श्रीनिवास बेलसरे
शम्मी कपूरचे सुरुवातीचे अनेक चित्रपट फारसे चालले नाहीत. ‘तुमसा नही देखा’ने (१९५७) त्याचे नशीब खऱ्या अर्थाने फळफळले. एक खुशालचेंडू आनंदी हिरो म्हणून तो प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘दिल देके देखो’ (१९५९) आणि ‘जंगली’ने (१९६१) तर त्याला अत्यंत यशस्वी नायक बनवले. ‘ब्रह्मचारी’(१९६८) या हिट ठरलेल्या सिनेमातील भूमिकेसाठी शम्मी कपूरला फिल्मफेअरचे ‘सर्वोत्तम अभिनेता’ पारितोषिक देण्यात आले. याशिवाय १९८२ला आलेल्या ‘विधाता’मधील भूमिकेला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचे फिल्मफेअरही देण्यात आले. फिल्मफेअरने त्याला जीवनगौरव पुरस्कार दिला १९९५ साली!
शम्मी कपूर त्याच्या खोडकर, हलक्या-फुलक्या भूमिकांसाठी आणि बेधुंद नाचण्याकरता प्रसिद्ध होता. नृत्याच्या स्टेप्स ठरवण्यासाठी त्याला कोरियोग्राफरही लागत नसे. त्यामुळे त्याला भारतीय चित्रपटसृष्टीचा ‘एल्व्हिस प्रिसले’ म्हणत.
शम्मी कपूरच्या सिनेमातील गाणी सहसा हिट होत असत. अर्थात या यशामागे त्यावेळचे गीतकार आणि संगीतकारही होते, हा भाग वेगळा! तशी ‘राजकुमार’(१९६४) मधली तर सर्वच गाणी हिट झाली. त्यातही ‘आजा, आई बहार, दिल हैं बेकरार, ओ मेरे राजकुमार’ हे लतादीदींच्या आवाजातले प्रेमगीत किंवा ‘जानेवालो जरा होशियार, यहाँके हम हैं राजकुमार’ हे रफीसाहेबांच्या बेधुंद आवाजातले गाणे लोकांच्या मनावर अक्षरश: कोरले गेलेले आहे.
शम्मी कपूरला आपली एन्ट्रीही वाजतगाजत झालेली आवडत असे. काहीतरी धांगडधिंगाणा करत, उड्या मारतच त्याचा प्रवेश होई. ‘तुमने पुकारा’मध्ये मात्र साहेबांचा मूड छान, हळुवार, रोमँटिक होता! प्रेमात आकंठ बुडालेले प्रेमिक एकमेकांना प्रेमाची खात्री देत आहेत –
तुमने पुकारा और हम चले आये,
दिल हथेलीपर ले आये रे…
मात्र हसरत जयपुरी यांनी लिहिलेल्या या कवीकल्पनेचे जिवंत असे दृश्य रूपांतर पुढे शम्मी कपूरच्या भावाने पडद्यावर दाखवले ते तब्बल ११ वर्षांनी! शशी कपूरचा सिनेमा आला होता ‘चोरी मेरा काम’, त्यात एक सवंग अभिरुचीचे गाणे होते ‘काहे काहेको मेरे पीछे पडी हैं.’ एका दृश्यात शशी कपूर उन्मादक वेशातील झीनत अमानला शर्टाच्या आत हात घालून आपले हृदय काढून देतो, असा शॉट होता. खरोखरचे वाटावे असे धडधडणारे हृदय शशी कपूर काढून झीनतच्या हातावर ठेवतो, असा लाइव्ह सीन दिग्दर्शकाने दाखवला! ते धकधक करणारे हृदय पाहून प्रेक्षक अवाकच झाले होते! तो ट्रिक सीन होता हा भाग वेगळा!
‘राजकुमार’मध्ये मात्र स्वत: राजकुमार असलेला शम्मी कपूर साधनाला म्हणतोय, “मी माझे हृदय तळहातावर घेऊनच आलोय. मला ते तुलाच द्यायचे आहे!” आणि प्रेमाच्या त्या जुनूनमध्ये, त्या उन्मादात, नकळत सामील झालेली साधनाही बोलून जाते, “मी तर तुला द्यायला माझे प्राण हातावर घेऊन आलीये.” केवढी रोमांचक कल्पना! ती तर शम्मीच्या पुढे एक पाऊल टाकून म्हणते –
तुमने पुकारा और हम चले आये,
जान हथेली पर ले आये रे…
प्रेमातली ती अवस्थाच अशी असते की, बोलावले नसले तरी वाटत राहते ती/तो वाट पाहत असेल…! आणि समजा तसे नसले, बहुधा तसे नसतेच म्हणा, तरीही आपल्या प्रेमपात्राला पाहायची ती अनावर ओढ कुठे कुणाला आवरता येते?
शेवटी शम्मी कपूरच तो! साळसूदपणे “माझे डोळे जळजळ करत आहेत, तू त्यावर तुझे डोळे ठेवून त्यांना थंडावा देशील का?” असे विचारतो. पुन्हा लगेच साळसूदपणे विचारतो, “प्रिये, तुझे ओठ का कापत आहेत? मी तर फक्त आपल्या डोळ्यांबद्दल बोलतोय!”
आओ बैठो हमारे पेहलूमें पनाह ले लो,
मेरी जलती हुई आँखोंपे ये आँखे रख दो…
ऐ मेरे प्यारके ख्वाबोंकी हसीं शेहज़ादी
होठ क्यूँ काँप रहे हैं, ज़रा कुछ तो बोलो…
तुमने पुकारा और…
या अनावर प्रेमातील संभाव्य शृंगाराच्या कल्पनेने हरखलेली राजकुमारी म्हणते, “प्रिया, आज माझी तुझ्या सगळ्या गोष्टींना संमती आहे. तू माझे केस मोकळे करू शकतोस. मी मनोमन तुझीच आहे.”
‘आज खेलो मेरी ज़ुल्फ़ोंसे, इजाज़त हैं तुम्हें,
मुझको छू लो, मेरी नसनसमें शरारे भर दो…
मेरे दिलदार मेरी आँखोंमें रेहनेवाले,
मैं तुम्हारी हूँ, मेरी माँगमें तारे भर दो…!’
हसरत जयपुरींनी नुसत्या शब्दांनी सजवलेला कसला हा प्रेमाचा, शृंगाराचा सोहळा! वाह रे वा! उगीच नाही ही गाणी दशकानुदशके रसिकांच्या हृदयावर राज्य करत! त्यांच्या मनाच्या तिजोरीत जपली जात!
राजकुमार प्रेमातल्या अगदी बेधुंद मन:स्थितीत आहे. तो म्हणतो, “माझ्या जीवनात आनंद, प्रकाश आहे, तो प्रिये केवळ तुझ्यामुळेच! आणि तसेही जीवन म्हणजे काय असते? प्रेमात मनस्वीपणे जगणे म्हणजेच खरे जगणे नाही का? आज जर तू माझ्या जीवनात आली नसतीस, तर ते केव्हाच संपले असते आणि लोक माझी प्रेतयात्रा घेऊन स्मशानातही पोहोचले असते! पण प्रिये! तू हाक दिलीस आणि मी तुझ्यासमोर आलोय…”
नाम रोशन हैं तुम्हींसे मेरे अफसानेका,
ज़िंदगी नाम हैं उल्फ़तमें जीये जानेका…
तुम अगर हमको ना मिलते तो ये सूरत होती,
लोग ले जाते जनाज़ा तेरे दीवानेका…
तुमने पुकारा और…
असली ही मनस्वी गाणी, हे जादूगार संगीतकार आणि भावनेत झोकून देणारे गीतकार! त्यांच्या परस्परात एकरूप झालेल्या बेहोशीत सामील होण्यासाठी तर हा नॉस्टॅल्जिया!