पनवेल (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ स्पर्धेमध्ये आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते १० लाख लोकसंख्येच्या गटामध्ये राज्य पातळीवर ३४ शहरांमध्ये पनवेल महानगरपालिकेला ५ वा क्रमांक प्राप्त झाला. तसेच देशपातळीवर ३८२ शहरांमध्ये १७ वा क्रमांक प्राप्त झालेला आहे. याचबरोबर कचरामुक्त शहरांसाठीचे ३ स्टार व हागणदारीमुक्त शहराचा ओडीएफ ++ दर्जा प्राप्त आहे. महापालिका स्थापनेपासून उत्तोरोत्तर प्रगती करत यावर्षी सर्वोत्तम क्रमांक प्राप्त केला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये पनवेल महानगरपालिकेने अत्यंत उत्साहाने सहभागी होत यावर्षी महानगरपालिका क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त सचिन पवार यांच्या निर्देशानुसार स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे संदेश प्रसारित करणारी चित्रे भिंतीवर काढण्यात आली होती. तसेच तलावांची स्वच्छता करण्यात आली होती. विविध टाकाऊ वस्तूंचे रिड्युस, रियुझ, रिसायकलचा प्रचार व प्रसार करण्याकरिता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तसेच टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या विविध शोभेच्या वस्तूंपासून चौक, कोपरे सुशोभित करण्यात आले होते.
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत चित्रकला, पोस्टर जिंगल,गाणी, व्हिडिओ, शॉर्ट फिल्म, पथनाट्य, भिंतीचित्र स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच स्वच्छ सोसायटी, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ महाविद्यालय-शाळा, स्वच्छ प्रशासकीय कार्यालये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्वच्छता विषयक जनजागृतीमध्ये आपला सहभाग नोंदवला. महापालिकेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन विषयक विविध उपक्रम राबविले गेले. त्यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांना त्यांच्या विविध सभा, समारंभ थ्री आर संकल्पनेनुसार साजरे करण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहेत. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. विविध सोसायट्यांमध्ये कचरा विलगीकरणाचे महत्व सांगून कंपोस्ट खत तयार करण्याच्या कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या.
पनवेल महानगरपालिकेच्या लोकप्रतिनीधी, स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, विभाग प्रमुख अनिल कोकरे यांच्या बरोबर स्वच्छता निरीक्षक, कर्मचारीवृंदाने व स्वच्छता मित्रांनी केलेले स्वच्छताविषयक काम आणि त्याला नागरिकांचा लाभलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पनवेल महानगरपालिकेस स्वच्छतेचा हा बहुमान प्राप्त झालेला आहे. यापुढेही स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महापालिकेची प्रगती करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी महापालिका क्षेत्र कचरामुक्त राहावे यासाठी शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.