
डॉ. विजया वाड
त्याने विद्याशी मैत्री केली, वाढवली आणि घट्ट केली. विद्या सुरूप आणि तब्येतीनं सुखरूप होती. पण महत्त्वाचं कारण हे नव्हतं. तिची आई अमेरिकेत होती हे होतं. ती सारखी विद्याला जवळ बोलावे. आज ना उद्या, विद्या आईचं ऐकेल, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, असं होऊन आपणही आपोआप अमेरिकेला जाऊ हे स्वप्न! खरंच हेच नि एवढंच कारण होतं. छुपं! आतं आतलं!
“विद्या, अमेरिका हा देश सुंदर आहे ना!”
“कम्मालीचा सुंदर, स्वच्छ नि हिरवा हिरवा देश आहे.”
“मग आपण जाऊया नं.”
“नक्की जाऊया.”
“आईची तुझ्या भेट होईल.”
“नक्कीच भेटवीन मी तुला माझ्या आईला.”
“बाबा वेगळे का राहतात गं?”
“त्यांना आईचं वागणं पटत नाही. कळेल, भेटलास की.” त्याला धीर होता. प्रत्यक्षच बघणार होता ना!
आणि ती वेळ जवळ आली.
धूमधडाक्यात लग्न लागलं. आई भारतात आली. कोणतीही कटुता नव्हती. तिच्याजवळ गोरा माणूस होता. सारी कामं करीत होता. अभिरुचीचं ऐकत होता.
‘राम’ त्याचं नाव. त्याच्या आईनं ठेवलेलं. राम सुस्वभावी. मोडकं मराठी बोले. ‘ती’ ‘तो’ ची गल्लत करीत असे. पण मिनी, तूनी ऐकताना गंमत येई. मराठी उत्तम समजे मात्र. लग्न लागले. सावध सारे, सावध वारे! विद्या खूश होती. आई म्हणाली, “हनिमूनला कॅलिफोर्नियाला चला. व्हिजिटर्स व्हिसा काढू तुझ्या नवऱ्याचा!”
“फॅन्टास्टिक. कुलू-मनाली बंद अमेरिका आगे.” तो उत्साहाने फसफसला. विद्या इतकी एक्सायटेड नव्हती. पण गेली खुशी खुशी ‘हनिमून’ कोणाला आवडत नाही सांगा?
व्हिसा प्रकरण लांबलं नाही हे सुदैव. ४ महिने व्हिसा मिळाला. ते दोघे अमेरिकेला गेले. तिच्या आईच्या मागे मागे फिरले. पण फॉर्मेलिटीज खूप होत्या. सॉरी, थँक्यू पावलोपावली होतं. ‘प्लीज’ तर पाचवीला पुजलेलं. विल यू प्लीज ओपन द डोअर? त्याला वाटलं, प्लीज मे आय गो टु टॉयलेट कसं बुवा नाही? आश्चर्यच आहे ना!
किती फॉर्मलपणा! लवकरच ‘भारतात जावे’ असे वाटले त्याला. आईच्या हातचा उनउनीत साधं वरण-भात खाऊ. वर साजूक तूप, लिंबू, लोणचं. फोडणी! आहा! क्या टेस्ट हैं! इथला फ्राईड राईस! तो आंबून गेला होता. तेच ते अन् तेच ते. चिकन नुसते बिनचवीचे मांसाचे गोळे. याक्! चिकन म्हणजे आपल्या नाकातोंडाला पाणी! जमायचंच नाही ना त्याखेरीज. तांदळाची भाकरी खायला जीव तुटत होता. विकतच्या पोळ्या दातांनी तोडून जीव तुटला होता अगदी. विटला होता. कधी एकदा तव्यावरची आईच्या हातची पोळी खातो असं झालेलं. विद्याशी मैत्री करून अमेरिका विकतची हौस फिटली होती.
विद्याची आई ‘पाव’ खाई. बिनचवीचे चिकन नि पाव. गोमांस खाई, ते तर डोक्यातच गेले त्याच्या. आपण असले काही करणार नाही त्याने सांगून टाकले. मोकळे मोकळे वाटले मग त्याला.
भारतात परत आल्यावर तो आनंदला. मोकळा झाला. विद्याला घेऊन दक्षिणेकडे गेला. डोंगर-दऱ्या जोडीने फिरला. एक झोपडी लागली.
“चहा प्यावासा वाटतो रे. ती झोपडीपाशी थांबली.
आतून एक गरीब जोडपे बाहेर आले. नमस्कार करून आत येण्याविषयी विनविले. तिने चहा प्यायची इच्छा व्यक्त केली “अभी बनाते हैं!” नवरा म्हणाला. बायकोने आनंदाने चहा केला. कपबशीत ओतून दिला.
“पैसे देऊ हं.” तिने त्या गरीब जोडप्याला आश्वस्त केले. पण त्या जोडीनं नाकारलं पैसे घेणं.
“हम भारत के लोग इतने गरीब नहीं की मेहमानोंको चाय ना पिला सके. यह प्यारका, आदरका तौफा हैं!”
त्याला कॅलिफोर्नियाची आठवण झाली. “५ डॉलर्स प्लीज. २।। डॉलर एक कप!” तो चहा फिरता फिरता त्यांनी एका हटमध्ये घेतला होता. मोजून पैसे देऊन. पिओ, मगर प्यारसे. पिओ मगर पैसे मोजकर या फरकाने तो मोहरून गेला.
“बघितलंस विद्या? अमेरिकेतला नि भारतातला फरक.”
“चांगलाच बघितला.”
“काय तुला जाणवलं?”
विद्यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. प्रेमानं थोपटून ती म्हणाली, “गरिबी डझ नॉट मॅटर माय डियर, मेरा भारत महान.” तिरंगा प्यारा प्यारा दारावर लहरत होता.