मुंबई : रावणाचा लूक पाहून भडकलेल्या जुन्या सीतामय्या दीपिका चिखलिया यांनी हा रावण आहे की खिलजी, असा सवाल करत तीव्र नापसंती व्यक्त केली.
आदिपुरुषचा टीझर रिलीज झाल्यापासून जो -तो त्याच्यावर आपला राग काढताना दिसत आहे. प्रत्येकजण टीझरवर आपले मत मांडताना दिसत आहे. खासकरुन टीझरमधील व्हीएफक्स आणि त्याच्यातील व्यक्तीरेखांचे लूक्स यावर लोक भयानक संतापले आहेत.
रामायण ही अशी कथा आहे ज्याच्याशी लोकांची श्रद्धा जोडली गेली आहे आणि असे असताना लोक आदिपुरुषमधील व्यक्तीरेखांशी स्वतःला कनेक्ट करु शकत नाहीत. यासंदर्भात रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतून सीतेच्या भूमिकेत प्रसिद्ध झालेल्या दीपिका चिखलिया यांनी एका न्यूज पोर्टलशी बातचीत करताना आदिपुरुषच्या भरकटलेल्या टीझरवर आपले मत मांडले आहे.
दीपिका म्हणाल्या, ”ज्या व्यक्तीरेखेला आपण पूर्वीपासून जसे पाहत आलो, त्याचा लूक जसा आहे तसाच वाटायला हवा, तो मुघल वाटला नाही पाहिजे.”
आदिपुरुषमधील सर्वच व्यक्तीरेखांच्या लूकवरून वाद पेटला आहे. पण सगळ्यात जास्त वाद हा रावण आणि हनुमानाच्या लूकवरून उठला आहे. लोकांनी सैफ अली खानच्या लूकची तुलना अल्लाद्दीन खिलजीसोबत केली आहे. तर हनुमानाला चामड्याचा बेल्ट अंगावर परिधान केलेला पाहून लोक भलतेच भडकले आहेत. दीपिका चिखलिया देखील यामुळे थोड्याशा नाराज झाल्या आहेत.
दीपिका म्हणाल्या, ”ज्यांनी रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत रावणाची भूमिका केलेली त्या अरविंद त्रिवेदी यांच्या पात्राशी आदिपुरुषच्या रावणाला म्हणजे सैफला कनेक्ट करायला जाते तेव्हा चांगले वाटत नाही. हे आहेच की अभिनेता म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य नक्कीच असते की तुम्ही ती व्यक्तिरेखा तुमच्या माध्यमातून कशी वेगळी साकारता”.
दीपिका पुढे म्हणाल्या, ”आता टीझर रिलीज झाला आहे, तो पाहून आपण कोणत्या निर्णयावर पोहोचणे चुकीचे ठरेल. कोणत्याही सिनेमाचा कंटेट पाहणे गरजेचे असेल. पण जेव्हा रामायणाची गोष्ट येते तेव्हा लोकांच्या श्रद्धेचा देखील विचार होणे गरजेचे आहे. आपण जे करतोय त्यात किती साधेपणा, खरेपणा आणि भावना आहेत याचा विचार व्हायलाच हवा. कितीतरी वेळा जेव्हा लोक मला जीन्स घातलेले पाहतात, तेव्हा ते रागावतात, मला ते बोलतात की त्या पेहरावात त्यांना ते पाहू शकत नाहीत. कारण आजही लोक त्या रामायणातील सीतेला पूजतात. त्यामुळे मी जवळपास जीन्स घालणे सोडून दिले आहे. अनेकदा पंजाबी ड्रेसमध्येच मी बाहेर जाते म्हणजे लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत”.
आदिपुरुषमध्ये सैफ अली खानच्या रावण या व्यक्तिरेखेची तुलना खिलजीसोबत केली जात आहे. यावर दीपिका म्हणाल्या, ”मला वाटते सिनेमातील व्यक्तीरेखा लोकांना किती कनेक्ट करते हे पाहणे महत्त्वाचे राहील. श्रीलंकेची ती व्यक्तिरेखा वाटायला हवी जर ती तिथली आहे, मुघल नाही दिसला पाहिजे. टीझरमध्ये केवळ ३० सेकंदापुरती रावणाची व्यक्तीरेखा दिसली, त्यातून मला फार काही कळाले नाही. हो पण पूर्ण वेगळा दिसला रावण आदिपुरुषमधला. मला माहीत आहे की वेळेसोबत बदल हा घडला पाहिजे. व्हीएफएक्सचे युग आहे, त्याचा वापर झाला पाहिजे. पण हो, त्यासोबत लोकांच्या श्रद्धेशी खेळू नका. आता केवळ टीझर दिसला आहे, आशा आहे या लोकांनी सिनेमातील कथेसोबत न्याय केला असावा”.
सीता ही व्यक्तिरेखा साकारण्याविषयी दीपिका म्हणाल्या, ”अशा पद्धतीची भूमिका साकारणे ज्याच्याशी लोकांची भावना जोडलेली आहे ते खरंतर खूप कठीण असते. रामानंद सागर यांची रामायण मालिका लोकांसाठी बेंचमार्क आहे. त्यामुळे त्याच्याशी आताच्या आदिपुरुषची तुलना होऊच शकत नाही. लोकांना वाटते की राम, सीता, रावण जसे रामानंद सागर यांच्या मालिकेत दिसले होते तसेच दिसायला हवेत. आदिपुरुषमध्ये सगळेच आजचे आघाडीचे कलाकार आहेत, ज्यांना आपण खूप वेगळ्या भूमिकांमध्ये आधी पाहिले आहे. त्यामुळे पटकन त्यांना राम, सीता, रावण म्हणून स्विकारणे लोकांना कठीण जाईल. ते आज या सिनेमासाठी असे दिसत आहेत, उद्या कुठल्या दुसऱ्या सिनेमासाठी वेगळ्या लूकमध्ये दिसतील. त्यावेळेला आम्ही रामायण नंतर दुसरे काही केलेच नाही म्हणून आम्हाला आजही लोक त्याच रुपात पाहतात आणि आमची पूजा करतात”.