गांधीनगर (वृत्तसंस्था) : पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा नगरीत प्रशिक्षण घेणाऱ्या मानसी मोहिते हिने महिलांच्या ट्रायथलॉन स्पर्धेत रौप्यपदकाचे स्वप्न साकार केले. या क्रीडा प्रकारात ७५० मीटर्स जलतरण, वीस किलोमीटर सायकलिंग आणि पाच किलोमीटर धावणे अशा तीन शर्यतींचा समावेश होता. तिने ही शर्यत एक तास तेरा मिनिटे दहा सेकंदांत पूर्ण केली.
दिनांक ११ आक्टोबर रोजी होणाऱ्या मिश्र रिले स्पर्धेत महाराष्ट्राचा पुरुष व महिला संघ सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार आहे. या रिले स्पर्धेत एक पुरुष -एक महिला -पुन्हा एक पुरुष-एक महिला असा संघ या स्पर्धेत भाग घेत असतो. माझी ही पहिलीच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असली तरी या स्पर्धेसाठी बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर सराव केला होता. त्यामुळे पदक मिळवण्याची मला खात्री होती असे १८ वर्षीय खेळाडू मानसी हिने सांगितले. तिला महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक कमलेश नगरकर व व्यवस्थापक प्रमोद पारसी यांचेही बहुमोल सहकार्य मिळाले आहे.
मानसी हिने आतापर्यंत दोन वेळा आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेतला असून दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने रौप्य पदक मिळविले होते तर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिला सातवे स्थान मिळाले होते. तिने आंतरराष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आजपर्यंत ट्रायथलॉनच्या सहा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले आहे.