प्रा. देवबा पाटील
एक गाव होतं. या गावात लबाड येसाप्पा राहायचा. गावाच्या बाजूला गोठाणांवर गावातील गुरे-ढोरे, चरायची. त्यामुळे गोठाणांवर शेणाच्या गोवऱ्या पडायच्या. पोटापाण्यासाठी या गोवऱ्या जमा करायचाच येसाप्पाचा धंदा होता, तर अशा दिवसभर गोवऱ्या गोळा करायच्या व संध्याकाळी घरी आल्यानंतर घराच्या मागील अंगणात गोवऱ्यांचा ढीग करायचा. जेवण करून घ्यायचा व मग बायका-पोरांना त्या गोवऱ्या दगडाने ठेचून बारीक करण्यास सांगायचा. नदीकाठची पिंगट पिवळसर माती खोदून टोपल्याने घरी आणायचा आणि गुपचूप गोवऱ्यांच्या चुऱ्यामध्ये मिसळून द्यायचा. असे ते मातीमिश्रित शेणखत हा लबाड येसाप्पा गरजू, नडलेल्या शेतकऱ्यांना दामदुपटीने विकायचा.
अशी लबाडी करून येसाप्पाजवळ बराच पैसा जमा झाला. काही दिवस तर त्याचे अत्यानंदात गेले, पण लवकरच त्यांच्या आनंदावर विरजण पडले. एखाद्या समारंभाच्या गाजावाजाऐवजी गावात धूमधडाक्यात चोरीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे आता घरातील रुपये पैसे कसे लपवू अन् चोरांपासून कसे वाचवू? असा गहन प्रश्न येसाप्पाच्या समोर उभा ठाकला. शेवटी गावातील चोऱ्या बंद होईपर्यंत आपल्या लहानशा शेतात एखादा खड्डा खोदून त्यात रुपयांची छोटीशी लाकडी पेटी ठेवायची आणि मातीने बुजवायची, असे येसाप्पाने ठरवले आणि त्याने रुपये एका छोट्या लाकडी पेटीत ठेवून ती पेटी गुपचूप आपल्या शेतात पुरून ठेवली नि काही अंशी तरी ते मनातल्या मनात चुरम्याचे लाडू खात निश्चिंत झाला.
पण शेवटी चोरांचेही दिवस भरले. वाईट कृत्याचं त्यांना कटू फळ मिळाले. चोरी करताना गडबडीत धक्का लागून एका चोराच्या अंगावर घरातील फळीवरचा घासलेटचा पेटता दिवा पडला. दिव्यातील केरोसिन तेल अंगावर सांडल्यामुळे तो चोर पेटला. त्याला विझविताना त्याचे दोन साथीदारही होरपळले व त्यांना काही पळून जाता आले नाही. त्यामुळे ते अनायासेच गावकऱ्यांच्या हाती सापडले. चोऱ्या बंद झाल्या आणि येसाप्पाने मोठ्या समाधानाने सुटकेचा नि:श्वास सोडला. मोठ्या हर्षाने येसाप्पा व त्याची बायको एके दिवशी शेतात गेली. जेथे रुपयांची पेटी पुरून ठेवली होती, तेथे येसाप्पा खड्डा खोदू लागला व त्याची बायको टेहळणी करू लागली. थोडा खड्डा खोदून होताच येसाप्पा एकदम आक्साबोक्शी रडू लागला, छाती बडवू लागला. त्याचा आवाज ऐकून त्याची बायको व आजूबाजूच्या शेतावर असलेले शेतकरी, कष्टकरीसुद्धा धावत आले. येसाप्पाच्या लाकडी पेटीला वाळवी लागून ती पूर्णपणे जीर्ण झाली होती. तिला छिद्रे पडली होती, ती आपोआप तुटली, फुटली होती. पेटीच खराब झाल्याने, कुजल्यामुळे पेटी उचलता बरोबर त्याच्या हातात ती खराब झालेली लाकडी पेटी अर्धवटच आली, त्यातील सर्व रुपये छिद्रे पडून सडल्याने त्यांची माती झाली होती ते बघूनच येसाप्पा ऊर बडवून रडत होता. त्यामुळे त्याची बायकोसुद्धा मोठा गळा काढून रडायला लागली.
हा तमाशा पाहून धावून आलेले लोक जे समजायचे ते समजले. मातीचा पैसा मातीत गेला अन् लबाड येसाप्पाला धडा मिळाला. असे कुजबुजत लोक आल्या वाटेने आपापल्या शेतात परत गेले.