माधवी घारपुरे
माणूस संकटात अडकतो, धडपडतो, सुटतोही, पण ही संकटे माणसाला अनेक गोष्टी शिकवतात, माणसांचे स्वभाव कळतात. माणसं वाचता सुद्धा येतात. २६ जुलै २०१९ ला महालक्ष्मी एक्स्प्रेस पुराच्या पाण्यात बदलापूर-वांगणीच्या मध्ये वेढली गेली तेव्हा १७ तासांनी आम्हा प्रवाशांची सुटका झाली. नि:श्वास टाकला आणि बदलापुरातून टॅक्सीने ठाण्याला येताना चित्रपट तर अख्खा दिसला पण त्या काळात माणसांचे विविध स्वभाव पाहता आले, वाचता आले, अनुभवता देखील आले. सुटका कशी झाली? याचे अनेक थरार वाचले, पण हा एक अलग पैलू.
दुपारी साडेबाराची वेळ. आता आवश्यक ते सामान घेऊन उतरायचे असा मनाचा हिय्या केला. नाशवंत म्हणजे खाण्याचे बरोबर घेतलेले पदार्थ वाटून टाकायचे मी ठरवले आणि पाहुण्यांकडे द्यायचे गुलाबजाम, चकल्या बाहेर काढल्या. महत्त्वाचे सामान एका पिशवीत घातले. एक बाई खूपच घाबरलेल्या होत्या. त्यांना गुलाबजाम द्यायला गेले तर म्हणाल्या, ‘आता जायचेच आहे तर गुलाबजाम खाऊन काय करायचे?’
‘जे व्हायचे ते साऱ्यांचे होईल आणि जायचेच आहे तर गुलाबजाम खाऊन तरी जाऊ’
माझ्या बोलण्यातला विनोद सोडून देऊ, पण जीवन आणि मृत्यू या मधल्या एका श्वासाच्या अंतराची भीती माणसाला कशी असते याचा जिवंत वस्तूपाठ म्हणजे त्या बाई होत्या. जगात माणूस पापाला घाबरत नाही, पण मृत्यूला घाबरतो.
छोट्या मुलांनीही गोड खाऊ खाल्ला. परिस्थितीची तीव्रता करण्याचे त्यांचे वय नव्हते. एक मुलगा खाऊन पाण्यासाठी रडायला लागला. आमच्या कुणाजवळच साडेबारापर्यंत पाण्याचा थेंबही शिल्लक राहिला नव्हता. इतकंच काय टॉयलेट, बेसिनलाही थेंबभर पाणी नव्हते. तो मुलगा रडायचा थांबेना. दुसऱ्या कंपार्टमेंटला मी जाऊन आले, तर तिथेही तोच प्रकार. परतल्यावर पाठीशी एक वाक्य तिरकस कानावर आले.
‘इतकी मोठी बाई असून थोडी नाही राहू शकत पाण्याशिवाय. कळतंय ना? मला वाईट वाटलं पण दु:ख, मानसिक वेदना या सुद्धा क्षणकालच टिकतात याचा प्रत्यय आला.’
दोन छोट्या मुलांतला दुसरा मुलगा पळत पळत आपल्या आईच्या पर्समधून पाण्याची छोटी बाटली घेऊन आला आणि म्हणाला, ‘ही घे. पाणी पी. आईच्या पर्समध्ये होती. मला पण दे थोडंसं.’ ती आई खूप वरमली पण १०० टक्के चूकही म्हणता येईना. आपल्या मुलाला लागले तर? हा स्वार्थ म्हणा, प्रेम म्हणा असू शकतं.
एक नक्की की ती आई होती. माऊली नाही कारण आपलं मूल पाहते. माऊलीला सगळीच मुलं आपली वाटतात. विठाई माऊली होती. ज्ञानेश्वर माऊली होती. निरागसता कशी असते? तर पाणी देणाऱ्या बालकासारखी.
१२.४० ला पाणी जरा ओसरले. रेल्वे डब्याच्या पायऱ्या दिसू लागल्या. पटरीवर पाणी खूप होते, पण उतरायचेच असे ठरवून ग्रामस्थांच्या आधाराने उतरलो. पैसा, फोटो, नाव, कशा कशाचीही अपेक्षा न करता ते धावून आले होते. खांद्याला जड पिशवी, वाऱ्याने उलटी होणारी छत्री, गुडघ्यापर्यंत पाणी, त्याला असलेला जोर अशा वातावरणात पटरीवरून चालायला सुरुवात झाली. कधी पाय खोल, कधी वाकडा, चालत होते. कधी कुणाचा हात, कधी कमरेला, खांद्यावर हात. ना तरुण, ना विद्यार्थी, ना म्हातारा प्रत्येकाचा स्पर्श आधाराचा होता. मुखाने मोठ्यांदा श्रीरामाचे नाव घेतले जात होते. तशाही वेळेत पुढून एक आवाज ऐकू आला. ‘आता बरे देवाचं नाव तोंडात येतेय. एरव्ही?’ अर्थात एरव्ही मी काय करते ते सांगायची ती वेळ नव्हती. मुद्दा माणूस वेळेला टोच मारतोच मारतो.
दीड, दोन किमी चालत आलो. तिथून साधारण २० मीटर आम्हाला बोटीने नेलं. बिस्किटचा पुडा तिथे दिला गेला आणि अॅम्ब्युलन्समधून बदलापूर स्टेशनला आणून सोडले. फार मोठा लांब श्वास घेतला. त्या मदत करणाऱ्यांना आणि जगनियंत्याला हात जोडले.
आता फोनला रेंज यायला लागली. कसातरी एक फोन घरी आणि एक फोन कोल्हापूरला व्याख्यानाच्या ठिकाणी पहाटे लागला होता. नंतर झाला तो आता सुरू झाला.
टॅक्सीत फोन घेता येत होते. घरी कळवले की, मी सेफ आहे. तोपर्यंत एक फोन, माधवी बरी आहेस ना? पण एक सांगते आता साठी-पासष्टीनंतर किती व्याख्यानाची हौस? आता पुरे कर जरा हौस.
मी हो म्हटले तोवर दुसरा फोन, ‘किती वेळा गं फोन केला पण उचललास नाही. तुझा आवाज ऐकला आणि बरे वाटले.’ एका फोनमध्ये न मागता सल्ला दुसऱ्या फोनमध्ये आपलेपणा. फुलांनाच सुगंध असतो असे नाही, तर माणसांच्या शब्दातूनही तो बहरत असतो.
तिसरा फोन व्याख्यानाला चालली होतीस ना?
बरं झालं सुटलीस पण किती हजार बुडाले गं आज? तिकीट तू काढलंस का पाठवलं होतं? नाहीतर डबल नुकसान.
मी म्हटले, डबल नुकसान, पण अनुभव किती आले? विद्यार्थ्यांचे सुहृदांचे किती फोन आले म्हणून सांगू? जोडलेली माणसं गं!
‘करायची काय इतकी नाती?’
‘अगं कित्येक नात्यांचा आर्थिक फायदा असतोच असे नाही, पण ही सारी नाती जीवनरस समृद्ध करतात. मी ठेवते फोन…’
एक ना दोन हजार फोन आले. जीवन जगत असताना पावसाच्या प्रत्येक सरीत विविध रंग दिसत होते इंद्रधनूचे! त्या प्रत्येक सरीतून शिकण्यासारखं खूप असतं पण आपण त्याकडे लक्ष नसतं. आपण अधिकतर दुसऱ्याला शिकवतच अधिक असतो
हे खरं!