मृणालिनी कुलकर्णी
पोर्णिमा! चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस (पूर्ण चंद्र) पौर्णिमा असे म्हणतात. पौर्णिमेचा चंद्र निसर्गाचे सौंदर्य फुलवितो. फुलाचे चांदणे शिंपीत येणारी ही रात्र. (‘चांदणे शिंपित जाशी चालता…’ हे गाणं) पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात सारा आसमंत उजळून जातो. असे हे ‘पौर्णिमेचे चांदणे, सर्वांसाठी आनंदाचे लेणे’ चंद्र : आपुला सखासोबती!
आकाशातल्या चंद्राच्या साक्षीने पौर्णिमा रंगते आणि मनामनांतला चंद्र अधिक मोठा होत जातो. आपल्या जगण्याचा सोबती बनतो. चंद्र : आपुला सखासोबती!
तान्ह्या बाळाला झोपविताना ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई…, बाल्यावस्थेत – चांदोबा-चांदोबा भागलास का? श्रीरामाचा बालहट्ट ‘मला चंद्र हवा’ सर्वांना ज्ञात आहेच. बालगोपाळांचे चंदामामासोबत गप्पा मारत जेवण, थोड्या वरच्या वयात – प्रवासात आपल्यासोबत पळणारा, ढगाआड लपाछपी खेळणारा चांदोबा, तारुण्यात चंद्राला विनवणी करणारा प्रियकर – ‘धीरे धीरे चल, चांद गगनमें, काही ढल ना जाए रात, न तू जाने सपने…, आधा हैं चंद्रमा रात आधी, रह ना जाएे तेरी मेरी बात आधी…’ कोळी बांधवांचे पुनवेच्या चंद्राशी नाते ‘आज पुनवा सुटलंय दमानं …राजा सारंगा… पुनवेचा चंद्रमा आला घरी, चंदाची किरणे दर्यावरी…’ प्रत्येकाच्या मनांत घर केलेलं – ‘तोच चंद्रमा नभात आणि… दाही दिशा कशा फुलल्या, वनी वनी कुमुदिनी फुलल्या… उगवला चंद्र पुनवेचा…’ अशी अनेक, प्रत्येक टप्प्यावर सख्याप्रमाणे सोबत करणारी चंद्राची लडिवाळ गाणी त्याचबरोबर चंद्रोदयानंतर उपवास सोडणाऱ्यांचाही चंद्र : आपुला सखासोबती!
चंद्र हा पृथ्वी भोवती फिरणारा एकमेव नैसर्गिक उपग्रह. याच चंद्रावर मानवाने टाकलेले पाऊल आणि आज होत असलेली चांद्रयानाची उल्लेखनीय प्रगती… असाही चंद्र : आपुला सखासोबती!
प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचा विशेष संदेश आत्मसात केल्यास पूर्ण फुललेल्या चंद्राप्रमाणे आपले आयुष्य सुंदर व समृद्ध बनेल. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला, आश्विन पौर्णिमा म्हणतात. ती अनेक नावांनी
संबोधली जाते.
१. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञेपोटी शेतकरी घरात आलेले नवीन धान्य आहारात आणण्यापूर्वी त्याची पूजा करतात. ती नवान्न पौर्णिमा.
२. उत्तर प्रदेशात मथुरा, वृदांवन येथे राधा-गोपिकांसमवेत श्रीकृष्णाच्या रासक्रीडेशी संबंधित रास पौर्णिमा. (शरदाचे चांदणे…. नाचतो गोपीजनवृंद, वाजवी पावा गोविंद.)
३. हिंदू धर्मातील धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाचा शुभ दिवस शरद पौर्णिमा. शरद पौर्णिमा हा वर्षातील एकमेव दिवस जेव्हा चंद्र १६ चरणासह बाहेर पडतो. या दिवशी चंद्र १६ कलांनी परिपूर्ण बनलेला असतो. म्हणून सर्व पौर्णिमेत मोठी असणारी शरद पौर्णिमा सर्वश्रेष्ठ मानली जाते. हा रात्रीच्या सौंदर्याचा ऋतू. त्याचे वर्णन शारद सुंदर चंदेरी राती… या काव्यात आहेच. शरद पौर्णिमा माणसाला नवजीवन देते.
४. याच दिवसाला लक्ष्मी पूर्णिमा म्हणतात. कारण शरद पौर्णिमेलाच समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म झाला. पौर्णिमेच्या शुभ्र प्रकाशात देवी लक्ष्मी पृथ्वीवर परिभ्रमण करीत घराघरात फिरते नि पाहते कोण जागे आहे? लक्ष्मीच्या स्वागतासाठी, आशीर्वाद मिळविण्यासाठी घराचे दरवाजे उघडे ठेवतात.
शरद आणि आश्विनी पौर्णिमेलाच येणाऱ्या भारतीय बौद्ध संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस ‘कोजागिरी पौर्णिमा.’ को जागर्ती? कोण जागे आहे? येथे जागे राहणे म्हणजे न झोपणे नव्हे, तर सजग राहणे, सतर्क राहणे, ज्ञानाची लालसा असणे हे होय. ‘जागरूकता’ (कर्तव्याची जाणीव) हा अर्थ अभिप्रेत आहे. जागृत राहिल्यास कोणतेही संकट निभावता येईल नि सुखसमृद्धी राहील.
कोजागिरीला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. कोजागिरी पौर्णिमा संदेश देते ‘यशाचं मधुर चांदणं हवं असेल, तर प्रयत्नांचा चंद्रमा अखंड तेवत ठेवला पाहिजे.’ झोपलेल्यांना जाग करण्याची, जागे ठेवण्याची क्षमता/हातोटी कोजागिरीत आहे. कोजागिरी पौर्णिमा सर्वांना नवी उमेद देते. कोजागिरीला चंद्रासह माता लक्ष्मीची पूजा करतात. केलेली तांदळाची खीर किंवा मसाल्याचे दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवतात, कारण चंद्राच्या किरणांत गुणकारी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. सब बिमारी दूर होती हैं, असा
समज आहे.
कोजागिरी पौर्णिमा : उत्सव चांदण्या रातीचा! कोजागिरीच्या टपोऱ्या चांदण्यात फिरण्यासाठी आजकाल सारेच बाहेर येतात. चांदण्याच्या प्रकाशासाठी मुंबईकर शहरातील दिव्यापासून दूर निसर्गाजवळ जातात. कोजागिरी पौर्णिमा हा एक कौटुंबिक किंवा समवयस्कांचा मौजमजेचा दिवस. सर्व एकत्र येतात. आकाशातील पिठूर चांदण्यात, आल्हाददायक वातावरणात, रात्रीचा गार वारा प्रत्येकाचा ताण कमी करतो. मन हलके होते. गॅलरी, टेरेस, सोसायटीच्या प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या रात्री ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्याही खूप आहे. पर्यटन क्षेत्र या दिवसासाठी खास वेगळ्या पाहुण्यांना बोलावून कार्यक्रम आखतात. जवळचे हिल स्टेशन, बागा, समुद्रकिनारे सारे कोजागिरीला माणसांनी फुलून गेलेले असतात. गिरनार पर्वताच्या १०,००० पायऱ्या चढण्यासाठी बहुधा पूर्णिमेची निवड करतात. विशेषतः कोजागिरीला झुंबड असते. दिवसापेक्षा अलीकडे नव्या पिढीला रात्र आवडते. ज्येष्ठ नागरिक, मधल्या वयाची/नवोदित जोडपीही जेवणानंतर रोज चांदण्यात फिरावयास जातात. चंद्राची शांतता सगळ्यांना आकर्षित करते. खरा चंद्रोत्सव फुलतो, रंगतो, भावतो, स्मरतो कोजागिरीला पौर्णिमेला, सोबत आटवलेले मसाल्याचे दूध. चंद्र तोच असतो तरी कोजागिरीला पौर्णिमेला नवा भासतो. म्हणून चंद्र : आपुला सखासोबती!
कोजागिरीच्याच दिवशीच रायगडावर हिरा गवळण आपल्या बाळासाठी, बाळाच्या ओढीने अवघड कडा उतरली ही ऐतिहासिक घटना कोण विसरेल?
चंद्राची शुभ्रता, शीतलता, कोमलता, उदारता, तुम्हा आणि तुमच्या परिवाराला लाभो, याच माझ्या कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. पौर्णिमा हे विजयाचे प्रतीक आहे. आपल्या जगण्यावर, शीतलता पसरविणारा चंद्र, जेथे दाहकता नाही, निराशेचा ढग नाही, म्हणून चंद्र : आपुला सखासोबती!