सुभाष म. म्हात्रे
छत्रपती शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या रायगड जिल्ह्याचे स्वरूप आता झपाट्याने बदलत आहे. भात, मासे आणि मीठ यांचेच प्रामुख्याने उत्पादन घेत असलेल्या या जिल्ह्याचे मागासलेपण घालविण्यासाठी काही वर्षांपूर्वी औद्योगिकीकरण झाले. एवढेच नव्हे, तर जिल्ह्यातील हिरवीगार वृक्षराजी, श्रीवर्धन, दिवेआगर, मुरुड, काशिद, रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, अलिबाग, वरसोली, किहीम, आवास, सासवणे, मांडवा, सारळ आदी ठिकाणचे समुद्रकिनारे आणि पावसाळ्यात कोसळणारे धबधबेही पर्यटकांना आकर्षित करतात. आचार्य विनोबा भावे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, भारताचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख, इतिहास संशोधक दत्तो वामन पोतदार, भारताचे सरसेनापती जनरल अरुणकुमार वैद्य, कामगार नेते वा. म. जोशी, गं. द. आंबेकर, वामन मल्हार जोशी, नाटककार रा. ग. गडकरी, शिल्पकार नानासाहेब करमरकर आदी रत्नेही याच जिल्ह्याने दिली. आहेत.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचे प्रयत्न
भात, मासे, आणि मीठ यांचेच प्रामुख्याने उत्पादन घेत असलेल्या या जिल्ह्याचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. जिल्ह्याचे मागासलेपण घालविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या जिल्ह्यात कोट्यवधींची औद्योगिक गुंतवणूक केली आहे. त्यातून जिल्ह्याचे संपूर्ण मागासलेपण गेलेले नसले, तरी काहीअंशी रोजगाराचा प्रश्न मिटला आहे. जिल्ह्यात अजूनही औद्योगिक गुंतवणूक होण्याची शक्यता असून, मुरुड तालुक्यातील आगरदांडा परिसरात अदाणी बंदराच्याही प्रकल्पाचे काम सुरू आहे. तसेच दिघी-दिल्ली क्वॉरिडोर, अलिबाग-विरार क्वॉरिडोर त्याचबरोबर जे.एस.डब्ल्यू, गेल कंपनीचे विस्तारीकरण, रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीकिनारी प्रस्तावित असलेला बल्क फार्मा प्रकल्प उभारण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यातील निर्यात व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी पायाभूत सुविधा विकासावर शासनाकडून भर दिला गेला आहे. आदिवासी मुलांसाठी चांगले वसतिगृह असावे यासाठी सुधागड (पाली) आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृह इमारत बांधकामासाठी शासनाने १२ कोटी ५० लाख रकमेस प्रशासकीय मान्यात देऊन विकासात आणखी एक भर पाडली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील न्यायालयीन यंत्रणेचे भौतिक सक्षमीकरण करण्याचा यशस्वी प्रयत्नही शासनाकडून केला गेला आहे. पावसाळ्यात लाँच वाहतूक बंद राहत असल्याने बरेचशे पर्यटक मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरून आपापल्या वाहनांनी प्रवास करतात. रायगड जिल्ह्यातून कोकणात जाणारा मुंबई-गोवा हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या महामार्गाचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हाती घेतला आहे. यासाठी १०३६ कोटी १५ लाख रुपये किमतीच्या १३१.८७ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यास रायगडसह कोकणातील चाकरमान्यांना जलदगतीने कोकणात जाता य़ेईल. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न भिजत घोंगडे पडले होते. तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्याने अलिबाग तालुक्यातील उसर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊ घातले आहे. रायगड जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी ११.५८ टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. यापैकी ४० टक्के लोकसंख्या कातकरी बांधवांची आहे. शासन स्तरावरून आदिवासींचा आर्थिक सामाजिक विकास करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात; परंतु तरीही आदिवासी अनेक सोयीसुविधांपासून वंचित होते. त्यामुळे त्यांचा सर्वागीण विकास होण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून एक सप्तसूत्री निश्चित करण्यात आली. त्या माध्यमातून आदिवासींच्या कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शन व नियंत्रण केले जात असल्याने त्यांच्याही जीवनात नव्याने सकाळ उजाडणार आहे. जिल्ह्याचा विकास साधतानाच पेण तालुक्यातील गागोदे येथे आचार्य विनोबा भावे यांचे शिल्पही उभारण्याचे ठरविले गेले आहे. जिल्ह्यात शिवकालीन अनेक किल्ले असून, पैकी बरेचशा किल्ल्यांची पडझड झाली आहे. हे किल्ले सध्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्य़ारित असून, त्यातील रायगड किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे.
पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार
मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा जिल्ह्यांना लागूनच असलेला रायगड जिल्हा हा थोर साधुसंतांचा जिल्हा असून, या जिल्ह्याकडे धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आणि पर्यटनदृष्ट्याही पाहिले जाते. जिल्ह्यात असणारे समुद्रकिनारे, प्राचिन गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि पर्यटन स्थळांचा विचार करता, शासनाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांचा कायापालट करण्याचेही शासनाने ठरविले आहे. त्यासाठी ४५ कोटींपैकी पहिल्या टप्प्यात २० कोटी निधी वितरणास शासनाची मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. त्यातून स्थानिकांना लॉजिंग-बोर्डींग, उपहारगृहे, खानावळीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झालेला असतानाच दुसरीकडे ताजी भाजी, ओली मासळी, सुकी मासळी, लोणची, पापड, फेण्या, कुरडया, अन्य स्थानिक मालालाही पर्यटकांकडून चांगला उठाव होत आहे. रायगड जिल्ह्याला जोडून असलेल्या मुंबई शहरातून पर्यटकांना अलिबागमार्गे जिल्ह्यात येता यावे यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा बंदर, भाऊचा धक्का ते रेवस बंदर लाँचसेवा आणि भाऊचा धक्का ते मांडवा बंदर या दरम्यान पर्यटकांसह वाहनांची ये जा व्हावी यासाठी शासनाकडून नव्याने रो-रो सेवा जलवाहतूक सुरु केल्यामुळे त्याचा पर्यटकांना चांगलाच फायदा झालेला असला तरी या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचाही रोजगाराचा प्रश्न सुटला आहे.