवूड सिनेमांना टक्कर देणारा ठरणार आहे.
‘हर हर महादेव’ या सिनेमात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. त्यातील एक प्रमुख भूमिकेतील नाव म्हणजे सुबोध भावे. या भूमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला, “छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की, मनात आपसूकच आदराची आणि अभिमानाची भावना निर्माण होते. केवळ मराठी माणूसच नव्हे, तर इतर भाषिकांसाठीही अखंड प्रेरणेचं ऊर्जास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजाची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे, असे मी मानतो. एक अभिनेता म्हणून आपल्याला कायम काही तरी आव्हानत्मक भूमिका करायला मिळाव्यात, अशी कायम इच्छा असते. माझ्यासाठी ‘ड्रीम रोल’ असलेली ही भूमिका केवळ आव्हानात्मकच नाही, तर एक फार मोठी जबाबदारी आहे याची जाणीव मला आहे. हे शिवधनुष्य पेलण्याचा मी इमानेइतबारे प्रयत्न केलेला आहे. दिवसाअंती आनंद आणि समाधान देणाऱ्या काही भूमिका असतात. या भूमिकेने मला तो आनंद ते समाधान आणि जगण्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला आहे”.
‘बिग बॉस’चे दार उघडले; एक घर, १०० दिवस आणि १६ स्पर्धकांचा प्रवास सुरू
‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त, लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. यंदाचे पर्व ‘ऑल इज वेल’ या थीमवर आधारित आहे.
देवमाणूस फेम तेजस्विनी लोणारी, अभिनेता प्रसाद जवादे, मुंबईचा निखिल राजेशिर्के आणि कोल्हापूरची अमृता धोंगडे, ‘सातारी बाणा’ किरण माने, ‘स्प्लिट्सविला’ फेम समृद्धी जाधव, अक्षय केळकर, रोडीज फेम योगेश जाधव, पुण्याची ‘टॉकर’वडी अमृता देशमुख, ऑटो राणी यशश्री मसुरकर, डान्सच्या दुनियेतला सुपरस्टार विकास सावंत, लावणीक्वीन मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, अभिनेत्री रुचिरा जाधव आणि नृत्य दिग्दर्शक रोहित शिंदे हे स्पर्धक ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले आहेत.
भांडण, दंगा, आणि प्रेमाने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची प्रतीक्षा करत होते. अखेर एक घर, १०० दिवस आणि १६स्पर्धकांचा प्रवास आता सुरू झाला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार? याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
आता शिवाली घालणार ‘धुमशान’
महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गुणवंतांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. त्यातीलच एक घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब आता ‘प्रेम प्रथा धुमशान’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २८ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘प्रेम प्रथा धुमशान’ या सिनेमाच्या माध्यमातून मालवणी बोलीत एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. ‘प्रेम प्रथा धुमशान’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिजित वारंग यांनी सांभाळली आहे.
‘प्रेम प्रथा धुमशान’ हा सिनेमा मालवणी बोलीभाषेतला आहे. मालवणी बोलीचा वापर सिनेमांत बहुतांशी विनोदनिर्मितीसाठी केला गेला. पूर्ण मालवणी बोलीतले सिनेमे अगदी मोजके आहेत. मात्र मालवणी बोलीला, तिथल्या माणसांना आणि त्यांच्या गोष्टींना वेगळ्या उंचीवर घेऊन जात अभिजीत वारंग याने ‘प्रेम प्रथा धुमशान’ या सिनेमाच्या माध्यमातून अनोखी प्रेमकथा मांडली आहे.
शिवाली परब या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवालीसह या सिनेमात विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, अक्षता कांबळी, निकिता सावंत, कल्पना बांदेकर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.