Friday, May 9, 2025

ठाणे

कल्याणमध्ये ‘माय ऑरबीट’ ऑनलाईन ॲप्लीकेशनची संकल्पना!

कल्याणमध्ये ‘माय ऑरबीट’ ऑनलाईन ॲप्लीकेशनची संकल्पना!

कल्याण (वार्ताहर) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित (महामंडळ) मार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध तसेच सफाई कामगार कुटुंबातील सदस्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या अडीअडचणी निवारण्यासाठी तसेच लाभार्थ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी ‘माय ऑरबीट’ या ऑनलाईन ॲप्लीकेशन प्लॅटफॉर्मची संकल्पना आणली आहे.


‘माय ऑरबीट’ ही ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रणाली असून, सदर प्रणाली मोबाईल, टॅब किंवा संगणक माध्यमातून नियोजित पद्धतीने कार्यरत होईल. याद्वारे लाभार्थ्यांना आपल्या समस्या किंवा अडीअडचणी नोंदविता व सोडविता येतील. सदर प्रणालीचा लाभ घेण्याकरिता महामंडळाच्या फक्त नोंदणीकृत लाभार्थ्यांनी प्रणालीमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी मांडलेल्या समस्यांसाठी एक युनिक रजिस्ट्रेशन कोड निर्माण होईल.


तद्नंतर प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपासून ते पुढील महिन्याच्या ६ तारखेपर्यंत अडीअडचणीचे एकत्रिकरण करून जिल्हा व्यवस्थापक स्तरावर एकत्रित अहवाल तयार करून जिल्ह्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाची चाचपणी करून प्रथम जिल्हा व्यवस्थापक प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेपासून ११ तारखेपर्यंत ते अर्ज निकाली काढतील व शिल्लक राहिलेले अर्ज ११ तारखेपासून १३ तारखेपर्यंत प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाकडून निकाली काढण्यात येतील.


तसेच प्रणालीमधील उर्वरीत तक्रार/ समस्या यांचे निरसन महामंडळाच्या मुख्यालयामधील महाव्यवस्थापक यांचेमार्फत महिन्याच्या १३ तारखेपासून ते १५ तारखेपर्यंत केले जाईल. तथापि, तक्रार निरसनाची जबाबदारी मुख्यालयातील संबंधित महाव्यवस्थापक यांची राहिल.

Comments
Add Comment