मंजिरी ढेरे
सकाळी एका कंपनीत काम केल्यानंतर संध्याकाळी दुसऱ्या कंपनीत नाईट शिफ्ट करणारे अनेकजण सध्या ‘मूनलाइटिंग’ या संकल्पनेतले नोकरदार म्हणून ओळखले जातात. अलीकडेच काही बड्या कंपन्यांनी अशा प्रकारे दोन कंपन्यांमध्ये काम करण्याला आक्षेप नोंदवला आहे. विप्रो, इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या तीन प्रमुख आयटी कंपन्यांचा त्यामध्ये समावेश आहे. सध्या चर्चेत असलेल्या या विषयाचा वेध.
भौतिक सुखांच्या लोलुपतेत अडकलेलं आजचं विश्व जास्तीत जास्त पैसे कमावण्याच्या नादी लागलं आहे. वस्तुविनियोगाचं युग संपल्यानंतर पैसारूपी चलन अस्तित्वात आलं आणि ‘जास्त पैसा तितकी अधिक सुखांची रेलचेल’ हे साधं समीकरण रुजू झालं. यथावकाश सुखाच्या कल्पना विस्तारत गेल्या, बाजाराचा परिघ रुंदावत गेला आणि जगातली अधिकाधिक सुखं आपल्याला मिळावत ही मानसिकताही प्रसरण पावत केली. कोणी याला हव्यास म्हणेल, कोणी लालसा म्हणेल, कोणी ध्यास म्हणेल वा कोणी ध्येय म्हणेल… नावं काहीही असली तरी आज बहुतांश लोकांना अधिकाधिक पैसा हवा आहे आणि त्यासाठी ते शक्य तेवढा काळ काम करण्यास तयार आहेत. आज तरुणच नव्हे, तर मध्यमवयीन पिढीही दिवसाचे बारा-चौदा तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम करून अधिकाधिक माया जमवताना दिसते. काहींवर गरजा भागत नसल्यामुळे तर काहींवर वाढवून ठेवलेल्या गरजांच्या पूर्ततेसाठी अशी दिवसरात्र काम करण्याची वेळ येते. सकाळी एका कंपनीत एक शिफ्ट काम केल्यानंतर संध्याकाळी दुसऱ्या कंपनीत नाईटशिफ्ट करणारे अनेकजण बघायला मिळतात. पण, आता काही बड्या कंपन्यांनी अशा प्रकारे दोन कंपन्यांमध्ये काम करण्याच्या ‘मूनलाइटिंग’ नावाने प्रचलित असलेल्या या संकल्पनेला जोरदार विरोध केला आहे.
विप्रो, इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या प्रमुख तीन आयटी कंपन्यांचा त्यामध्ये समावेश आहे. विप्रोने तर एका वेळी दोन कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या आपल्या ३०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळेच अशा प्रकारे काम करणं चूक आहे की बरोबर, वैध आहे की अवैध यावर जोरदार चर्चा सुरू असून यासंबंधीचे कंगोरे अभ्यासले जात आहेत. एकीकडे कर्मचाऱ्यांबरोबरच कंपन्यांना येऊ घातलेल्या जागतिक मंदीची चिंता आहे. उद्योगाच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण आर्थिक वर्षासाठी भरती लक्ष्यांमध्ये लक्षणीय सुधारणा झालेली नाही. असं असताना हे कारण देत कर्मचाऱ्यांची हकालपट्टी सुरू झाली, तर कठीण स्थिती उद्भवू शकते. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या नोकऱ्या करण्याचे प्रकार आधीही होत होते. खरं तर हे सर्वात मोठं उघड गुपित आहे, असं म्हणता येईल. पण इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रोसारख्या प्रमुख आयटी कंपन्यांनी प्रतिस्पर्धी कंपनीमध्ये काम करण्यावर आक्षेप घेत हे नैतिकतेला धरून नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे आता ही बाब चर्चेत आली आहे.
आपल्या समर्थनार्थ त्या दोन मुद्दे मांडतात. त्यातला एक म्हणजे गोपनीयता तर दुसरा आहे कर्मचाऱ्याची उत्पादकता. एखादा कर्मचारी आठ तास आपल्या कंपनीत काम करून संध्याकाळी आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीमध्ये काम करत असेल, तर गोपनीयतेचा भंग होण्याची भीती काही कंपन्या व्यक्त करतात. अशा कर्मचाऱ्याकडून माहिती तसंच संसाधनांचा गैरवापर करण्याची शक्यता ते बोलून दाखवतात. खेरीज दिवसातला अधिकाधिक काळ कामात व्यस्त राहिल्यास कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होण्याची भीतीही त्या व्यक्त करतात. यामुळे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीवर चुकीचे परिणाम होण्याची शक्यता त्यांना जाणवते. हे धोके लक्षात घेऊनच काही कंपन्या कर्मचाऱ्यांना नोकरी देतेवेळीच यासंबंधीच्या नियम आणि अटींची लेखी मान्यता घेतात. त्यांनी करारपत्रातच याविषयीचे स्पष्ट संकेत दिलेले असतात. त्यामुळे पुढे एखादा कर्मचारी एकाच वेळी दोन कंपन्यांमध्ये काम करताना आढळल्यास त्याच्यावर सक्तीने कारवाई करण्याचा अधिकार कंपनीकडे राहतो.
एकीकडे कंपन्यांची ही बाजू असताना कर्मचारी मात्र हा अन्याय असल्याचं सांगतात. यातली पहिली बाब म्हणजे कर्मचाऱ्यांचं दुसरं काम प्रतिस्पर्धी कंपनीमध्येच असेल असं नाही. आठ-नऊ तासाचं ठरलेलं काम केल्यानंतर उर्वरित वेळी काय करायचं, हा आमचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. कदाचित कोणी डिलिव्हरी बॉय, लेखनिक, सहाय्यक, केटरिंग, शिवण, मार्गदर्शक, क्लासेस अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये काम करू शकतं. त्यांचा आधीच्या कामाशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे दुसरं काम करणाऱ्यांवर सरसकट कारवाई करण्याच्या कंपनीच्या धोरणाबबत ते असंतोष व्यक्त करतात. विशेषत: रात्री किंवा आठवड्याच्या शेवटी दुसरं काम करणाऱ्यांची संख्या अधिक असते. अमेरिकन लोक त्यांच्या उत्पन्नाची पूर्तता करण्यासाठी नियमित नऊ ते पाच नोकरीव्यतिरिक्त दुसरी नोकरी शोधू लागले तेव्हा ‘मुनलाईटिंग’ म्हणजेच चंद्रप्रकाश पडला तरी काम करत राहणं या अर्थाची ही संकल्पना सर्वप्रथम मांडली गेली. आज त्यावरूनच चर्चा सुरू झाली आणि हा वाक्यांश सुप्रसिद्ध झाला.
आधी उल्लेख केल्यानुसार ‘मुनलाईटिंग’ बाबतीत आयटी क्षेत्रही विभागलं गेलं आहे. काहीजण याला अनैतिक म्हणतात, तर काहींच्या मते ही काळाची गरज आहे. ‘विप्रो’चे अध्यक्ष त्यांच्या या संदर्भातल्या निर्णयाबद्दल पूर्णपणे स्पष्ट आहेत. ही स्पष्ट फसवणूक असल्याचं ते सांगतात. असं असलं तरी जागतिक आर्थिक मंदीच्या काळात काम करून घेण्यासाठी भारत हे एक चांगलं ठिकाण आहे आणि त्यामुळे नोकरदार वर्गाच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात, ही वस्तुस्थिती आहे. इथे तुम्हाला चांगले तंत्रज्ञ, कुशल कारागीर मिळू शकतात. अनेकांना कामाची गरज असल्यामुळे आवश्यक ते मनुष्यबळ मिळू शकतं. खेरीज रोजगार देणं हा कंपनी आणि नोकरदार यांच्यातला करार आहे. हा करार दिवसातले ठरावीक तास काम करण्यासाठी पैसे देण्याबाबत असतो. त्या वेळेनंतर नोकरदार त्याचं आयुष्य जगण्यास स्वतंत्र आहे, हा विचार कर्मचाऱ्यांना आशा देऊन जाणारा आहे. ‘टेक महिंद्रा’चे एमडी सी. पी. गुरनानी यांनी याबाबत सांगितलं की, त्यांची संस्था कदाचित असं धोरण तयार करेल; जेणेकरून कामगारांना एकाच वेळी अनेक नोकऱ्या उघडपणे करता येतील. त्यात कंपनी हस्तक्षेप करणार नाही. पण त्याबद्दल कर्मचाऱ्यांनी पारदर्शकता ठेवावी, असंही स्पष्ट करण्यास ते विसरत नाहीत. काही लोक याकडे नैतिक समस्या म्हणून पाहतात. कोणताही प्रकल्प कार्यालयीन वेळेच्या बाहेर किंवा शनिवार आणि रविवारी घेतला जातो आणि उत्पादकतेवर परिणाम न करता तसंच स्वारस्यांचा संघर्ष न राहता राबवता येतो, त्याला कंपनीचा आक्षेप असण्याचं कारण नाही, असं या कंपनीच्या वरिष्ठांनी स्पष्ट केलं. एकूणच जास्त अर्थात दुहेरी रोजगार ही आज अनेकांची गरज आहे.