नागपूर : नागपूर येथे असलेल्या राष्ट्रीय सेवासंघाच्या मुख्यालयाला जमावाने घेराव घालण्याचा प्रयत्न केला. भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. या प्रकरणी पोलिसांनी मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवला आणि आंदोलकांना ताब्यात घेतले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही भारतीय संविधानाला धरून नाही, असे म्हणत वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारत मुक्ती मोर्चाने आज नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वामन मेश्राम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या मोर्चात सहभागी होण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले होते. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तसेच उच्च न्यायालयानेही हा घेराव मोर्चा आणि बेझनबाग येथील सभा यांना परवानगी दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी या मोर्चाला पुढे जाऊ दिले नाही. पोलिसांनी रोखल्यामुळे कार्यकर्त्यांनी इंदोरा चौकामध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी आंदोलकांनी आरएसएसविरोधात घोषणाबाजी केली.
शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनासह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू असल्याने पोलिसांनी भारत मुक्ती मोर्चा संघटनेला आंदोलनाची परवानगी नाकारली होती. त्याचबरोबर न्यायालयाने देखील वामन मेश्राम यांची याचिका फेटाळून लावत सहा ते नऊ ऑक्टोबर दरम्यान पोलिसांकडे अर्ज करून कार्यक्रम आयोजित करावा, असे निर्देश दिले होते. तरी देखील वामन मेश्राम आणि त्यांची संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर कायम असल्यामुळे नागपूर शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण इंदोरा परिसरात कलम १४४ लागू केले आहे.