सुमती पवार
शिक शिक पोरी शिकून तू हो गं मोठी
फार मजबूत आहे शिक्षणाची पाहा काठी
हाती येता लेखणी गं उघडे यशाचे द्वार
होत नाही माणूसही कुणालाच भार…
दाही दिशा मोकळ्या गं मार तू भरारी
अहिल्या तू बन, बन झाशी गं करारी
संगणकाचे हे युग बन तू “कल्पना”
गवसणी घाल पाहा आता तू गगना……
चुल-मूल सांभाळून करते तू सारे
आता लागू देत नव्या युगाचेच वारे
बुद्धिवंत प्रज्ञावंत नको राहू मागे
मातीतच मुळे आणि मातीतच धागे……
ऐक, शिकताच पोर उद्धरते घर
सात पिढ्या उद्धरती नौका होई पार
सुकाणू तू घराचे निभावते सारी नाती
होऊ देऊ नको आता कधी तुझी माती… …
दुर्गा आहे गौरी आहे माता तू युगाची
कोशातून निघ आता पुरे झाली गोची
उभी ठाक अन्यायाची कर ऐसी तैसी
तूच गंगा-यमुना नि जगताची “काशी”……