Monday, October 20, 2025
Happy Diwali

निष्काळजीपणाचा कळस; डॉक्टरांकडून महिलेच्या पोटातच राहिली कात्री

निष्काळजीपणाचा कळस; डॉक्टरांकडून महिलेच्या पोटातच राहिली कात्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये डॉक्टरांचा मोठा निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे. एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे केरळमधील एका महिलेला गेली पाच वर्षे त्रासात काढावी लागली. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून फोरसेप (शस्त्रक्रियेत वापरण्यात येणारी कात्री) काढण्यात आली आहे. ही कात्री पाच वर्षांपूर्वी केलेल्या ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांकडून चुकून पोटात राहिली होती. हर्शिना असे या महिलेचे नाव सांगितले आहे. ती मूळची केरळमधील कोझिकोडची आहे.

पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ मध्ये काही प्रॉब्लेममुळे हर्शिनाच्या पोटाची दोनदा शस्त्रक्रिया झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर २०१७ मध्ये कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये आणखी एक ऑपरेशन करण्यात आले. पुन्हा शस्त्रक्रिया करूनही हर्शिनाच्या वेदना कमी झाल्या नाहीत. बराच काळ झाला तरी पोटात दुखत होते. हर्शिनाच्या या त्रासाचे कारण डॉक्टरांना समजू शकले नाही. डॉक्टरांनी तिला भरपूर अँटिबायोटिक्स दिल्या पण ही औषधंही तिच्या वेदना कमी करू शकली नाही.

सप्टेंबर २०२२ पर्यंत वेदना असह्य झाल्यामुळे हर्शिनाने तपासणीसाठी खासगी डॉक्टरांकडे धाव घेतली. मात्र, सीटी स्कॅनचा अहवाल आल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या महिलेवर पाच वर्षांपूर्वी कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच शस्त्रक्रियेदरम्यान कोझिकोडच्या वैद्यकीय डॉक्टरांनी निष्काळजीपणे कात्री पोटातच ठेवली होती. त्यामुळे महिलेच्या पोटात गंभीर संसर्ग झाला होता. हे समजल्यावर ती परत कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये आली तेव्हा डॉक्टरांनी घाईघाईने महिलेची चौथी शस्त्रक्रिया करून ही कात्री बाहेर काढली.

या महिलेला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. महिलेने आता राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. कोझिकोड रुग्णालयानेही चौकशीचे आदेश दिले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, कोझिकोड मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ईव्ही गोपी यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. 'आमच्याकडे शस्त्रक्रिया केल्यानंतर महिलेने दोनवेळा खासगी रुग्णालयातही ऑपरेशन केले होते. सुरुवातीच्या तपासात शस्त्रक्रियेचे कोणतेही उपकरण गायब नसल्याचे समोर आले आहे'. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment