रवींद्र तांबे
मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये पाऊस अवेळी पडल्यामुळे दुष्काळाच्या परिस्थितीला राज्यातील सर्वसाधारण जनतेला तोंड द्यावे लागले. त्याचप्रमाणे पाळीव जनावरांना सुद्धा याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे राज्यातील कोकण विभाग सोडून ‘चारा छावण्या’ सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली. तेव्हा राज्यात पुन्हा दुष्काळाला पाळीव जनावरांना सामना करण्याची वेळ येऊ नये म्हणून कोकणातील हिरव्या चाऱ्याचा योग्य प्रकारे वापर करावा लागेल. हिरव्या चाऱ्याचा विचार करता आवश्यक पोषकतत्त्वे असल्याने पाळीव जनावरांना ऊर्जा मिळून त्यांच्या शरीराची वाढ होते. तसेच हिरव्या चाऱ्यामुळे पाळीव प्राण्यांची पचनक्रिया चांगली होऊन त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्याला मदत होते. सन २०१९ मध्ये पाणी व चारा नसल्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी पाण्याचा आसरा आहे, अशा ठिकाणी जनावरांना सोडून दिले, तर काही ठिकाणी पाणी व चाऱ्याविना रखरखत्या उन्हात कशी गुरे तडफडत होती याचे चित्र विविध टीव्ही चॅनेलवाले दाखवत होते.
कोकण म्हटले की, निसर्गरम्य ‘हिरवेगार कोकण’ अशी कोकणची ओळख आहे. मात्र त्या परिसरातील हिरव्यागार चाऱ्याचा विचार केला, तर हिरवागार दिसणारा चारा नंतर सुकून जातो. जवळजवळ त्याला वाली कोणीच नाही असेच वाटते. महत्त्वाची बाब म्हणजे, हा चारा निसर्गनिर्मित आहे. कोणत्याही प्रकारे लागवड करावी लागत नाही. आता तर खूपच छान हिरवळीचा चारा मिळू शकतो. त्यासाठी ‘प्राणीप्रेमी’ किंवा उद्योजकांनी ‘चारा उद्योजक’ म्हणून पुढे येणे आवश्यक आहे. हिरवा चारा हा दुभत्या जनावरांसाठी खूप उपयुक्त आहे.
पावसाळ्यात कोकण पट्टीत गेल्यावर जिकडे तिकडे पाहिल्यानंतर हिरवेगार दिसते. त्याचे प्रमुख कारण असते ते म्हणजे कोकणातील हिरवा चारा. हा चारा प्राळीव जनावरांसाठी पौष्टिक असतो. सध्या राज्यातील जनावरांचे प्रमाण जरी कमी कमी होत असले तरी त्यांच्या शारीरिक वाढीसाठी व त्यांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हा हिरवा चारा अतिशय उपयुक्त आहे. मात्र बराच चारा कोणत्याही प्रकारे वापर न केल्याने फुकट जातो. ही सत्य परिस्थिती आहे. काही वेळा पावसाळ्यापूर्वी सुकलेल्या गवताला आग लावली जाते. त्याला ‘वणवा’ असेही म्हणतात. विशेष म्हणजे दूधदुबत्या जनावरांसाठी हिरवा चारा अतिशय महत्त्वाचे खाद्य आहे. चारा हा निसर्गनिर्मित मानवाला विनामूल्य निसर्गाने दिलेली देणगी म्हणावी लागेल. त्याचा योग्य वापर केला तर राज्यातील शेतकऱ्यांना एक प्रकारे आर्थिक आधार होऊ शकतो. मात्र हिरव्या चाऱ्याकडे दुर्लक्ष केले जाते. आता कोकणातील चाऱ्याला सोनेरी दिवस येण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. सध्या जो चारा वाढलेला आहे, तो चारा बचत गटांच्या माध्यमातून कापणे व त्याच्या पेंढ्या बांधून जनावरे आहेत, त्याच्या मालकाला विकणे म्हणजे चाऱ्याचा तुटवडा होणार नाही. ज्याचा चारा आहे त्याला त्याचा मोबदला मिळेल. वाहतूकवाल्यांना वाहतूक करायला मिळेल. स्वस्त दरात शेतकऱ्यांना हिरवा चारा मिळेल. यासाठी योग्य प्रकारे नियोजन करावे लागेल. म्हणजे कोकणातील हिरव्या चाऱ्याला सोन्याचे दिवस येतील.
जीवनात सजीवांना पाण्याची नितांत आवश्यकता असते. तसे पाळीव प्राण्यांचा विचार करता हिरव्या चाऱ्यामध्ये पाणी सुद्धा असल्यामुळे नकळत हिरव्या चाऱ्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी सुद्धा वाढण्याला मदत होते. या चाऱ्याची चव पण जनावरांना आवडणारी असते. पचायला ही कठीण नसते. एक प्रकारे हिरवा चारा म्हणजे, जनावरांचे ‘पंचपक्वान’ असे म्हणता येईल. पावसाला सुरुवात झाल्यानंतर कोकणात महिन्यानंतर जाऊन बघा मे महिन्यामध्ये दिसणारी पाळीव जनावरे आता कशी ताजीतवानी झालेली दिसतील. इतकी क्षमता हिरव्या चाऱ्यामध्ये असते, मात्र अजूनही लोकांना त्याची किंमत समजत नाही.
तेव्हा हिरव्या चाऱ्याचे महत्त्व लक्षात घेऊन चारा फुकट न घालविता ज्या विभागात चाऱ्याचा तुटवडा निर्माण होतो त्या विभागात पुरवठा करणे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन शासन पातळीवर योग्य प्रकारे काम केल्यास शासनाला पुन्हा ‘चारा छावण्या’ उभारण्याची वेळ येणार नाही. विशेष म्हणजे चारा छावण्या उभारल्यामुळे लहान जनावरांसाठी रुपये ४५ व मोठ्या जनावरांसाठी रुपये ९० एका दिवसाला शासनाकडून अनुदान दिले जाते. मात्र कोकणातील चाऱ्याचा पुरवठा योग्य प्रकारे केल्यास शासनाला अनुदान देण्याची वेळ येणार नाही. उलट शासनाला महसूल मिळण्याला मदत होईल. यासाठी महाराष्ट्र शासनाने कोकणातील हिरव्या चाऱ्याचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यातील ज्या विभागात चाऱ्याचा तुटवडा असेल त्या विभागातील पाळीव जनावरांना चारा कसा मिळेल यासाठी योग्य उपाययोजना करणे ही आजची खरी गरज आहे.