नवी दिल्ली : नाशिकमध्ये आज पहाटे झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर या खासगी बसने पेट घेतला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या बस दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, नाशिक इथल्या दुर्घटनेबद्दल ऐकून दुःख झाले. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन दुर्घटना बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे. नाशिक दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाखांची मदत दिली जाणार असून जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. शिवाय जखमींवर मोफत सरकारी उपचार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री तातडीने नाशिककडे रवाना झाले आहेत.