नारायण राणे (केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री)
नमस्कार, ‘प्रहार’ या लोकप्रिय दैनिकाच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना मन:पूर्वक शुभेच्छा. अवघ्या जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना महामारीच्या भीषण विळख्यातून आपण सर्वजण सहीसलामत बाहेर पडलो आहोत आणि नव्या उमेदीने पुन्हा सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. कोरोनावरील या विजयाचे सारे श्रेय हे आपल्या देशाचे सर्वात यशस्वी आणि ध्येयविधाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि देशभरातील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रांतील कर्मचारी, औषध दुकानदार आणि सर्वांची काळजी घेणारे सफाई कर्मचारी तसेच आपली सुजाण जनता यांनाच जाते.
देशात २०१४ साली फार मोठा बदल घडून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आले आणि देशाचा सर्व क्षेत्रांतील विकासगाडा जोमाने धावू लागला.
जागतिक स्तरावरही भारत एक शक्तिशाली देश म्हणून पुढे आला असून, जो जशास तसे ठोस प्रत्युत्तर देणारा म्हणजेच ‘जो मारेगा भी और जितेगा भी’ अशा प्रतिमेसह पुढे सरसावत आहे. उरी, पुलवामा यांसारख्या पाकपुरस्कृत भ्याड दहशतवादी हल्ल्यांनंतर आपल्या लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे केलेला हवाई हल्ला (सर्जिकल स्ट्राइक) म्हणजे ‘सौ सोनारकी और एक लोहारकी’ या संज्ञेतील असून संपूर्ण जगात त्यामुळे आपल्या लष्करी बळाचा चांगलाच बोलबाला झाला असून पाकसारख्या नतद्रष्ट शेजाऱ्यांवर त्यामुळे चांगलाच वचक बसला आहे.
आता केंद्रातील कार्यक्षम मोदींचे सरकार आणि त्याला पूरक असे आपल्या राज्यात सत्तारूढ झालेले शिंदे गट आणि भाजप यांचे युतीचे सरकार यामुळे देशाबरोबरच राज्याच्या विकासाचा गाडाही चांगलाच गतिमान होत आहे. मा. मोदी साहेबांनी माझ्यावर मोठ्या विश्वासाने केंद्रीय सूक्ष्म, लघू, आणि मध्यम उद्योग मंत्रीपदाची जबाबदारी सोपविली असून त्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न मी करीत आहे. या महत्त्वाच्या खात्याच्या माध्यमातून राज्यात आणि देशात उद्योगधंद्याचे जाळे पसरविण्याचा आणि तरुणांना उद्योग-व्यवसायाची दारे उघडून देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यातून तरुण-तरुणींच्या रोजगाराचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात तडीस लावला जाईल, याबाबत माझ्या मनात शंका नाही. राज्यावर अडीच वर्षे महाविकास आघाडीच्या रूपात सत्तेवर आलेले महाभकास सरकार आता गेले असून नवे सुगीचे दिवस आता आले आहेत. त्याचा लाभ उठवत राज्यातील शेतकरी, कामगार, व्यावसायिक, व्यापारी, लहान-मोठे उद्योजक अशा सर्वांची भरभराट होऊ दे, अशा शुभेच्छा ‘प्रहार’च्या वर्धापन दिनानिमित्त मी देत आहे.