अनुराधा दीक्षित
काही वर्षांपूर्वी मी कर्नाटक ट्रीपला गेले होते. तेव्हा आमच्याच गाडीत आमच्याबरोबर असलेल्या एका व्यक्तीशी ओळख झाली आणि एकमेकींशी बोलता बोलता आमचे धागे जुळले. मग ट्रीपहून परत पुण्याला येईपर्यंत आम्ही बहुतेक वेळा एकमेकींबरोबरच असायचो. नीलम तिचं नाव! तीही एका चांगल्या शाळेत शिक्षिका आहे. खूप बुद्धिमान! डॉक्टरेट मिळवलेली, लेखिका, चांगली व्यक्ती… असं बरंच काही. अशा तर किती तरी व्यक्ती असतात. पण तिच्यात एक वेगळाच पैलू होता. तिने पॅराऑलिम्पिकध्ये सहभागी होऊन भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. एवढंच नव्हे, तर पायाने दिव्यांग असूनही तिने धावण्याच्या शर्यतीत पदकही जिंकलं होतं! इंडोनेशिया वगैरे अन्य काही देशांमध्ये ती खेळली आहे. आज ती दोन नातवंडांची आजी आहे. तिने आपल्या पती निधनानंतर दोन मुलींना वाढवलं. उत्तम शिक्षण दिलं. त्याही हुशार निघाल्या. एक अमेरिकेत, तर एक पुण्यात असते. आज दोन्ही मुलींचा तीच आधार आणि सर्व काही आहे.
आता साठीकडे झुकलेली नीलम सकाळी लवकर उठून पार्कमध्ये जाऊन खेळाची प्रॅक्टिस नियमित करते. अजूनही तिची खेळण्याची आणि अशा काही लोकांना मार्गदर्शन करून त्यांना प्रेरणा देण्याची जिद्द ती राखून आहे. अलीकडे टीव्हीवरही एक जाहिरात लागते. त्यातली पायाने दिव्यांग असलेली मुलगीही कृत्रिम पाय लावून मॅरेथॉन जिंकण्याची जिद्द धरते, ही बाब खरंच प्रशंसनीय आहे.
फक्त खेळच नव्हेत, तर इतर कलाकौशल्यं, विविध क्षेत्रांमध्येही अशा व्यक्ती चमकदार कामगिरी करून दाखवतात, तेव्हा आपणही चकित होतो. आता अभिनेत्री आणि नर्तिका असलेल्या सुधा चंद्रनजी यांचंच उदाहरण घ्या! त्यांच्यावर तर सिनेमाही निघाला. बऱ्याच जणांनी तो पाहिलाही असेल. एका अपघातात एक पाय गमावून बसलेल्या सुधाजींनी खडतर प्रसंगातून जात कृत्रिम पायाच्या साह्याने पुन्हा घुंगरू पायात बांधले. चांगली नर्तिका व्हायचं स्वप्न बाळगलं, ते पूर्णही केलं. आज संपूर्ण जगात एक अभिनेत्री, नृत्यांगना म्हणून त्यांनी नाव कमावलंय, कित्येक पुरस्कार मिळवले.
अलीकडेच टीव्हीवर एक कार्यक्रम पाहिला. दृष्टीने दिव्यांग असलेली एक मुलगी… योगिता तांबे नावाची… जी गायिका, वादक, संगीतकार आहे. ती एकूण अठ्ठ्याहत्तर वाद्ये वाजवते. छोट्या मुलांना गाणी शिकवते. तबला, पेटी वाजवायला शिकवते. मुलंही तिच्याबरोबर खूश असतात.
काही वर्षांपूर्वी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस येथील इस्पितळात अमेरिकेहून एक डॉ. दीक्षित (नाव आठवत नाही) म्हणून यायचे. ते तर बहुविकलांग होते. पण निष्णांत सर्जन होते. ते इथे येऊन चाकाच्या खुर्चीत बसून काही विकलांग व्यक्तींची मोफत ऑपरेशन्स करायचे, प्लास्टिक सर्जरी करायचे. सारं मोफत. आता ते या जगात नाहीत. पण हजारो लोकांना त्यांनी जगण्याची नवी उमेद दिली. त्यांच्यातलं वैगुण्य दूर करून सामान्य नागरिकांसारखं जगायची संधी दिली.
हल्लीच एक व्हायरल झालेला व्हीडिओ पाहिला. मालेगावमधली भारती जाधव ही दोन्ही हातांनी दिव्यांनी महिला चक्क चारचाकी चालवते. शाळेतल्या मुलांची ने-आण करते. भारतीच्या तेराव्या वर्षी तिच्या हातांना अपंगत्व आलं. लग्न झालं, पण नंतर नवऱ्यानं टाकलं. ती आईसोबत राहून जमेल तसं काम करू लागली. पण उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. तिने बँकेकडून कर्ज काढून एक मारुती व्हॅन घेतली. पंधरा दिवसांत गाडी शिकली. सुरुवातीला ड्रायव्हर ठेवला. पण तो परवडेना म्हणून स्वतः गाडीची सर्व कामं शिकून घेतली. स्वत:च गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. यशस्वी चालक बनली. आज मालेगावमधली ती पहिली दिव्यांग चालक ठरली.
आपल्याला सारं काही सरकारने आयतं द्यावं, फुकट द्यावं अशी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेल्या व्यक्तींची अपेक्षा असते. स्वत:हून काही प्रयत्न करावेत, असं वाटत नाही. झटपट आणि भरपूर पैसा मिळवण्यासाठी मग गैरमार्गाने जायलाही लोक मागे-पुढे पाहत नाहीत. सारखं महागाई, बेरोजगारीचं रडगाणं वर्षानुवर्षे गात राहतात. यांच्यापेक्षा हे दिव्यांग हजारो पटीने वाखाणण्यासारखे आहेत.
‘मूकं करोति वाचालम् पङ्गु: लङ्घयते गिरिम्’. एक वेळ मूक व्यक्ती बोलू लागेल, एखादा पायांनी दिव्यांग माणूसही पर्वत ओलांडून जाऊ शकेल. म्हणूनच हल्ली अपंग व्यक्तींसाठी वापरला जाणारा ‘दिव्यांग’ शब्द अगदी चपखल आहे. एखाद्या व्यक्तीत शारीरिक उणीव असेल, तर दुसरी कोणती तरी एक दिव्य शक्ती देव त्यांना बहाल करतो. तिच्याच जोरावर तो समाजात पुढे येतो आणि आपलं कर्तृत्व दाखवतो. अगदी हातपाय नसलेल्या व्यक्ती तोंडात ब्रश धरून चित्र काढू शकतात.
मी कॉलेजला असताना आम्हाला अरुण दीक्षित नावाचे डोळ्यांनी दिव्यांग असलेले प्राध्यापक शिकवायला होते. त्या काळात ते एलएलएम ही कायद्याची पदवी विशेष योग्यतेसह उत्तीर्ण झाले होते. शिवाय उत्तम पेटी वाजवत, गाणी म्हणत. खणखणीत आवाजात ते शिकवत.
दिव्यांगांवर बोलावं, लिहावं तेवढं कमीच. उरलेल्या साऱ्यांनी त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. स्वत:च्या जिद्दीवर, चिकाटीवर आणि वाटेल तितकी मेहनत घेऊन स्वाभिमानाने, प्रामाणिकपणे जगायची इच्छा असणाऱ्यांसाठी आकाशही अपुरं पडेल. पण ‘केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे!’ बरोबर ना?