डॉ. मिलिंद घारपुरे
एका संध्याकाळी घरी आलो. शेजारचे काका साधारण साठीचे, माझी वाट बघत. ‘अरे डॉक्टरा, जरा तुझा मौल्यवान वैद्यकीय सल्ला हवाय रे बाबा!! ‘कॅटरॅक्टचं ऑपरेशन करतोय. दोन लेन्स सजेस्ट केल्या आहेत डॉक्टरांनी. ७० हजार आणि सव्वा लाख. कुठली घेऊ? मी जरा सीरियसली त्यांचे माहितीपत्रक गुगल करून अभ्यासून सांगितले. ही ७० हजारांची ठीक आहे. तुमचं वय वगैरे विचार करता…
आता, काकांनी मला पटवायला सुरुवात केली… की, ही सव्वा लाखांची कशी चांगली ते… थोड्या वेळाने माझ्याकडून सव्वा लाखांची लेन्स कशी चांगली हा सल्ला मलाच पटवून (?) ते समाधानाने गेले.
अजून एक प्रसंग. एका जुनियरचा फोन… ‘सर जरा सल्ला हवाय, नोकरी बदलतोय. या दोन कंपन्या दोघांकडूनही फायनल ऑफर. कुठली निवडू? दोन्हीही उत्तम कंपन्या. तरीही तरतमतेनुसार, माझा व्यावसायिक अनुभव, त्याचा स्वभाव, दोन्ही कंपन्यांचे कल्चर यानुसार मी निर्णय दिला. आता बरोब्बर त्याच्या विरुद्धची कंपनी चांगली कशी? त्याची चांगलीच बाजू फक्त मांडणं वाईट बाजू दुय्यम ठरवणं… आणि शेवटी त्याचाच निर्णय कसा योग्य हे माझ्याकडून वदवून घेऊन त्याच खूश होणं आणि मी त्याच मनापासून अभिनंदन करणं.
एक गमतीदार शोध –
सल्ला मागायला आलेल्या लोकांना बहुतांश वेळा सल्ला नकोच असतो. निर्णय झालेला असतो त्यांचा. काय हवं असतं त्यांना, तर त्यांच्या निर्णयाचं समर्थन आणि अनुमोदन… समाधान करून घेण्यासाठी… ‘स्वतःचं!’
ता. क. – फुकाचा सल्ला देऊ नये आणि समोरच्याचा निर्णय बदलण्याचा अट्टहास कधीही करू नये.
(हा पण फुकाचा सल्ला आहे बरं!!! क्षमस्व)