प्रियानी पाटील
तिचं घर जुनंच. दारी अंगण… अंगणातील तुळस लुभावणारीच. मात्र घरात पाऊल टाकलं तेव्हा सारी सुन्नता नजरेत भरली. तिचं घर सुनं सुनं जे गेल्या काही वर्षांपासून असंच राहिलं होतं. काय झालं असावं? एवढं कोणतं संकट तिच्यावर ओढावलेलं असावं? कुणाकडूनसं कळलेलं… तिचे पती वादळात समुद्रात गेले ते परतलेच नाहीत. हे एवढं अस्मानी संकट घेऊन तिचं या जगात वावरणं म्हणजे कुणाच्याही काळजात चर्रर होणारच. ती कशी वावरतेय या जगात. पदरी मुली, त्यांचं शिक्षण करताना ती मिळेल ते काम करून घर चालवू लागलेली.
हे असं समुद्री संकट जीवावर घाला घालणारं असतं. वादळी वारे घोंगावतात. पाण्याचा अंदाज येत नाही. तुफानात नौका भरकटतात. अशा वेळी ना घरचा रस्ता सापडतो, ना कोणता किनारा सापडतो. पुढे या वाट हरवलेल्या व्यक्तींचं काय होतं? ते जर सापडले तर त्यांची वाट पाहणं सोडून दिलं जातं. पण जर का ते सापडलेच नाही, तर… तर त्यांचं काय? कुठे असतील ते? की, ते या जगातच नसतील? काय खरं काय खोटं? याचा अंदाज लावत त्यांच्या घरची माणसं मग त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसतात. ते आज परततील, उद्या परततील या आशेवर घरातील माणसं राहतात. शेवटपर्यंत डोळ्यांत प्राण आणून त्यांची वाट पाहतात. डोळ्यांत पाणी आणून काय घडलं असेल त्या वेळी असा प्रसंग आठवून आठवून डोळ्यात पाणी आणून त्यांची वाट पाहत राहतात. पण त्यांचं कधीच न परतणं म्हणजे त्यांच्या घरातील माणसांची नशिबाने घेतलेली सत्त्वपरीक्षाच असते. तिच्याही नशिबी हाच प्रसंग आलेला. तिने भिंतीवरील फोटोकडे बोट दाखवत म्हटलेलं, ‘गेला माणूस कधीच परत आला नाही. समुद्रातल्या वादळात नौका भरकटली. बुडाली, काही थांगपत्ता लागला नाही. ना माणसाचा मृतदेह सापडला, ना माणूस प्रत्यक्ष कधी परत आला.’ हे सारं सांगताना तिच्या डोळ्यांत आता पाणी नव्हतं. पण वाट पाहणं मात्र संपलं नव्हतं. ते आज परत येतील, उद्या येतील या आशेवर ती होतीच. मात्र ते कधीच परत आले नाहीत. तिच्यासाठी त्यांचं असणं फक्त नि फक्त फोटोरूपी राहिलं. मध्यंतरी एका रिपोर्टच्या निमित्ताने तिची भेट घेतली. तेव्हा काहीशी तिची द्विधा मन:स्थिती जाणवून गेली. कुणीशी बातमी आणलेली… तिचा पती जिवंत असल्याची. आपला पती जिवंत आहे, ही बातमी इतक्या वर्षांनंतर खरंतर तिला आनंद देणारी ठरलेली. या बातमीनंतर अनेकजणींनी तिची भेट घेतलेली. तिचं कपाळ सुनं सुनं… अनेकींनी तिला कपाळावर कुंकू कोरण्याचा सल्लाही दिला. मात्र जोवर गेलेला पती परत येत नाही, तोवर तिने ते नाकारलं.
कुणी पतीला पाहिलं असेल कुठे, तर पतीने घरी यावं या विचाराने ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिचा पती जिवंत आहे, ही बातमी खरोखरची होती की खोटी होती हे माहीत नाही. मात्र तिचा पती परत कधीच आला नाही. आयुष्याच्या वाटेवर एकटीने जीवन जगताना तिचं जीवन निरामय होऊन गेलं. मुली लग्न होऊन सासरी गेल्या आणि तिच्या नशिबी पुन्हा एकटेपण आलं. मात्र अशावेळी घराच्या चार भिंतीत हे छप्पर तरी आपली साथ निभावेल, असं वाटलं पण ते ही बिनभरवशी.
ऊन, पाऊस, वारा हे नित्य नेमाने आपले कार्य बजावतात. पण, मातीच्या भिंती ढासळतातच. माणसाचं आयुष्य माणसाच्या हातात उरत नाही. आपला माणूस आपला राहत नाही. साथ संगत सोडून गेलेला माणूस वाट पाहूनही परतत नाही. यातच जीवनाचा मथितार्थ तिने जाणला आणि उभं आयुष्य काढायचं ठरवलं. पण तरी राहण्यासाठी घर तर लागतच ना. जीर्ण झालेलं घर तरी किती वर्षं तिच्या आसऱ्यासाठी उभं राहणार?
अलीकडेच ऐकण्यात आलं. तिचं राहतं घर ढासळलं. घराच्या भिंती बऱ्याच प्रमाणात कोसळल्या. पण तिचं आयुष्य मात्र ती तिथेच व्यथित करतेय. सारे घराकडे पाहतात, अरेरे! म्हणतात, पुढे निघून जातात. पण तिला मदत करावीशी कुणालाच वाटत नाही. तिचं एक मत जर सरकारला उपयुक्त ठरतं, तर तिला एक घर बांधून देण्यासाठी कुणीच कसं धजावत नाही.
आजवरचं तिचं आयुष्य असं विवंचनेत काढलं असताना एखाद्याच्या नशिबी आलेली असुरक्षितता, निर्माण झालेला घराचा प्रश्न तिची परिस्थिती पाहता तरी विचार करण्याजोगी वाटून जाते. तिचा घरासाठी निर्माण झालेला प्रश्न कधी सुटेल माहीत नाही. मात्र जिथे अवाजवी खर्च केले जातात, तिथे एक मदतीचा हात अशा लोकांसाठी समाजातून पुढे आल्यास अशा कितीतरी लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न मात्र सुटू शकतो हे मात्र नक्की!