रमेश तांबे
एक होती चिमणी. तिला बघायचा होता पिक्चर. मग ती गेली आईकडे आणि म्हणाली, ‘आई आई… मला ना पिक्चर बघायचाय.’ आई गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, ‘अगं ये चिमणे… पिक्चर माणसे बनवतात आणि माणसेच बघतात. आपल्यासारख्या पक्ष्यांचं तिथं काय काम? चिमणी म्हणाली… ‘नाही कसं नाही!’ प्राणी, पक्षी जर पिक्चरमध्ये काम करू शकतात, तर ते बघू का शकत नाही? आई बिचारी चिमणीपुढं गप्पच बसली. कारण चिमणी तर खरेच बोलली होती… चिमणीला वाटलं, आईशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. मग ती टाटा करून निघाली उडत.
उडता उडता तिला भेटला पोपट. ती पोपटाला म्हणाली, ‘अरे पोपट्या येतोस का पिक्चरला? पिक्चरचं नाव ऐकताच पोपटाला आश्चर्य वाटलं. पण लगेच सावध होऊन तो म्हणाला, ‘ही काय नवी भानगड पिक्चर बघायची! मी तर बाबा नाही येणार… पिक्चरमधली माणसं बंदुकीने मारतात पक्ष्यांना; मी बघितलंय किती वेळा!’ पोपटाला बाय बाय करून निघाली चिमणी… नव्या मित्राच्या शोधात!
पुढे वाटेत भेटला मोर. मोर रानात दाणे टिपत होता. मधूनच पिसारा फुलवत होता. चिमणी मोराजवळ गेली अन् मोराला म्हणाली, ‘जरा थांबव तुझं पिसारा फुलवणं आणि एन्जाॅय कर माझ्याबरोबर पिक्चर बघणं. मोर म्हणाला,
‘नको रे बाबा, तिथं खूप लोक जमतात आणि खूप लोक असले की माणसं वेड्यासारखी वागतात. ते मला पकडतील, माझी पिसं पळवतील. मी नाही येत जा!’ मग चिमणीने आपले दोन इवलेसे पंख पसरवले, आकाशाकडे बघितले अन् भुरर्कन उडाली.
उडता उडता तिला दिसली एक काळी मैना. रानातल्या गवतावर तुरूतुरू उड्या मारीत होती. इवल्याशा चोचीने किडे टिपत होती. मग चिमणी गेली मैनेजवळ आणि तिला म्हणाली, ‘अगं ए मैना राणी… किडे खाऊन झाले असतील तर… ऐक माझं अन् चल पिक्चर बघायला.’ पिक्चरचं नाव काढताच मैना एकदम खूश झाली आणि चिमणीला म्हणाली… ‘चिमणे चिमणे, मला ना, पिक्चर खूपच आवडतो. चल आपण दोघी जाऊया पिक्चरला, पिक्चर बघू, हॉटेलात जाऊ!’ मैनेचं बोलणं मैनेची आई झाडावर बसून ऐकत होती. ‘पिक्चरला’ जायचं ठरतंय तेवढ्यात मैनेची आई ओरडली, ‘मैने, काही जायचं नाही पिक्चरला! तिथं धोका आहे आपल्याला, लोक तुला पकडतील, पिंजऱ्यात ठेवतील, तुला गाणं म्हणायला लावतील. माणसांचं खाणं तुला खायला देतील. तुझं उडणं बंद, रानावनात फिरणं बंद, मग काय करशील? आईचं म्हणणं मैनेला पटलं. ती चिमणीला म्हणाली, ‘चिमणे चिमणे, नाही जमायचं पिक्चरला यायला. त्यापेक्षा या रानातला पिक्चरच बरा!’
मैनेचा नकार ऐकून चिमणीला फारच वाईट वाटले. मैनेकडे न बघताच चिमणी उडाली आकाशात. मग चिमणी इकडे तिकडे खूप भटकली. आता काय पिक्चर बघणं होत नाही असं तिला वाटलं. मग ती दमून भागून एका झाडावर बसली. तेव्हा बाजूच्याच फांदीवर एक कावळा उगाच काव काव करीत होता. बघूया शेवटचा प्रयत्न करून म्हणून चिमणीने कावळ्याला विचारले, ‘कावळ्या कावळ्या पिक्चरला येतोस का?’ पिक्चरचे नाव काढताच कावळ्याचे डोळे चमकले, चेहरा आनंदाने फुलून गेला. काव काव काव असं दोनदा आनंदाने ओरडला. ‘चल चल जाऊ, उशीर नको करू’ कावळा म्हणाला. चला कुणीतरी आहे सोबत, असं म्हणून चिमणी पण खूश झाली. मग दोघे निघाले उडत उडत गावाच्या दिशेने. गावाच्या मध्यभागी एक होतं थिएटर… तिथं चालू होता एक पिक्चर. एका छोट्याशा खिडकीतून चिमणी आणि कावळा दोघे आत शिरले. पडद्यावर मोठ्या आवाजात गाणं सुरू होतं. हिरो हिरोईन नाचत गाणं म्हणत होते. लोक शांतपणे बघत होते. ते बघून चिमणीला खूप मजा आली. गाणे ऐकता ऐकता कावळ्याला आठवले, ‘अरे, आपला आवाजसुद्धा किती गोड आहे. मीसुद्धा गाऊ शकतो. लोकांना कळले, तर ते किती खूश होतील. माझी वाहवा करतील.
…आणि मग कावळा एकदम त्याच्या भेसूर, कर्कश, भसाड्या आवाजात गाऊ लागला. चिमणीने त्याला गप्प बसवायचा खूप प्रयत्न केला. पण तो काही ऐकेना. कावळ्याची कावकाव ऐकून लोक वैतागले. पिक्चर एकदम बंद झाला. थिअटरमधल्या लाइट लागल्या, अन् लोक कावळ्याला शोधू लागले. चिमणीला वाटले, आता काही खरे नाही. लोक पकडतील, मारतील. ती घाईघाईने कावळ्याला म्हणाली…. ‘अरे ए कावळ्या, चल निघ लवकर, आता मार खावा लागेल!’ लोकांची आरडाओरड ऐकून कावळादेखील घाबरला. लोक कावळ्याच्या दिशेने चपला फेकू लागले. हातातल्या वस्तू फेकू लागले. नशीब चांगले म्हणून लागलं नाही काही. कसेबसे दोघे त्या छोट्याशा खिडकीतून निसटले. धाप लागेपर्यंत उडत राहिले. गावापासून खूप लांब येऊन एका झाडावर बसले. चिमणी कावळ्यावर खूप रागावली आणि म्हणाली, ‘काय रे कावळ्या, एवढी का तुला गायची हौस? नशीब वाचलो, नाहीतर मेलोच असतो तुझ्या गाण्यापायी!’
पण कावळ्याला कळेनाच… लोक का रागावले. आपण तर किती छान गात होतो आणि मग कावळ्याने पुन्हा गायला सुरुवात केली. कर्कश… भसाड्या आवाजात. तशी चिमणीदेखील कानावर हात ठेवून भुर्रकन गेली उडून. त्यानंतर कोणतेच पक्षी कधीच पिक्चरला गेले नाहीत, कळलं!