अहमदाबाद (वृत्तसंस्था) : नागपूरच्या वैभव श्रीरामेच्या सोनेरी यशाच्या मोहिमेला कायम ठेवत प्रज्ञा आणि सानिकाने महाराष्ट्र संघाला योगासनात सुवर्णपदक जिंकून दिले. महाराष्ट्राच्या या दोन्ही युवा योगपटू आर्टिस्टिक इव्हेंटमध्ये चॅम्पियन ठरल्या. त्यामुळे महाराष्ट्र संघाला योगासनामध्ये आपल्या खात्यावर तिसऱ्या सुवर्णपदकाची नोंद करता आली. पदकाच्या याच कामगिरीला उजाळा देत रत्नागिरीच्या पूर्वा आणि प्राप्ती या बहिणींनी स्पर्धेत रौप्य पदकाचा बहुमान पटकावला. यासह पूर्वाने स्पर्धेत दुसरे पदक आपल्या नावे केले.
मुख्य प्रशिक्षक संदेश खरे आणि व्यवस्थापक सुहास पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासनात महाराष्ट्र संघ सर्वोत्तम यश संपादन करत आहे. महिलांच्या आर्टिस्टिक पेअर इव्हेंटमध्ये महाराष्ट्र संघाकडून प्रज्ञा आणि सानिका यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सर्वाधिक गुणाची कमाई करत या दोघींनी सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. यासह महाराष्ट्राच्या नावे तिसरे सुवर्णपदकाची नोंद झाली. त्या पाठोपाठ रत्नागिरीच्या पूर्वा आणि प्राप्ती यांनी रौप्य पदक आपल्या नावे केले. त्यामुळे आता महाराष्ट्र संघाच्या नावे योगासन इव्हेंटमध्ये सहा पदकांची नोंद झाली. यामध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे.
योगपटू प्रज्ञा, सानिका ,पूर्वा आणि प्राप्ती यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाला योगासनामध्ये मोठे यश संपादन करता आले. पदके जिंकून या खेळाडूंनी महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. त्यांची राष्ट्रीय पातळीवरील ही कामगिरी निश्चितपणे अभिमानास्पद आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना पदकाच्या माध्यमातून मिळाले, अशा शब्दांत प्रशिक्षक संदेश खरे यांनी पदक विजेत्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला.
पूर्वा-प्राप्तीची लक्षवेधी कामगिरी
पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील तीन रौप्यपदक विजेत्या पूर्वाने आपली लहान बहीण प्राप्ती सोबत पदक पटकावले. आर्टिस्टिक पेअर मधील या दोघींची कामगिरी लक्षवेधी ठरली. सर्वोत्तम कसरत आणि लवचिकता संतुलन या सर्वोत्तम कामगिरीतून त्यांनी पदकाचा बहुमान पटकावला. मोठ्या बहिणीला सर्वोत्तम साथ देत प्राप्तीनेही लक्षवेधी कसरती केल्या.
योगासनाला चालना मिळाली : पूर्वा
राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून योगासन या पारंपरिक खेळ प्रकाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. त्यामुळे निश्चितपणे युवा खेळाडूंना या खेळ प्रकारासाठी प्रेरणा मिळेल. योगासनातील आमची बारा वर्षांची मेहनत पदकाच्या माध्यमातून आता यशस्वी ठरली आहे. युवा योगपटूंसाठी आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ ठरत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनातून देशांमध्ये योगासनाचा वेगाने प्रसार व प्रचार होईल. पारंपरिक वारसा लाभलेल्या योगासन इव्हेंटमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू आघाडीवर आहेत, अशा शब्दांत पूर्वाने पदक जिंकल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.