Friday, April 25, 2025
Homeमहत्वाची बातमीकोरोना काळात सेव्हन हिल्सचे मोठे योगदान

कोरोना काळात सेव्हन हिल्सचे मोठे योगदान

डॉ. मोहन जोशी यांनी जागवल्या कठीण काळातील आठवणी

मुंबई (प्रतिनिधी) : मार्च २०२० चा तो काळ होता. त्यावेळी चीनसह जगभरात कोरोनाने हैदोस घालायला सुरुवात केली होती. भारतातही कोरोनाचा प्रवेश झाला आणि साऱ्या आरोग्य व्यवस्थेची तारांबळ उडाली. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. जगभरात कोणालाच या रोगाबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे रुग्णांवर कसे उपचार करावेत? याबाबत कोणीच ठोस मार्गदर्शन करत नव्हते. अशा कठीण काळात दाटीवाटीने वसलेली वस्ती असलेल्या आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या मुंबईसमोर कोरोनाला रोखण्याचे आव्हान होते. आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, परिचारीका, कर्मचारी यांनी चोवीस तास झटत कोरोनाविरोधात लढा दिला.

महिनोनमहिने ही लढाई अविरत चालली. आरोग्य व्यवस्था अक्षरश: पणाला लावली, अशा भारावलेल्या आणि तितक्याच धीरगंभीर आठवणी जागवल्या त्या कोरोनाविरोधातील लढाईत आघाडीवर असलेले लो. टिळक रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी दैनिक प्रहारच्या १४व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनीष राणे, दैनिक प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, दैनिक प्रहारचे प्रशासन व लेखा प्रमुख ज्ञानेश सावंत यांनी डॉ. मोहन जोशी आणि बीग बॉस फेम, वृत्त निवेदक रत्नाकर तारदाळकर यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. दैनिक प्रहारचे वरिष्ठ उपसंपादक दीपक परब यांनी ज्येष्ठ पत्रकार सुधीर हेगिष्टे यांचे स्वागत केले. दैनिक प्रहारचे उपसंपादक संदीप खांडगे-पाटील यांनी ज्येष्ठ पत्रकार संजय पुरंदरे यांचे स्वागत केले.

आरोग्य सेवा पणाला

डॉ. मोहन जोशी पुढे म्हणाले की, कोरोनाला मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी आयुक्तांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला मोठमोठे डॉक्टर्स, डीन उपस्थित होते. परदेशातून येणाऱ्यांना क्वारंटाईन आणि आयसोलेट करण्याचे ठरले. त्याकरिता एअरपोर्टलगतच असलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयाची निवड करण्यात आली. पण एअरपोर्ट अथॉरिटीकडे स्क्रीनींगसाठी डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी नसल्याने पुन्हा पेच निर्माण झाला. त्यावेळी एअरपोर्टवर तत्कालीन पालिका आयुक्त, संचालक यांच्यासह डीन असल्याने मलाही तेथे उपस्थित रहावे लागले. त्यावेळी हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. परदेशातून येणाऱ्यांची माहिती घ्यायची, त्यांची तपासणी करून गरज पडल्यास त्यांना दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली. सेव्हन हिल्स रुग्णालय एक ते दोन वर्षे ओस पडून होते. त्यामुळे सेव्हन हिल्सचे कोविड उपचार रुग्णालयात रुपांतर करण्याचे मोठे आव्हान होते. दुसऱ्याच दिवशी आयुक्तांचा मला फोन आला आणि सेव्हन हिल्स रुग्णालयाला जाण्याचे आदेश देण्यात आले. माझी बदली तेथे झाली. हे हॉस्पीटल बंद असल्यामुळे भूत बंगल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. सर्वप्रथम सेव्हन हिल्स हॉस्पीटलचे रुपडे पालटण्याची आवश्यकता होती. त्यावर मात केली. मला तेथे २४ तास रहावे लागले.

१२०० ऑक्सिजन बेडचे आणि ३०० आयसीयू बेडचे हॉस्पीटल एका महिन्यात तयार केले. नर्सेस, वॉर्ड बॉय, डॉक्टर्स कसे मिळवायचे हा प्रश्न होता. स्वच्छता करणारे कर्मचारी होते. पण त्याव्यतिरिक्त कोणताच स्टाफ नव्हता. तोही उभा केला. कोरोनाच्या भीतीने आरोग्य कर्मचारी कामावर येत नव्हते. अनेकांना येण्याची इच्छा होती. परंतु भीतीमुळे आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्यावर बंधने घातली. अनेकांना महिनाभर घरी जायला मिळाले नाही. आपल्या परीजनांना भेटायला मिळाले नाही. पण तरीही न थकता कोरोनाविरोधातील लढाई सुरूच होती.

उद्योजक, कलाकार, राजकारणी सर्वांचेच सहकार्य

त्यावेळी मदतीची गरज प्रत्येकालाच होती. आरोग्य कर्मचारी चोवीस तास हॉस्पीटलमध्ये असल्याने त्यांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था होणे गरजेचे होते. मुंबईतील ताज ग्रुपतर्फे मोठ्या संख्येने जेवणा-खाण्याची व्यवस्था झाली. मोठमोठ्या उद्योजकांची मोलाची मदत मिळाली. दिवसभर काम करत असल्याने डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या मानसिक संतुलनाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण अशा काळात कलाकारांनीही त्यांचे विनामूल्य मनोरंजन केले. मोठमोठ्या हॉटेल्सनी राहण्याची खाण्याची व्यवस्था केली. राजकीय नेतृत्वांनीही टेम्पोच्या टेम्पो भरून साधनसामुग्री पाठवली. रक्तदान मोठ्या प्रमाणात झाले. जात-धर्म-पंथ विसरून सारेच जण कोरोना विरोधातील लढाईत सहभागी झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -