वेगाची आवड प्रत्येकालाच असते. पण हा वेग आवर घालण्याइतकाच असायला हवा. कारण अतिवेग हा नाहक कुणाचा तरी जीवघेणा ठरतो, हे वेळोवेळी दिसून आले आहे. अपघात घडला की, लगेच तेवढ्यापुरते वेगमर्यादा, वाहतूक नियमांचे पालन, वाहतूक सुरक्षा, वाहतूक कायद्याचे काटेकोर पालन व्हावे, असे मुद्दे आवर्जुन चर्चिले जातात आणि काही दिवसांत पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे सर्व चुकीच्या म्हटल्या जाणाऱ्या त्या गोष्टी पुन्हा सुरूच राहतात आणि अपघातांची जीवघेणी मालिका सुरूच राहते. खरं म्हणजे आपले जीवन सुसह्य होण्यासाठी मोठ-मोठाले महामार्ग, द्रुतगती महामार्ग, आवाढव्य पूल, नदी – नाले तसेच समुद्र मार्ग, अशा मूलभूत सोयीसुविधांची उभारणी केली जाते. पण या सुविधांचा वापर जर आपण योग्य तऱ्हेने केला नाही, तर ते नक्कीच जीवघेणे ठरतात. एखाद्याच्या फालतू चुकीमुळे ज्यांचा काहीच संबंध नाही अशा लोकांना जीव गमवावे लागतात किंवा ते लोक कायमचे जायबंदी होतात. त्यामुळे सोयी-सुविधांचा वापर करताना सर्वांनी तारतम्य बाळगणे क्रमप्राप्तच आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे राज्यात सर्वत्र दसऱ्याची धामधूम सुरू असताना मुंबईत भल्या पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. वांद्रे-वरळी सी लिंकवर हा अपघात झाला.
वांद्रे – वरळी सागरीसेतूवर (सी लिंक) अलीकडेच मध्यरात्री झालेला विचित्र भीषण अपघात. यावेळी प्रथम मध्यरात्री २.४० वाजण्याच्या सुमारास एका गाडीचे टायर फुटून अपघात झाला होता. त्या अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी तिथे रुग्णवाहिका पोहोचली होती. पण काही वेळाने म्हणजे १३ मिनिटांनी २.५३ वाजता तेथून भरधाव आलेल्या एका गाडीने त्या अपघाग्रस्त गाडीसह रुग्णवाहिकेला जबरदस्त धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले. या अपघातानंतर सागरीसेतूच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता तेथील सुरक्षेचा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच या अपघाताचीही स्वतंत्र चौकशी एमएसआरडीसीकडून करण्यात येत आहे. प्रथमदर्शनी या अपघातात नेहमीप्रमाणे वाहनचालकाची चूक असल्याचे आढळले आहे. या पाच जणांचा बळी घेणाऱ्यास ओव्हर स्पीडिंग आणि रॅश ड्रायव्हिंगसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीमध्ये मोबाइल चार्जिंग कॉर्ड जोडण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे लक्ष विचलित झाल्याने हा अपघात घडला असे त्याने सांगितले आहे. गाडीवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी आधीच अपघातग्रस्त झालेल्या गाडीवर आणि रुग्णवाहिकेवर जाऊन आदळली आणि काहीही चूक नसताना अनेकांचे जीव गेले. तथापि नेमके काय घडले हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल. विशेषत: पहिला अपघात घडल्यानंतर सात मिनिटांत टोईंग वाहन आणि रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी रस्तारोधक उभेही करण्यात आले होते आणि जखमींना रुग्णवाहिकेत बसविण्यात येत होते. बॅरिकेडिंगही करण्यात आले होते, येणाऱ्या वाहनांना मार्गदर्शन करण्यासाठी ट्रॅफिक मार्शलही होते. पण दुर्दैवाने भरधाव आलेली गाडी त्या सर्वांवर येऊन आदळली आणि दुसरा भीषण अपघात झाला. चार वाहने आणि रुग्णवाहिका यांच्यात धडक होऊन हा भीषण अपघात झाला.
हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत वेगाने येणारी कार रुग्णवाहिकेला धडक देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा झाला. वांद्रे-वरळी सी लिंकवर या भीषण अपघातात चार कारचा चक्काचूर झाला आहे. काही कारमधील एअर बॅग्जही उघडल्याचे दिसून येत आहे. या अपघातानंतर सी-लिंकवर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी नायर, सैफी, लीलावती, ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. मृतांमध्ये चेतन कदम याचा समावेश असून चेतन हा प्रभादेवी येथील रहिवासी आहे. सात ते आठ वर्षांपासून टोल नाक्यावर तो सुपरवायझर म्हणून नोकरीला होता. वांद्रे-वरळी सी लिंकवर चेतन याने याआधी अनेकांचे प्राण वाचविले आहेत. त्यामुळे पोलिसांनी देखील त्याला गौरविले होते. चेतन हा चांगला कार्यकर्ता अपघातात बळी पडाला आहे. अपघाताची अधिक चौकशी सुरू असून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून दिली आहे. या अपघातानंतर सागरीसेतू अधिक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने दिले आहे. याचाच अर्थ वांद्रे – वरळी सागरीसेतूवरील भीषण अपघातानंतर अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला आता पुन्हा जाग आली आहे. शून्य अपघात हे आपले उद्दिष्ट असल्याचा दावा करीत अपघातांना आळा घालण्यासाठी नव्या उपाययोजना करण्यात येतील, असेही एमएसआरडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एमएसआरडीसी, मुंबई वाहतूक पोलिसांसह सी लिंकच्या विद्यमान सुरक्षा उपायांचे आणि आवश्यक असल्यास अतिरिक्त प्रोटोकॉलचे पुनरावलोकन करणार आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय केले पाहिजे याचा शोध घेतला जाणार आहे. या भीषण अपघातानंतर एमएसआरडीसीला जाग आली आहे. हा सी लिंक वाहतुकीसाठी खरंच उपयुक्त आहे. पण मानवनिर्मित चुकांमुळे भीषण अपघात घडत आहेत. अशा अपघातांना वेगावर कमालीची मर्यादा आणून आळा घालणे सहज शक्य आहे. मात्र सी लिंकवर जाऊन आत्महत्या करणाऱ्यांचे काय? त्यासाठी तेथे जाणाऱ्यांवर आणि भरधाव वाहने चालविणाऱ्यांवर बंधने ही घालायलाच हवीत. नाहीतर हा देखणा ‘सी लिंक’, मृत्यूचे द्वार बनण्याची शक्यता अधिक आहे.