मुंबई (वार्ताहर) : आयात केलेल्या मालामध्ये अनेक विदेशी प्रजातींचे ६६५ प्राणी महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई झोनल युनिटने जप्त केले. मुंबईतील दुर्मीळ आणि विदेशी वन्यजीव प्रजातींची ही सर्वात मोठी जप्ती आहे. अजगर, सरडे, कासव आणि इगुआना यासारख्या विदेशी प्रजातींचे प्राणी माशांच्या कार्टनमध्ये लपवलेले आढळले. आयातदार आणि ज्या व्यक्तीला तो डिलिव्हरी करणार होता त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
हे प्राणी मलेशियातील आहेत. यामध्ये कासव, साप, सरडे आणि इगुआना या प्राणांचा समावेश आहे. हे एकूण ६६५ परदेशी प्राणी महसूल गुप्तचर विभागाने जप्त केले आहेत. या प्रकरणी दोन तस्करांनाही अटक करण्यात आली आहे. या जप्त केलेल्या प्राणांमधील काही प्राण्यांचा मृत्यू झाल्याचेही दिसून आले. या जप्त केलेल्या प्राण्यांची अंदाजे किंमत सुमारे तीन कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी धारावीमधील इमानवेल राजा आणि माझगावमधील व्हिक्टर लोबो यांना अटक केली आहे. मलेशियातून माशांचा कंटेनर पोहोचला होता. त्यांच्याबरोबरच हे जिवंत प्राणी आणल्याची माहिती मिळाली होती. त्यावरूनच ही कारवाई करण्यात आली.