मुंबई (प्रतिनिधी) : आवाज हा माणसाचा मानबिंदू आहे. त्यावर माणसाचे बरेच काही अवलंबून आहे. भावना व्यक्त करणे हे आवाजाचे काम असल्याचे मार्गदर्शन ज्येष्ठ वृत्तनिवेदक, व्हॉईस ओव्हर आर्टीस्ट आणि ‘बीग बॉस’ फेम रत्नाकर तारदाळकर यांनी केले. आपल्या भारदस्त आवाजाने घराघरांत पोहचलेले रत्नाकर तारदाळकर यांनी आपल्या आवाजाच्या जादूने दैनिक प्रहार कार्यालयातील कार्यक्रमात उपस्थितांना भारावून टाकले. आवाजाबाबतचे मार्गदर्शन, सखोल माहिती त्यांनी यावेळी दिली.
आवाज ही प्रत्येकाची ओळख असते. जशी शरीररचना, तसा आवाज असतो. एखाद्याला आवाजावरून ओळखता येते. आवाज हा माणसाचा मानबिंदू आहे. त्यावर माणसाचे बरेच काही अवलंबून आहे, असे सांगत पुढे तारदाळकर म्हणाले की, आवाजाची नैसर्गिक देणगी मला लाभली आहे. हे ओळखले आणि त्यात आपली कारकीर्द घडवली. मी ज्यावेळी काम सुरू केले त्यावेळी या क्षेत्राला पूर्वी प्रसिद्ध वलय नव्हते. आता ते आले आहे. त्याचे उदाहरण घ्यायचेच तर माझेच घ्या. लग्न झाल्यावर पत्नीने विचारल्यावर तिला सांगितले की, मी आवाज देतो. त्यावर तिही कोड्यात पडली. आवाज देता म्हणजे काय करता? असा प्रश्न तिने उपस्थित केला. त्यानंतर तिला एका रेकॉर्डींगला नेले आणि प्रत्यक्ष आवाज देणे म्हणजे काय आहे? ते दाखवून दिले. दूरदर्शनवरील ‘आमची माती आमची माणसे’ हे माझे पहिले काम होय. त्यानंतर एका पंख्याच्या जाहीरातीमध्ये आवाज देण्याचे काम केले. आणि मग पुढे कामे मिळत गेली. सुरुवातीला नोकरी सांभाळून आवाज देण्याची कामे केली. वर्ष २००० मध्ये नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ या क्षेत्राकडे वळलो. ज्या भाषेत आपण काम करत आहोत त्या भाषेवर आपले प्रभुत्व असायला हवे.
यावेळी रत्नाकर तारदाळकर यांनी बीग बॉसमधले काही किस्से सांगितले. या क्षेत्रातील आपले चांगले-वाईट अनुभव कथन केले. लाईव्ह कार्यक्रमादरम्यान आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात असे अनेक अनुभव त्यांनी सांगितले. पुढे रत्नाकर तारदाळकर म्हणाले की, जाहीरातींसाठी, डॉक्यूमेंटरीसाठी, वाहिनीकरिता आवाज देणे, वृत्तनिवेदन अशी आवाजाची क्षेत्रे आहेत. डबींग करताना बरीच आव्हाने असतात. पात्राला आवश्यक असलेला आवाज काढावा लागतो. मी डबींग करत नाही.