राज्यात दसऱ्यानिमित्त बुधवारी एक – दोन नव्हे तर तीन मोठ्या राजकीय नेत्यांचे दसरा मेळावे झाले. यात पहिला मेळावा दुपारी भगवान भक्तिगडावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा झाला. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर सुरू झाला. त्याशिवाय शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचाही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत २ गट पडले आहेत. त्यामुळे यंदा दोन दसरा मेळावे आयोजित करण्यात आले. या दसरा मेळाव्यांसाठी दोन्ही गटांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही कंबर कसली होती. यावेळी पोलिसांचा चांगलाच कस लागला व प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन्ही मैदानांत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. महिला पोलिसांचाही बंदोबस्तात मोठा सहभाग होता. पोलिसांसोबत अनेक स्वयंसेवी संघटना यावेळी काम करत होत्या. त्यात अनेक निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनाही बंदोबस्तात सहभागी करून घेतले होते. अनेक वाहने या मेळाव्यासाठी येणार ही बाब ध्यानी घेऊन पार्किंगची चोख व्यवस्थाही वाहतूक विभागाकडून करण्यात आली होती. ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपापल्या दसरा मेळाव्यात तुफान गर्दी जमविण्यासाठी कंबर कसली होती. जास्त गर्दी कोणाच्या मेळाव्यात होणार, याबाबत कमालीची उत्सुकता लागून होती. या मेळाव्यांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले होते. शक्तिप्रदर्शनाची ही कांटे की टक्कर कोण जिंकणार, हा मुद्दा ऐरणीवर होता. शिवसेनेत पडलेल्या ‘न भूतो न भवष्यते’ अशा फुटीनंतर इतिहासात पहिल्यांदाच मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचा हाच खरा दसरा मेळावा असल्याचा दावा केला जात आहे. खरी शिवसेना कोणती? याचे उत्तरही बीकेसीतील गर्दीने दिले आहे.
त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे शिंदेंच्या दसरा मेळाव्यातील गर्दीने दाखवून दिले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात याहीवेळी वेगळा असा मुद्दा दिसला नाही. पण शिंदे यांनी मात्र आम्ही गद्दारी केली नाही, तर गदर केला आहे. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचा शिलेदार आहोत व ते आम्ही अभिमानाने छातीठोकपणे सांगू शकतो, अशा शब्दांत उद्धव यांना सुनावले. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचे का? सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिलीत, मग खरे गद्दार कोण? हे जनतेला समजले आहे. म्हणून जनता आमच्याबरोबर आहे, असा घणाघात शिंदे यांनी यावेळी केला आणि एकप्रकारे ठाकरे यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे, असेच म्हणावे लागेल. खरे म्हणजे ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची आहे, ना एकनाथ शिंदेंची आहे. ही शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आहे, हे शिंदे यांनी सुचकपणे सांगितले. तसेच आम्ही सत्तेसाठी लाचारी करून शिवसेनाप्रमुखांचा विचार सोडलेला नाही आणि सोडणारही नाही. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि स्वत्त्व महत्त्वाचे आहे. बाळासाहेबांनी ज्या पक्षांचा हरामखोर असा उल्लेख केला त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली. हे बघून बाळासाहेबांच्या मनालाही वेदना झाल्या असतील. त्यामुळेच आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी, बाळासाहेबांच्या विचारांची जपवणूक करण्यासाठी, हिंदुत्वासाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी ही भूमिका घेतली. आम्ही ही भूमिका जाहीरपणे घेतली, लपून-छपून घेतलेली नाही. बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला, अशा भाषेत त्यांनी उद्धव यांना सुनावले. शिंदे गटाचा दसरा मेळावा अन्य काही गोष्टींनीही लक्षवेधी ठरला आहे. मेळाव्यात एक विश्वविक्रम झाला असून यावेळी त्यांना १२ फुटी चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्यानिमित्ताने १२ फुटांची चांदीची तलवार भेट म्हणून दिली आहे. विशेष म्हणजे या तलवारीने विश्वविक्रम केला असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वात मोठी तलवार ठरली आहे. चांदीचा धनुष्यबाण, चांदीची गदा देखील शिंदे यांना भेट म्हणून देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५१ फुटी भव्य अशा तलवारीचे पूजन करण्यात आले. रामदास कदम, शंभुराज देसाई व इतर नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. मंत्रोच्चारात शस्त्रपूजा झाली. यानंतर तुळजापूरहून आलेल्या ज्योतीचे त्यांनी दर्शन घेतले. शिंदे व ठाकरे या दोघांकडून दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय द्वंद्व सुरू झाल्यानंतर आपलाच आवाज बुलंद हे दाखवण्यासाठी दोन्ही गटांनी गेल्या दहा दिवसांत सर्व शक्ती पणाला लावली. त्यात जनशक्ती आणि धनशक्तीचा विचार केल्यास शिंदे गट भारी पडल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडताना भाजपच्या स्क्रिप्टशिवाय भाषण करण्याचे आवाहन केले होते. पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणांत यावेळीही तेच तेच मुद्दे अधोरेखित करण्यात आले. मूळ मुद्दा म्हणजे शिवसेनेचा मूळ विचार सोडून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करीत महाविकास आघाडी स्थापन केल्याने अनेकांनी त्यांची साथ सोडल्याचे दिसून आले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विकासाच्या मुद्द्यावर भर दिलेला दिसला. तसेच आपण काय केले आहे, भविष्यात काय करणार आहोत, याबाबत त्यांनी भाषणात स्पष्टता ठेवलेली दिसली. एकूण काय बीकेसीतील मेळाव्यात शिंदे यांनी धारण केलेली आक्रमक मुद्रा पाहता त्यांचा गट खरा शिवसेना असल्याचे दाखवून दिले आहे आणि उद्धव यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.