
मुंबई : भाजपने 'आदिपुरुष' या सिनेमाला विरोध दर्शवत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. मात्र या सिनेमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे. मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंदर्भात एक पत्र जाहीर केले आहे. ओम राऊत यांच्याकडून अभ्यासपूर्ण मांडणी केल्याचा दावा अमेय खोपकर यांनी केला आहे.
मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट केलं आहे, "ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी 'लोकमान्य' आणि 'तान्हाजी' या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट अँड साऊंड शो आजही दिमाखात सुरू आहे".
अमेय खोपकर पुढे म्हणाले आहेत, "ओम राऊत याच्या आगामी 'आदिपुरुष' टीझरवरुन टीका होणे हे दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचिती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा 'आदिपुरुष'च्या निर्मितीला पूर्ण पाठिंबा आहे".
अमेय खोपकर म्हणाले, "आदिपुरुष' सिनेमाची टीम आणि ओम राऊतच्या मागे मनसे खंबीरपणे उभी आहे. 'लोकमान्य' आणि 'तान्हाजी' सारखे सिनेमे ओमने बनवले आहेत. ओम राऊत हा हिंदुत्ववादी माणूस आहे. राज्यातल्या सिनेमा समजणाऱ्या हिंदुत्ववादी नेत्यांना माझा प्रश्न आहे, ९५ सेकंदच्या टीझरवरुन सिनेमा कसा असेल याचा अंदाज तुम्ही कसा बांधता? आधी सिनेमा पाहा".
अमेय खोपकर पुढे म्हणाले, "एक ९५ सेकेंडचा टीझर आऊट होतो आणि त्यानंतर टिका होते हे चुकीचे आहे. हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. पुढच्या पिढीला या सिनेमाच्या माध्यमातून पौराणिक गोष्टी कळतील. राम कदमांना सिनेमा कळत असेल तर त्यांनी सिनेमा बनवावा." असा टोलाही त्यांनी लगावला आहे.