Friday, July 19, 2024
Homeमहत्वाची बातमीगर्भ जगविण्यासाठी प्रयत्न करू या...

गर्भ जगविण्यासाठी प्रयत्न करू या…

संदीप खांडगेपाटील

सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताविषयी नुकताच महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला असून समाजामध्ये त्याविषयी उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विवाहित तसेच अविवाहित महिलांना २४ महिन्यांपर्यंत गर्भपात करण्याची न्यायालयीन निकालामुळे परवानगी मिळाली आहे. मुळातच गर्भपाताला परवानगी देताना सहा महिन्यांची वाट पाहायचीच कशाला? गर्भवती महिला व गर्भाशयातील अर्भक यांचे नाते शब्दांमध्ये मांडण्यापलीकडे व त्या महिलेशिवाय अन्य कोणाला उमजण्यापलीकडचे आहे. साधारणपणे नववा महिना संपल्यावर सहा ते दहा-अकरा दिवसांमध्ये महिलेची कधीही प्रसूती होते; परंतु गर्भाशयातील अर्भक वेगाने गर्भाशयात विकसित झाल्यावर अथवा अन्य कारणांमुळे महिलांची सातव्या महिन्यातही प्रसूती होत असते. विषय मुळातच गर्भपाताला देण्यात आलेल्या परवानगीचा नसून गर्भपात न करता त्या बाळाला जन्म देऊन सरकारने स्वतंत्र विभागाची निर्मिती करून अशा बाल्यांचे संगोपन करण्यास पुढाकार घेणे आवश्यक होते. एकीकडे हत्या केल्यावर कायद्याने मारेकऱ्याला शिक्षा होते; परंतु गर्भपातही देखील एक प्रकारे महिलेच्या गर्भाशयात असलेल्या निष्पाप जीवाला उमलण्याआधीच खुरडण्याचा, चिरडण्याचा प्रकार असतानाही सरकारने या प्रकाराला न्यायालयीन निर्णयातून मान्यता दिलेली आहे. ज्याने जग पाहिलेच नाही, त्या बाल्याला गर्भाशयातच संपविण्याचा आपणाला कोणी अधिकार दिला आहे आणि अशा प्रकारे गर्भाशयातील बाल्याला गर्भपाताच्या माध्यमातून संपविण्याची परवानगी मिळते. महिलेला अनैतिक संबंधातून, अनिच्छेतून अथवा शारीरिक अत्याचारातून गर्भवती राहण्याची वेळ आली असेल, तर गर्भपात करण्याची वेळ येते. कुमारी माता हे प्रकरण काहीसे विचित्र असले तरी गर्भपात या प्रकाराचे समर्थंन करणे कदापि शक्य नाही. गर्भपात म्हणजे गर्भाशयातील बाळाची हत्या. लोकशाही देशात अशा हत्येला आता शासकीय पातळीवरच पाठबळ मिळत असेल, तर गर्भपाताच्या निर्णयाचा चुकीचा वापर होणारच नाही, याची शाश्वती कोण देणार?

सुरुवातीचे दोन महिने महिला गर्भवती असल्याची समाजाला माहितीही नसते; परंतु मासिक पाळी बंद झाल्यावर सर्वात प्रथम त्या महिलेला आपणास दिवस गेल्याची जाणीव होते. घरातील अन्य महिला सजग असल्या तरच त्यांना आपल्या घरातील संबंधित महिलेला मासिक पाळी न आल्याचे तत्काळ निदर्शनास येते. गर्भवती महिलेचे तसेच गर्भाशयातील बालकाचे एक आगळे-वेगळे नाते असते. मूल अनैतिक संबंधातून, बळजबरीतून, अत्याचारातून तसेच अनिच्छेतून गर्भाशयात राहिले असले तरी गर्भवती महिला आणि गर्भाशयातील बालक यांचे दिवस गेल्यापासूनच एक आगळे- वेगळे नाते निर्माण होत असते. गर्भधारणा झाल्यावर सव्वा ते दीड महिन्यानंतर गर्भाशयातील बाळाच्या हालचाली अथवा जाणीव या सर्व गर्भवतीला काही अंशी समजण्यास मदत होते. अडीच महिन्यांनंतर गर्भाशयातील बालकाने मारलेल्या लाथा (किक) या गर्भवती महिलेसाठी कितीही त्रासदायक ठरल्या तरी संबंधित गर्भवती महिला या ‘किक’मुळे सुखावत असते. गर्भाशयातील बाल्यामुळे गर्भवती महिलेचे अनेकदा घरातील सदस्य, नातेवाईक, परिचित नाराज असले, वेळप्रसंगी संतप्त असले तरी एकांतात गर्भवती महिला आपल्या गर्भाशयातील बाल्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करते. आपल्या पोटावर मायेने हात फिरविताना आपल्या गर्भाशयातील बाल्याला नकळत दिलासा देण्याचा प्रयत्न करत असते. त्या बाल्याशी संभाषणातून सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत असते.

बाल्याचे गर्भाशयात येण्याचे कारण अनैतिक असल्याने आणि त्या प्रकाराला समाजमान्यता नसल्याने गर्भवती महिलेला मनावर दगड ठेवून गर्भपाताची परवानगी द्यावी लागते. गर्भपाताच्या निर्णयाला महिला अनिच्छेने व समाजजीवनाच्या भीतीने परवानगी देत असली तरी तिच्या डोळ्यांतील अश्रू कोणाला दिसत नाहीत. कारण ते अश्रू कोणाला दिसू नयेत याची त्या परिस्थितीत ती महिला काळजी घेत असते. त्या महिलेची व समुद्रात रडणाऱ्या माशाची अवस्था सारखीच असते. समुद्रात रडणाऱ्या माशाचे अश्रू कोणालाही दिसत नाहीत. गर्भाशयात बाल्याच्या हालचाली जाणवल्यापासून त्या बाल्याचे व संबंधित महिलेचे एक आगळे-वेगळे नाते निर्माण झालेले असते. गर्भवती होण्याचा प्रकार अनैतिक, अत्याचार, वासनांध, कामांध, अनैच्छिक स्वरूप असले तरी गर्भवती महिलेचे व गर्भाशयातील बालकाचे नाते मात्र निश्चितच अनामिक नसते. ते एका मातेचे व बाल्याचे नाते असते. गर्भाशयात गर्भवती महिलेची व त्या पाल्याची एक नाळ जोडली गेलेली असते. गर्भाशयात बाल्य असताना प्रत्येक सेंकदागणिक गर्भवतीचे लक्ष आपल्या गर्भाशयातील बालकाकडेच असते. गर्भाशयातील मूल अविकसित असेल, वाढ व्यवस्थित होत नसेल, तर गर्भपाताचा निर्णय एकवेळ न्यायाला धरून असेल, पण इतर बालकांचे काय? गर्भपाताला परवानगी देऊन त्यांची एकप्रकारे गर्भाशयातील बालकाची हत्या करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

निर्णय चुकीचा आहे अथवा बरोबर, हा प्रश्नच नाही. नाण्याला दोन बाजू असतात. गर्भपात करून गर्भाशयातच बाल्याचे जीवन न संपविता त्या बाल्याला जगविण्यासाठी, वाढविण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यास काय हरकत आहे? समाजात घडलेल्या चुकीच्या पायंड्यातून त्या बाल्याचा जन्म होणार असेल तरी त्याचा पात करणे हे नक्कीच नैतिक पातळीला धरून नाही. अशा बाल्यांसाठी सरकारने एक स्वतंत्र विभाग तयार करून त्यांचे संगोपन करून त्यांना घडविण्यास, वाढविण्यासाठी शासनाने सकारात्मक पायंडा पाडण्यास काय हरकत आहे? गर्भपात हा अंतिम उपाय नाही. त्याहीपलीकडे जाऊन विचारमंथन करणे आज काळाची गरज आहे. ज्यांनी बाहेरच्या जगात येऊन श्वास घेतलाच नाही, त्याला अजून किती वेळा गर्भाशयात चिरडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत? अनैतिक संबंधातून, व्याभिचारातून, अत्याचारातून बाल्य जन्माला जरी येणार असेल, तर त्या घडल्या प्रकारामध्ये गर्भाशयातील बाल्याचा काय दोष आहे आणि ज्याला आपले आगमनाचे कारणच माहीत नाही, अशा निष्पाप पाल्याची गर्भाशयातच हत्या करण्याचा आपणाला कितपत नैतिक अधिकार आहे? त्यामुळे आता सरकारने गर्भपातावर बंदी आणून संबंधित बाल्याचे संगोपन करण्यासाठी केंद्र सरकारने व त्या त्या राज्य सरकारांनी सकारात्मक पाऊल उचलण्यास काय हरकत आहे? गर्भपात करणे हा त्यावर ठोस तोडगा नाही, तर ती एक पळवाट आहे. हत्या आहे. गर्भपाताला परवानगी देऊन काय साध्य करणार आहोत, तर एका निष्पाप कोवळ्या जीवाची हत्या? हे पातक आहे. समाजाला यावर दुसऱ्या बाजूने विचारमंथन करण्याची गरज आहे. आपण सर्वच जण स्वत:ला सुजाण, प्रगल्भ व सुधारणावादी असल्याचा टाहो एरव्ही फोडतच असतो, मग त्या बाल्याचा ‘पात’ न करता त्यांना जगविण्यासाठी प्रयत्न करून पाहण्यास काय हरकत आहे?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -