मुंबई (वार्ताहर) : कुर्ला रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवार/रविवारी रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी रात्री १२.३० ते पहाटे ०६.०० वाजेपर्यत पुलाचा गर्डर टाकण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान लोकलच्या वाहतुकीत बदल केले आहेत.
मध्य रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक क्रमांक ४ आणि ५ वर ८.० मीटर रुंद पादचारी पुलाच्या पाच प्लेट गर्डर लाँच करण्यात येणार आहे. या कामाकरिता २५० मटी रोड क्रेन वापरून अप धीम्या मार्गावर आणि डाउन जलद मार्गावर रात्रीचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ८/९ ऑक्टोबर २०२२ रोजी (शनिवार/रविवार) रात्री १२.३० ते पहाटे ०६.०० वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावर विद्याविहार ते माटुंगा दरम्यान आणि डाउन जलद मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान घेण्यात येणार आहे.
या ब्लॉककालावधी सीएसएमटी येथून सकाळी ०५.२० वाजता सुटणारी कल्याण जलद एसी लोकल शॉर्ट ओरीजीनेट होऊन घाटकोपर येथून पहाटे ०५.४४ वाजता निघेल. सीएसएमटी येथून दुपारी १२.२४ वाजता सुटणारी कर्जत लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.