मुंबई (वार्ताहर) : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातंर्गत कार्यरत अतिक्रमण निर्मूलन कक्षासमोरील दालनात नागरिकांना अतिक्रमण निर्मूलन विभागाची कामकाज पद्धती, नियमांची माहिती देणाऱ्या १२ फलकांचे अनावरण ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते नुकतेच म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. यामुळे कामकाजातील पारदर्शकता आणि नागरिकांची प्रशासन आणि कार्यपद्धतीबद्दल सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत होऊ शकेल आणि गैरकायदेशीर कारवायांना आळा बसण्यास मदत होईल, असे डिग्गीकर यांनी सांगितले. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, अतिक्रमण निर्मूलन कक्षाचे प्रमुख संदीप कळंबे, मंडळाचे निवासी कार्यकारी अभियंता प्रकाश सानप, कार्यकारी अभियंता संजय जाधव आदी उपस्थित होते.
सन २०१८ पासून शासनाने म्हाडाला एमआरटीपी अॅक्टनुसार विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा प्रदान केल्यामुळे म्हाडा मालकीच्या जमिनीवरील विनापरवाना बांधकामावर तत्काळ आणि प्रभावी कारवाई करणे अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माध्यमातून शक्य झाले आहे.