Friday, May 9, 2025

विशेष लेखसंपादकीयमहत्वाची बातमी

प्रहार : मराठी माणसाचा आवाज

प्रहार : मराठी माणसाचा आवाज

डॉ. सुकृत खांडेकर


९ ऑक्टोबर, आज दैनिक ‘प्रहार’ (मुंबई) चा चौदावा वर्धापन दिन. सन २००८ मध्ये याच दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘प्रहार’चा मुंबईत शुभारंभ झाला आणि गेल्या चौदा वर्षांत अन्यायाविरोधात घणाघाती आवाज उठविणाऱ्या या वृत्तपत्राने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केला.


प्रहारच्या मुंबई आवृत्तीच्या पाठोपाठ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अशा दोन आवृत्यांना त्याच वर्षी म्हणजे महिनाभरातच दि. ९ नोव्हेंबर २००८ रोजी सुरुवात झाली आणि मुंबई - कोकणात प्रहार म्हणजे कोकणी माणसाच्या मनाचे आणि भावनांचे प्रतिबिंब अशी या वृत्तपत्राची ओळख झाली. या वर्षी मराठी दिनापासून प्रहारने नाशिकमध्ये प्रवेश केला आणि उत्तर महाराष्ट्रातही वाचकांनी प्रहारचे उत्स्फूर्त स्वागत केले. वृत्तपत्राच्या जीवनात चौदा वर्षे म्हणजे फार मोठा कालवधी नाही आणि फार लहानही नाही. पण नारायण राणे, निलेश राणे, नितश राणे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली प्रहारची घोडदौड चालू आहे. रोखठोक राजकीय भूमिका आणि वाचकांशी बांधिलकी या सूत्रातून प्रहारने मराठी वाचकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे.


दोन वर्षे कोविड १९ या महामारीच्या संकटातच गेली. या दोन वर्षांत अन्य क्षेत्रांप्रमाणे लहान-मोठ्या सर्व वृत्तपत्रांवर मोठे संकट कोसळले होते. एकीकडे कर्मचारी कामावर येऊ शकत नव्हते, दोन-तीन महिने तर वृत्तपत्रांची छपाई कशी करावी व छापलेले अंक वाचकांपर्यंत कसे पोहोचवावेत अशा संकटात सारा मीडिया होरपळून निघाला होता. जाहिरातींचे उत्पन्न विलक्षण घटल्यामुळे वृत्तपत्र चालवायचे कसे, असा यक्षप्रश्न मीडियापुढे निर्माण झाला होता. प्रहारही कमालीच्या संकटात सापडला होता. पण अशा संकटातून प्रहार तावून सुलाखून बाहेर पडला. राणे परिवाराने जो धीर दिला, जे मोलाचे मार्गदर्शन केले, त्यातून प्रहारने पुन्हा उभारी घेतली व गेल्या आठ-दहा महिन्यांत शब्दाला सत्याची धार हे ब्रीदवाक्य असलेला प्रहार पुन्हा आक्रमकपणे स्पर्धेत उतरला.


प्रहारचे सर्वेसर्वा नारायण राणे हे नेहमीच राजकीय पटलावर चर्चेत असतात. त्यांचे निर्णय पक्के असतात. दिलेला शब्द पाळला पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असतो. कोणाची भिडभाड न बाळगता ते नेहमीच मैदानात शड्डू ठोकून उभे असतात. त्यांची भूमिका कोणाला किती मानवेल याची पर्वा न करता, प्रहार ठामपणे मांडत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणात राणेसाहेब म्हणजे बेधडक - बिनधास्त नेतृत्व अशी ओळख आहे, तशीच प्रतिमा प्रहारची असली पाहिजे, त्यासाठी सर्व प्रहार परिवार सदैव दक्ष असतो. प्रहारमधील लिखाणाने राजकारणात अनेक शत्रू निर्माण झाले, पण प्रहारमधील शब्द चुकीचे आहेत किंवा वास्तव नाहीत, असा कोणीही आरोप करू शकलेले नाही. चेंबूरच्या शाखाप्रमुखापासून ते नगरसेवक, आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री आता केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचलेले नारायण राणे हे कधीच डगमगले नाहीत किंवा त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही.


प्रहारला संपादक स्वतंत्र असतो आणि स्वत: नारायण राणे हे सल्लागार संपादक आहेत. प्रहारचे धोरण - भूमिका ते ठरवतात, पण जे प्रसिद्ध होईल त्यामागे सत्य असलेच पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असतो. आल्हाद गोडबोले, हे प्रहारचे पहिले संपादक होते, नंतर महेश म्हात्रे, मधुकर भावे अनेक वर्षं संपादक होते. विजय बाबर यांच्यानंतर नारायण राणे यांनी प्रहारच्या संपादकपदाची जबाबदारी अस्मादिकांवर सोपवली. प्रहार हे राजकीय वृत्तपत्र असले तरी त्याची नाळ ही मराठी माणसाची जोडलेली आहे.


प्रहारच्या दि. ८ ऑक्टोबरच्या पहिल्या अंकाच्या राणेसाहेबांनी लिहिलेल्या पहिल्या अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाच्या नागरिकापर्यंत बातम्या पोहोचविणे हा प्रहारचा हेतू राहील. त्या माणसाच्या सार्वांगीण विकासासाठी प्रहार झटणार असून विकास, उन्नती व प्रगतीसाठी धारधार शब्दांनी हे वृत्तपत्र प्रहार करील.…


नारायण राणे, निलेश राणे व नितेश राणे हे कुटुंबीय भाजपमध्ये आहेत. राणे स्वत: केंद्रात मोदी सरकारमध्ये मंत्री, निलेश हे माजी खासदार व भाजपचे प्रदेश सचिव व नितेश हे भाजपचे आमदार आहेत. भाजपची भूमिका प्रहारमधून कणखरपणे मांडली जाते. मोदी-शहा यांचे विचार प्रहारमधून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. पण विरोधी पक्षांकडे प्रहार दुर्लक्ष करतो असे होत नाही. राणे कुटुंबीय हे भाजपमध्ये असल्याने भाजपला आपली भूमिका परखडपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रहार हे धारदार शस्त्र मिळाले आहे.


राज्यात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. शिवसेनेने भाजपशी युती करून निवडणूक लढवली. जनतेने भाजप - शिवसेनेला राज्यात सरकार स्थापन करण्याचा जनादेश दिला होता. पण, मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने शिवसेनेने काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली व उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सरकार स्थापन झाले. खरे तर हे सरकार सहा महिन्यांतच कोसळले असते, पण कोविडचे संरक्षक कवच ठाकरे सरकारला लाभले. कोविड संपताच शिवसेनेतील ४० व समर्थक १० अशा पन्नास आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले व ठाकरे सरकार अपेक्षेप्रमाणे कोसळले. ठाकरे सरकारच्या काळात प्रहारने सतत हल्लाबोल भूमिका बजावली. कोविड काळातील भ्रष्टाचाराचा बुरखा फाडला. आरोग्य सेवेकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षाविरोधात आवाज उठवला. ऑक्सिजन, इस्पितळातील बेड्स आणि इंजेक्शने यांच्या कमतरतेविषयी सरकारला धारेवर धरले. तसेच निलेश व नितेश राणे यांनी कोविड काळात सर्वसामान्य जनतेला केलेल्या मौल्यवान व तातडीच्या मदतीकडे सरकारचे लक्ष वेधले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झालेली असताना तीन महिने साधे मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध झाले नाही व मुख्यमंत्र्यांना नेमके काय झाले होते हे आजतागायत जनतेला समजले नाही. या प्रश्नावरही प्रहारने पाठपुरावा केला. महापालिकेच्या सेवा- सुविधा देताना जी कामे व कंत्राटे सग्या-सोयऱ्यांना दिली गेली, त्यात प्रचंड गैरव्यवहार झाला, त्यावर भाजपचे नगरसेवक, आमदार यांनी मोठा आक्रोश केला, त्यालाही प्रहारमधून ठळक प्रसिद्धी दिली. अडीच वर्षांत तीन वेळा तेही एकूण चार तास मंत्रालयात गेलेल्या मुख्यमंत्र्यांची गिनीज बुकमध्ये नोंद होईल, असे भाकीत प्रहारने वर्तवले होते.


देशाचे पंतप्रधान कोविड काळात एकही दिवस घरी बसून नव्हते, अन्य राज्याचे मुख्यमंत्री घरात कोंडून राहिले नव्हते, एवढेच नव्हे तर महाआघाडीतील अन्य घटक पक्षांचे नेतेही बाहेर फिरत होते, मग राज्याचा मुख्यमंत्री घरात का बसून राहतो, याकडे प्रहारने अनेकदा लक्ष वेधले. एसटी कर्मचाऱ्यांचा पाच महिने संप झाला, तेव्हा नव्वद हजार कर्मचाऱ्यांच्या बाजूने प्रहार ठामपणे उभा राहिला.


संपूर्ण राज्याला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. वर्षाअखेरीस किंवा नंतर कधीही ही निवडणूक अपेक्षित आहे. पंचेचाळीस हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेच्या चाव्या कोणाकडे जाणार, याची उत्सुकता देशभर आहे. तीस वर्षे महापालिका आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या शिवसेनेला लोक कंटाळले आहेत. आता मुंबईत जनतेला परिवर्तन हवे आहे. शिवसेनेवर बंदी घालणार असाल, तर त्या क्षणी काँग्रेसची तिरडी बांधली जाईल, असा इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष रजनी पटेल यांना दिला होता. ज्या छगन भुजबळ यांना शिवसेनाप्रमुखांनी भाजी मंडईतून महापौरपदाकडे नेले त्यांनी शरद पवारांच्या पक्षात गेल्यावर राज्याचे गृहमंत्री म्हणून शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याच पराक्रम करून दाखवला. त्याच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी दावणीला बांधला हेच पक्षातील बहुसंख्य आमदार - खासदारांना खटकले. त्यांच्या भावनांना प्रहारने वाचा फोडली. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेली, ही जनमानसाच्या मनात काय आहे त्याची झलक होती. पण त्याची दखल सेनेत कोणाला घ्यावीशी वाटली नाही. महाआघाडी सरकारचा रिमोट शरद पवारांच्या हाती होता हे लपून राहिलेले नाही. राष्ट्रवादीचा जनता दरबार रोजजोरात चालू होता. पण ठाकरे सरकारच्या काळात शिवसेना भवन ओस पडले होते, याकडे प्रहारने वेळोवेळी लक्ष वेधले. सुशांत सिंग, दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणाची तड लागावी म्हणून प्रहारने सतत पाठपुरावा केला.


ठाकरे सरकार सत्तेवर असताना, आम्ही तुम्हाला उघडे केल्याशिवाय राहणार नाही, हे आमचे सरकार आहे, आमच्या हातात बरेच काही आहे, भाजपने नौटंकी बंद करावी, आम्ही सीबीआय - ईडीला घाबरत नाही, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप है,… अशा धमक्या देणाऱ्यांचे पुढे काय झाले हे सर्व राज्याने बघितले आहे. नारायण राणे व राणे कुटुंबीयांना पोलीस प्रशासनाची फौज वापरून व राजकीय दबाव टाकून कसा त्रास देण्याचा प्रयत्न केला, हे सर्व तेरा कोटी जनतेने टीव्हीच्या पडद्यावर बघितले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा वेळोवेळी ठाकरे सरकारने कसा अवमान केला व त्यांच्याविषयी कशी असभ्य भाषा वापरली त्या विरोधातही प्रहारने आवाज उठवला. ज्याचा एमओयू झालाच नाही, तो प्रकल्प गुजरातमध्ये गेला म्हणून थयथयाट करून मराठी माणसाची मने भडकविणाऱ्यांनाही प्रहारने उघडे पाडले. लॉकडाऊनमध्ये बेस्ट, एसटी कर्मचारी, शासकीय सेवेतील अत्यावश्यक कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार, इस्पितळातील कर्मचारी यांच्या सेवेचे आम्ही कौतुकही केले व त्यांच्या अडचणींचा पाढाही वाचला.८ मार्च रोजी ‘महिला दिन’ हा उपक्रमही प्रहारच्या वतीने राबवत मान्यवर महिलांना आमंत्रित करण्यात आले. रविवारची कोलाज पुरवणी, वाचकांना मते मांडण्यासाठी प्रहार व्यासपीठ यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे.


डॉ. उदय निरगुडकर, डॉ. विजया वाड, विलास खानोलकर, मीनाक्षी जगदाळे, शिबानी जोशी, दीपक परब, श्रीनिवास बेलसरे, अनुराधा परब, डॉ. वीणा सानेकर, प्रतिभा सराफ, सतीश पाटणकर, अॅड. रिया करंजकर, प्रियानी पाटील, मृणालिनी कुलकर्णी, अनघा निकम, अर्चना सोंडे, लीना राजवाडे अशा अनेक नामवंत लेखक-पत्रकार यांचे स्तंभ हे ‘प्रहार’चे वैभव आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत प्रहार जनतेचा बनला आहे.


प्रहारचे महाव्यवस्थापक मनीष राणे, प्रशासन व लेखा प्रमुख ज्ञानेश सावंत, जाहिरात प्रमुख कौशल श्रीवास्तव, वितरण व्यवस्थापक शाहिद अख्तर, आयटी सेलचे प्रमुख राकेश दांडेकर अशा सर्वांच्या सक्रिय सहभागातून प्रहारची दमदार वाटचाल चालू आहे. वाचकांचे प्रेम हीच आमची शिदोरी आहे.

Comments
Add Comment