नोएडा : नोएडातील हायप्रोफाईल सोसायटीमधील सुरक्षा रक्षकांसोबत गैरवर्तनाची किंवा मारहाण झाल्याची प्रकरणे वारंवार घडत आहेत. नुकताच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. नशेत तरुणींनी गार्डसोबत गैरवर्तन केल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. आपले कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा रक्षकाला एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या महिलेनं मारहाण केली आहे. तसेच या सुरक्षा रक्षकाची टोपी देखील महिलेने फेकून दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नोएडातील अजनारा होम्स सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेक्टर – १२१ येथील अजनारा होम्स सोसायटीतील अंजली तिवारी, दीक्षा तिवारी आणि काकुल अहमद या तीन मुली शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत सोसायटीत पोहोचल्या. ज्या गाडीतून या तिघी तिथे आल्या होत्या, त्या गाडीवर सोसायटीचे स्टिकर नसल्यानं गार्डने या तिघींना आत जाण्यापासून रोखले होते. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या महिलेनं सुरक्षा रक्षकाची कॉलर पकडून मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर फेज थ्री कोतवाली पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
आवाज ऐकून सोसायटीतील इतर लोकही यावेळी जमा झाले होते. लोक आल्यानंतर तिघीही तिथून निघून गेल्या. त्यानंतर या प्रकरणाची सुरक्षा रक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर कोतवाली पोलिसांनी अंजली आणि काकुल या दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या महिलेचा शोध सुरु आहे. अंजली आणि दीक्षा या बहिणी आहेत. तर काकुल या दोघींची मैत्रिण आहे. गार्डने केलेल्या तक्रारीवरून तीनपैकी दोन मुलींवर कारवाई करण्यात आली. आणखी एकीचा शोध सुरु आहे.