Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात सकाळपासून काळे ढग जमा झाले होते. तर दुपारपासून वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यासह मुंबईच्या उपनगरात जोरदार पावसाची नोंद झाली.

सलग तीन ते चार तासांपासून मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाचा जोर असून सखल भागांत पाणी साचले. अंधेरी सब-वे पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी मार्केटमध्ये पाणी साचल्याने भुयारी मार्ग बंद आहे. त्यामुळे वाहतूक गोखले रोडने वळवली आहे.

हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला असून शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस ठाणे, रायगड, पालघर, पुणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, धुळे आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक होसाळीकर यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली. तसे ठाणे, नवी मुंबई, मध्य मुंबईबरोबरच पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दादर, एलफिस्टनसारख्या भागांमध्ये पाणी साचू शकते असे देखील सांगण्यात आले आहे.

डोंबिवलीत दुपारी एक वाजल्यापासून दमदार पाऊस सुरु असून दोन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. तसेच वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडत होता. यामुळे नांदिवली, केळकर रोड, डोंबिवली स्टेशन परिसर इत्यादी भाग जलमय झाला होता.

विदर्भासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा हे चार जिल्हे वगळता राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -