मुंबई : मुंबईत कुर्ला पूर्व भागात नेहरूनगरमधील नाल्यात एका पोत्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचे हात आणि पाय दोरीने बांधल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार समोर आला.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिलेची आधी हत्या करण्यात आली. त्यानंतर महिलेचे हातपाय बांधून तिचा मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकण्यात आला असावा असे पोलिसांना वाटते. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
स्थानिक नागरिकांना नाल्यात एक संशयास्पद गोणी आढळून आली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर नेहरूनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासासाठी महिलेच्या मृतदेहाचे फोटो इतर पोलीस ठाण्यांमध्ये पाठवले आहेत. ही महिला कोण आहे? याचा तपास नेहरूनगर पोलीस करत आहेत.