नवी दिल्ली : ठाकरे आणि शिंदे गटातील पक्षचिन्हाबाबतच्या वादावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात पक्षचिन्हाबाबत आज सुनावणी होणार होती पण शिवसेना आज पुरावे सादर करणार असून ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीतील ट्वीस्ट वाढला आहे.
अंधेरी येथील पोटनिवडणूक तोंडावर आली असून येत्या ३ नोव्हेंबरला यासाठी मतदान होणार आहे. तर १७ ऑक्टोबपर्यंत अर्ज परत घेण्याची मुदत आहे. त्यामुळे लवकर पक्षचिन्हाचा निकाल लागला तर दोन्ही गटाचे संभ्रम दूर होणार आहेत. तर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पक्षचिन्हाचा निकाल लागला नाही तर या निवडणुकीत दोन्ही गटासाठी प्रश्न निर्माण होणार आहेत.
सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने हा निकाल येण्याआधी पक्षचिन्हाबाबत आणि पक्षाबाबत निर्णय देऊ नये अशी याचिका दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही स्थगिती उठवल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या प्रकरणावर सुनावणी होत आहे.
जर या पोटनिवडणुकीच्या आधी पक्षचिन्हाबाबतचा निकाल लागला नाही तर शिंदे गट भाजपकडून आपला उमेदवार उभा करणार असल्याची चर्चा आहे. पण पुरावे सादर केल्यानंतर लगेच हा निर्णय होऊ शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटाने पक्षचिन्ह आम्हाला द्या अशी मागणी केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे.