जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हयात यंदा समाधानकारक पाऊस झाला असून जिल्हयातील तीन मोठे प्रकल्प, अकरा मध्यम प्रकल्प भरले असून धरणांमध्ये साठवणीच्या ९४. ७६ टक्के पाण्याचा साठा झालेला आहे. या सर्व धरणात ४७.७६ टीएमसी पाणी साठा झालेला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ३९.३० टीएमसी पाणी साठा होता. जिल्हयात तापी नदीवर हतनूर धरण असून आज धरणात १०० टक्के साठा ८.७५ टीएमसी साठा झालेला आहे. दीपनगर औष्णिक केंद्र भुसावळ ऑर्डिनन्स फॅक्टरी, भुसावळ रेल्वे स्टेशन व शहर तसेच जळगाव एमआयडीसीला या धरणातून पाणी पुरवठा होतो. १९७० साली बांधलेल्या या धरणात आज मोठया प्रमाणावर गाळ साचला असून तो काढण्याची नितांत गरज आहे. अन्यथा पुढील काही वर्षात हे धरण गाळाने भरून निकामी होण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेले गिरणा धरण हे सलग पाचव्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. आज या धरणात १८.४९ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरणावर मालेगाव महापालिका, १० नगरपालिका, २ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, पाच तालुक्यातील १०८ गावे ही पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहे. या शिवाय मोठया प्रमाणावर शेतीला पाणी दिले जाते. वाघूर नदीवरील वाघूर धरणातून जळगाव शहराला तसेच एमआयडीसीला पाणी पुरवठा होतो. तसेच जळगाव – भुसावळ तालुक्यातील शेतीलादेखील पाणी दिले जाते. आज या धरणात ९१ टक्के म्हणजेच ८ टीएमसी पाणीसाठा आहे. अशा रितीने या तीन मोठया धरणात ३५.४५ टीएमसी साठा आहे.
जिल्हयात १३ मध्यम प्रकल्प असून यापैकी अभेारा, मंगरूळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, बोरी, मन्याड हे अकरा प्रकल्प पूर्ण भरले असून गुळ प्रकल्पात ८८.७० टक्के तर भोकरबारी प्रकल्पात ४९.१८ टक्के पाणीसाठा आहे. जिल्हयात ९६ लघु प्रकल्प ७६ टक्के भरले असून त्यात ५.३२ टीएमसी पाणि साठा आहे. अशा रितीने जिल्हयातील या सर्व प्रकल्पात ४७.७६ टीएमसी पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाई जाणवणार नसल्याचे सांगण्यात आले.