मुंबई दूरदर्शन केंद्राला रविवार २ ऑक्टोबर, २०२२ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मुंबई मराठी पत्रकार संघाने मुंबई दूरदर्शन केंद्र सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन – मंतरलेले दिवस या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार १ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबईत पत्रकार संघ भवनात केले होते. या कार्यक्रमाचे शब्दरूप दर्शन घडविणारा हा एक दृष्टिक्षेप.
जयू भाटकर
२ ऑक्टोबर १९७२ हा दिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला आनंद पर्वणी देणारा असा होता. याच दिवशी मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झालं. यंदाच्या २ ऑक्टोबरला केंद्राला ५० वर्षे पूर्ण झालीत. वरळीच्या दूरदर्शन केंद्र मनोऱ्याखाली ३४ वर्षे कार्यक्रम निर्मितीचं मला काम करायला मिळालं. याच दूरदर्शन सेवेमुळे माझं आयुष्य समृद्ध झाले. या केंद्राच्या नोकरी पगारामुळे आपल्या कुटुंबाची रोजीरोटी भागली. इथल्या लोकप्रिय कार्यक्रमांच्या निर्मितीमुळे आपलं नाव राज्याच्या खेड्या-पाड्यात पोहोचलं. या कृतार्थ भावनेपोटी सुवर्णमहोत्सवी मुंबई दूरदर्शन ‘मंतरलेले दिवस’ ही कार्यक्रम संकल्पना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विश्वस्त वैजयंती कुलकर्णी-आपटे यांना सांगितली. “मुंबई मराठी पत्रकार संघाने हा कार्यक्रम आयोजित करावा, असे सुचविले. त्यांनी क्षणाधार्थ पसंतीचा होकार देऊन पत्रकार संघाचा अध्यक्ष आमचा मित्र दैनिक शिवनेरचा संपादक नरेंद्र वाबळेला फोनवर या कार्यक्रमाची कल्पना दिली आणि तिथचं १ ऑक्टोबरला पत्रकार संघाच्या यजमान संयोजनाने कार्यक्रम करायचं ठरवलं. कार्यक्रमाचं स्वरूप अत्यंत साध, सोप आणि स्पष्ट ते असं – गेल्या ५० वर्षांच्या मुंबई दूरदर्शन केंद्र वाटचालीतील सर्व आजी-माजी, अधिकारी, निर्माते, तंत्रज्ञ, छायाचित्रकार, कला दिग्दर्शक, वृत्तनिवेदक, कलावंत यांचा अर्थात सर्वांचाच सन्मानपूर्वक सत्कार करायचा, हेच कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत. तसेच समारंभाला विशेष अतिथी म्हणून डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे हे उपस्थित होते. पूर्वनियोजित संयोजन बैठकीत ठरल्याप्रमाणे दूरदर्शनच्या सर्व आजी-माजी स्टाफला संपर्क साधण्याची, त्यांना निमंत्रण देण्याची जबाबदारी ही माझी होती. मी माझ्यापरीने प्रयत्न केले. नेमके किती जण कार्यक्रमाला येतील याची काळजी वाटत होती. व्यक्तीश: जवळजवळ ४५० जणांना मी फोनवर निमंत्रणं दिली होती. समाज माध्यमावर निमंत्रण देण्यासाठी पत्रकार संघाचे मुनाफ पटेल, स्नेहल मसुरकर यांनी खूपच धावपळ केली. साधारण १०० ते १५० जण कार्यक्रमाला येतील, असा अंदाज होता. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी पाच वाजताची होती. मात्र सव्वाचार वाजेपर्यंत सभागृहात १५ जण आले होते. माझी काळजी वाढू लागली. विशेष अतिथी डॉ. पी. डी. पाटील वेळेआधी पोहोचले. सभागृहात खुर्च्या रिकाम्या राहिल्या तर आपली पंचायत होणार या काळजीने अस्वस्थ झालो. पत्रकार संघाचा संयुक्त कार्यवाह संदीप चव्हाण, कार्यकारी सदस्य स्वाती घोसाळकर, आम्ही तिघेही उपस्थितीबद्दल काळजीत होतो, चेहऱ्यावर ती न दाखवण्याचा प्रयत्न होता. पण, काय आश्चर्य कडकडीत ऊन पडलेलं असताना अकस्मात सर्वत्र काळे ढग दाटून यावेत आणि धो-धो पाऊस पडावा, तसेच घडले. तीनशे आसनक्षमता असणाऱ्या पत्रकार भवानातील दुसऱ्या मजल्यावरच सभागृह काही वेळातच तुडुंब भरलं. शालेय जीवनात १०वी.च्या निरोप समारंभानंतर जसे विद्यार्थी
२०-२५ वर्षांनी आपल्या अनोख्या स्नेहसंमेलनात एकत्र येतात, तशा वातावरणात सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरच्या हॉलमध्ये गर्दी झाली. निवृत्त झालेले, दूरदर्शनची वाट सोडून इतरत्र जाऊन स्थिरावलेले सर्वजण कित्येक वर्षांनी एकमेकांना भेटत होते. ‘हाय, हॅलो, गळाभेटी, हास्यविनोद यांच्या किलबिलाटाने सभागृहात एकच गलका झाला. याच गलकी जल्लोषात कार्यक्रम सुरू होण्याची वेळ टळून गेली. कार्यक्रम सूत्रसंचालन करणाऱ्या वृत्तनिवेदिका शिबानी जोशीने स्वागत घोषणा केली आणि मंचावर टाळ्यांच्या कडकडाटात मान्यवर आसनस्थ झाले. मुंबई दूरदर्शनच्या पहिल्या दिवशी म्हणजे २ ऑक्टोबर १९७२ पहिलं मराठी बातमी पत्र वाचणारे डॉ. विश्वास मेहेंदळे या प्रारंभ दिवसाचे साक्षीदार, त्यावेळचे निर्माता याकूब सईद, वृत्त विभागाचे त्यावेळचे निर्माता डॉ. गोविंद गुंठे, शेतकरी बांधवांच्या घरा-घरांत ‘आमची माती, आमची माणसे’ लोकप्रिय करणारे अशोक डुंबरे, त्यावेळच्या राष्ट्रीय कार्यक्रमात हिंदी बातम्या वाचणारी सरिता सेठी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, दैनिक शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे, संयुक्त कार्यवाह संदीप चव्हाण, विश्वस्त वैजयंती कुलकर्णी-आपटे यांच्यासोबत मीही आसनस्थ झालो आणि एका वेगळ्या आनंदी वातावरणात दिग्गजांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक कार्यक्रम मार्गस्थ झाला. आपल्या भावभरल्या शब्दांत पत्रकार संघाचा संयुक्त कार्यवाह संदीप चव्हाण याने आपल्या प्रास्ताविकपर भाषणात या कार्यक्रम संयोजनाची भूमिका विषद केली आणि हा स्मरणीय कार्यक्रम आयोजित करण्याचा मान पत्रकार संघाला मिळाला, त्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यानंतर पत्रकार संघाचा अध्यक्ष नरेंद्र वाबळेंनी सर्वांचे स्वागत केले. त्यांनी घरच्या आपुलकीने दूरदर्शन परिवारासोबतच्या आपल्या ऋणानुबंधाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर प्रमुख पाहुणे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि विशेष अतिथी डॉ. पी. डी. पाटील यांचा पत्रकार संघ अध्यक्ष नरेंद वाबळेंच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. सभागृहात मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, संपादक राही भिडे आणि ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य उपस्थित होते. त्यानंतर मंचावरील मान्यवर डॉ. विश्वास मेहेंदळे, डॉ. गोविंद गुंठे, डॉ. याकुब सईद, अशोक डुंबरे, सरिता शेठी, मुकेश शर्मा, यांचाही सत्कार झाला. त्यावेळी सारेच सत्कारमूर्ती भावविवश झाले होते. त्यांच्या मनातला गहिवर चेहऱ्यावर दिसत होता. भरलेल्या डोळ्यांनी डॉ. गोविंद गुंठे आणि डॉ. विश्वास मेहेंदळे हे एकेकाळच्या मुंबई दूरदर्शन वृत्त विभागातील दोन समकालीन मित्र सुमारे ३५ वर्षांनी एकमेकाला भेटत होते. तो क्षण अवर्णनीय होता. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे गेल्या ५० वर्षांच्या मुंबई दूरदर्शन प्रवासातील सर्व निवृत्त निर्माता, अधिकारी, तंत्रज्ञ यांचा सत्कार. त्यांनी केलेले काम, दूरदर्शनच्या जडणघडणीत त्या सर्वाचे असणारे मोलाचे योगदान. त्यामुळेच त्यांना त्यांच्या सत्कार गौरवाने अधोरेखित करावे, हीच ‘मंतरलेले दिवस’ या कार्यक्रमाची संकल्पना होती. कार्यक्रमात, डॉ. विश्वास मेहेंदळेंच्या “स्मृतींची चाळता पाने” आणि “या गावाहून त्या गावाला’’, या दोन पुस्तकांचे प्रकाशन, प्रमुख पाहुणे, विशेष अतिथी आणि मान्यवरांच्या हस्ते झालं आणि त्यानंतर मुख्य सत्कार समारंभ सुरू झाला. हा सत्कार गौरव तास-दीड तास चांगलाच रंगला. मुंबई दूरदर्शनच्या सर्व शिलेदारांच्या सत्कार समारंभ निर्माता बी. के. गिटी, निर्माती मधुराजा, निर्माता उपमहानिदेशक शिवाजी फुलसुंदर, निर्माता आल्हाद धर्माधिकारी, कार्यक्रम अधिकारी स्वीभूषण मिश्र, वरिष्ठ इंजिनीअर शब्द मोघे, दिवाकर सभारंजक, उपसंचालक कमल वानखेडे, कला दिग्दर्शक गोरखनाथ कडू, कॅमेरामन नंदकुमार वाडदेकर, निर्माती शिला जुन्नरकर, निर्माती अनुजा देशपांडे – वृत्तनिवेदक अजित देशपांडे, कॅमेरामन अनिल साळवी – आदिती साळवी, निर्माती मीना गोखले, इंजिनीअर विलास पंडित, चंद्रशेखर हुपरीकर, मीरा हळदणकर, निर्माता शरद वैद्य, निर्माता दिलीप तिवारी, कॅमेरामन रवी मुरबाडकर, निर्माता मोहनदास, संकलक – विद्याधर पाठारे, राजन वाघधरे, कॅमेरामन सुरेश सुवर्णा, गुरू पाटील, निर्माता सुरेश राणे, ही सर्व दिग्गज मंडळी सन्मान गौरवाने भारावली होती. थोडक्यात, निवृत्त ड्रायव्हरपासून निवृत्त टेक्निशियन, हेल्पर, शिपाई यांच्यासह आमचा सर्वांचा अन्नदाता मुंबई दूरदर्शन कॅन्टीनचा मॅनेजर चंदू बाचरेपर्यंत सर्वांनाच पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. एकूणच सत्कारमूर्तींची संख्या जवळजवळ १७५ इतकी होती. त्यामुळे सर्वांचाच नामोल्लेख इथे करणं शक्य नाही. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पूर्वनियोजित पुढील कार्यक्रमाला जायचे असल्यामुळे सत्कार समारंभाला थोडी विश्रांती देऊन प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचे भाषण सुरू झाले. आपल्या शालेय जीवनात कोकणात घरी टी.व्ही.लावतानाच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, त्या काळी संध्याकाळी मुंबई दूरदर्शनचं प्रसारण सुरू होताना जी सिग्नेचर ट्यून वाजू लागली की, घरा-घरांत वातावरण मंगलमय व्हायचं. गच्चीतल्या अॅन्टीनाची अॅडजस्टमेंट, करताना टी.व्ही.च्या पडद्यावर दिसणाऱ्या दृश्य स्वरूपातील ठिपक्यांच्या व्यत्ययसदृश दृश्यांची आठवण करून देताना ते म्हणाले, राज्याच्या, देशाच्या सांस्कृतिक परंपरेत मुंबई दूरदर्शनने केलेलं काम हा प्रत्येक मराठी रसिकांच्या अभिमानाचा केंद्रबिंदू आहे. सर्वच काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांनी उत्कृष्ट कार्यक्रम निर्मिती करून सादरीकरण केलेले लक्षावधी मनोरंजन कार्यक्रम हा एक अनमोल ठेवा आहे. या ठेव्याची भविष्यात कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणून मुंबई दूरदर्शन संबंधित एक भव्य वस्तुसंग्रहालय राज्याच्या राजधानीत-मुंबईत उभं राहावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाई, असं आवर्जून सांगत ते पुढे म्हणाले, खरं तर हा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन कार्यक्रम मुंबई दूरदर्शन केंद्राने पुढाकार घेऊन आयोजित करायला हवा होता. या कार्यक्रमाचे आयोजन जबाबदारी ही मुंबई केंद्राची होती. असं असताना हा कार्यक्रम मुंबई मराठी पत्रकार संघाने मोठ्या मनाने आणि उत्कृष्ट संयोजनाने आयोजित केला, त्याबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाचे मी अभिनंदन करतो.
त्यांच्या भाषणानंतर समारंभाचे विशेष अतिथी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी आपल्या भाषणात मुंबई दूरदर्शन केंद्राच्या वाटचाल कार्याचे गौरवाने सिंहावलोकन करताना सांगितले की, केंद्राला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या या स्मरणीय कार्यक्रमात मला सहभागी होता आलं, हे मी माझे भाग्य समजतो. मुंबई केंद्राच्या समस्त आजी-माजी परिवाराचं अभिनंदन करताना ते म्हणाले, ‘गेली ५० वर्षे शासकीय चौकट आणि नियमांची आखीव रेखीवता असूनही मनोरंजन, प्रबोधन आणि माहिती देणे, या त्रिसूत्री उद्देशाने काम केलेल्या तिथल्या सर्व निर्मिती शिलेदारांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यांच्या भाषणानंतर पुन्हा एकदा सर्व दूरदर्शन शिलेदारांच्या सत्कार समारंभाला सुरुवात झाली. एकीकडे सत्कारमूर्तींच्या नावाची घोषणा, त्यांचा होणारा सत्कार, तर दुसरीकडे सभागृहात अनेक वर्षांनी भेटल्यामुळे एकमेकांसोबत फोटो, सेल्फी काढणे चालू होते. काहीजण एकमेकाला भेटून विचारपूस करीत होते. थोडक्यात, शाळा सोडल्यानंतर अनेक वर्षांनी भेटल्यावर विद्यार्थी मैत्रीच्या आनंदात, गप्पांच्या बेहोशीत भेटतात. तसंच वातावरण सभागृहात होतं. सर्वांच्याच उत्साहाला निखळ आनंदाचं उधाण आलं होतं. एरव्ही कार्यक्रमाच्या चौकटीत रिवाजात असणारी शांतता, समारंभ शिस्त आणि त्याबरोबर शिष्टाचार थोडा बाजूला राहिला होता. मात्र, या स्मरणीय कार्यक्रम प्रसंगाचे जे साक्षीदार होते ते मान्य करतील की, वर्षानुवर्षे न भेटलेल्या संवेदनशील मगाच्या सर्व हत्यांची ती दुर्मीळ गळाभेट होती. एकमेकांना मनापासून भेटण्यात, एकमेकांशी बोलण्यात सर्वजण मश्गूल होते. अपेक्षित उपस्थितीपेक्षा गर्दी जास्त झाली. पूर्वनियोजनाने आणलेली दीडशे सन्मानचिन्ह सर्वांचा सत्कार होऊन संपली. बाकी राहिलेल्या वीस-पंचवीस सत्कारमूर्तींचा सन्मान गौरव त्यांना व्यासपीठावर विनंतीपूर्वक बोलावून, पुष्पगुच्छ देऊन करावा लागला. थोड्या वेळाने पूर्वनियोजित कार्यक्रम पत्रिकेतला शेवटचा गप्पांचा कार्यक्रम सुरू झाला. या प्रकट मुलाखतवजा कार्यक्रमाचा सुसंवादक होता सुधीर गाडगीळ. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांत पहिल्या रांगेत बसलेला सुधीर भरगच्च आणि अनेक दिग्गजांच्या सत्कार समारंभाने वेळ झाला म्हणून त्यातही तो सुसंवादक असणारा गप्पांचा कार्यक्रम उशिरा सुरू होतोय म्हणून अस्वस्थ झाला होता. त्याने मला मंचावर निरोपाची चिट्टी पाठविली. “सत्कार समारंभ थांबवून गप्पांचा कार्यक्रम सुरू करूया”. मात्र पत्रकार संघाच्या या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे मुंबई दूरदर्शनच्या सर्व आजी-माजी शिलेदारांचा व्यासपीठावर सत्कार करायचा. त्यामुळे सत्कार समारंभ सुरू राहिला. थोड्या वेळाने मान्यवरांच्या गप्पांचा कार्यक्रम सुरू झाला. त्या गप्पा कार्यक्रमात कोणकोण सहभागी होणार हे पूर्वनियोजित बैठकीत ठरलं होतं. तशी बोलणाऱ्यांना कल्पना दिलेली होती. उपस्थित काहीजण आयत्या वेळी आम्हालाही बोलायचं आहे, अशी विनंती करण्यासाठी एका बाजूने माझ्याशी बोलायला व्यासपीठावर येत होते. तेवढ्यात माझ्या सहकारी मित्राने मला व्यासपीठावर चिट्ठी पाठवून आठवण करून दिली, दूरदर्शन कॅमेरामन किशोर चेऊलकर, सुप्रसिद्ध मराठी दूरदर्शन मालिका संकलक भक्ती मायाळूसह जवळजवळ पंधरा जणांचे सत्कार राहून गेले आहेत. उर्वरित सत्कारमूर्ती मोठ्या दिलदार मनानं व्यासपीठावर आले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना उपस्थितांनी गौरवाची साथ दिली. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक मनस्वी निखळ आनंद होता. अर्थात या आनंदाचं खरं श्रेय आहे ते मुंबई मराठी पत्रकार संघाला. खरं तर दोन महिन्यांपूर्वी या कार्यक्रमाचा लिखित संकल्प प्रस्ताव मी मुंबई दूरदर्शन परिवाराचा माजी सदस्य म्हणून दूरदर्शन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला होता. पुढे आठवड्याभरात माझ्या लक्षात आलं की, यांच्याकडून काही प्रतिसाद मिळणं शक्य नाही. म्हणूनच ५० व्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम व्हायलाच हवा की, ज्यामुळे मुंबई दूरदर्शनच्या ५० वर्षं वाटचालीचे देदीप्यमान पर्व राज्यात, देशात प्रसारण माध्यमांच्या गतीमान स्पर्धेत अधोरेखित होईल. यासाठी आमचा गुरुमित्र स्व. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता विनय आपटेची पत्नी वैजयंती कुलकर्णी-आपटेसोबत बोलणे झाले. अध्यक्ष नरेंद्र वाबळेनं मनावर घेतलं. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने हा कार्यक्रम होईल असं ठरवलं. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के, कार्यवाह विष्णू सोनावणे, संयुक्त कार्यवाह संदीप चव्हाण, कार्यकारिणी सदस्य स्वाती घोसाळकर आणि इतर सर्व सदस्य मित्रांनी तसेच पत्रकार संघ कार्यालयातील कर्मचारी आणि सेवकवर्ग यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वी झाला. त्या सर्वांना कृतार्थ नमस्कार करीत मी पत्रकार संघाच्या पायऱ्या उतरलो, तेव्हा मनात समाधान होतं. ते हेच की, २१ व्या शतकातल्या एका स्मरणीय सोहळ्याचं, दूरदर्शन पन्नाशीचं, सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन समारंभाचं ‘मंतरलेले दिवस कार्यक्रमाचं आयोजन मुंबई मराठी पत्रकार संघाने केलं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सुवर्णनोंद ठरणाऱ्या या कार्यक्रमाच्या यजमान संयोजनाबद्दल समस्त पत्रकार संघाला नमस्कार !