Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीमुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणूक आम्हीच जिंकणार - देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणूक आम्हीच जिंकणार – देवेंद्र फडणवीस

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना कोणती आहे हे मुंबईतील दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दाखवून दिले. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेवर आणि विधानसभेवर आम्हीच भगवाच फडकवणार, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुण्यात आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवाजी पार्कपेक्षा बीकेसी मैदानाची क्षमता मोठी आहे. तरीही बीकेसीचे मैदान तुडुंब भरले होते. राज्यभरातून या मेळाव्यास लोक आले होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी काल नागपूरमध्ये धम्म चक्रप्रवर्तन कार्यक्रमात होतो. त्यामुळे कालची शिंदे व ठाकरे या दोघांची भाषणे मी ऐकू शकलो नाही. परंतु दोन्ही भाषणांचा सारंश माझ्याकडे आला. नागपूरमध्ये माझे कार्यक्रम झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण काही प्रमाणात मी पाहिले. त्यात शिंदेंनी खरी शिवसेना कोण हे दाखवून दिले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दसरा मेळाव्यातील भाषणावरुन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावर फडणवीस म्हणाले, अजित पवारांनी दसरा मेळाव्यावर काय प्रतिक्रिया दिली, हे मला माहिती नाही. परंतु मूळ शिवसेनेचा विचार उद्धव ठाकरे यांनी बाजूला टाकला व ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊन मिळाले. ज्यांचे मुंबईतील बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध आहे, अशा लोकांसोबत बसणे ठाकरेंनी मान्य केले. जे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना रोज शिव्या देतात अशा लोकांसोबत ठाकरेंनी हातमिळवणी केली. म्हणूनच ठाकरेंवर अशी वेळ आली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिमग्यावर सुज्ञ लोक प्रतिक्रिया देत नसतात. त्यामुळे ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाबाबत मी काही बोलणार नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरही भर दिला. महाराष्ट्रात आगामी काळात काय-काय विकास करायचा आहे, याची रुपरेषा त्यांनी मांडली. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंच्या भाषणात मात्र असे कधीही आढळले नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हे तर नेहमी शिवसेना पक्षप्रमुख म्हणूनच भाषण करत होते.

शिमग्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, शिमग्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते. कारण उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात शिमग्या पलीकडे काहीच नव्हते. उद्धव ठाकरे नेहमी नेहमी एकच स्क्रिप्ट वाचत असतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता नवीन स्क्रिप्ट रायटर बोलवावा. नेहमी तेच तेच बोलण्यापेक्षा त्यांनी नवीन कल्पना तरी भाषणात आणल्या पाहिजे. त्यांचे एकसारखे भाषण ऐकून कंटाळा आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -