मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान गुरूवारी दुपारी १२ वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तब्बल दोन तास नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.
मध्य रेल्वेवरील वाहतूक दुपारी १२ वाजेपासून विस्कळीत झाल्याने सीएसएमटीकडे जाणारी धिमी मार्गिका प्रभावित झाली. हा गर्दीचा वेळ नसला तरी देखील कामानिमित्त निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला. सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व धीम्या लोकल या बिघाडामुळे एका मागे एक थांबून होत्या. मात्र काही वेळानंतर या लोकल जलद मार्गावर वळण्यात आल्या. यानंतर ही वाहतूक हळू हळू जलद मार्गावरून सुरू करण्यात आली.